जगातल्या सर्वांत श्रीमंत महिलेचं निधन : 'लॉरियल'च्या प्रमुख होत्या लिलियन बेटनकोर्ट

फोटो स्रोत, AFP
जगप्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनी 'लोरियाल'च्या माजी प्रमुख लिलियन बेटनकोर्ट यांचं गुरुवारी निधन झालं. जगातील सर्वांत श्रीमंत महिला अशी बिरुदावली पटकावणाऱ्या बेटनकोर्ट 94 वर्षांच्या होत्या.
2017 मध्ये लिलियन यांच्याकडे 33 बिलियन युरो (1 युरो = 77 रुपये) एवढी संपत्ती होती. फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत लिलियन 14व्या क्रमांकावर होत्या. जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत त्या अव्वल स्थानी होत्या.
2012 मध्ये लोरियल कंपनी सोडल्यानंतर त्या चर्चेत होत्या. लिलियन डिमेन्शिया आजारामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या या स्थितीचा फायदा घेत आठ जणांनी त्यांना फसवलं होतं.
'लॉरियल'चे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉ पॉल आगॉन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, "लॉरियल परिवारात लिलियन अतिशय लाडक्या होत्या. कंपनी आणि कर्मचारी यांचा त्या सदैव विचार करत असत. कंपनीच्या यशस्वी वाटचालीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्या नेहमीच आमच्या स्मरणात राहतील."
लिलियन यांचे वडील उजेन श्वेलर यांनी 1909 मध्ये एका कंपनीची स्थापना केली होती. त्याच कंपनीचं रुपांतर पुढे लॉरियल नावाच्या मोठ्या उद्योगसमूहात झालं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)




