दिल्ली - रावण बनवणारं गाव ते कठपुतल्यांची कॉलनी, इंडिया गेट पलीकडची दिल्ली

    • Author, रिपोर्ट-तुषार कुलकर्णी, फोटो-शाहनवाज, देवेश सिंह
    • Role, बीबीसी मराठी

भारतात असलेल्या असंख्य प्रेक्षणीय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्ये दिल्ली आजही पहिल्या पंक्तीत येऊ शकेल. तुम्ही दिल्लीतील कोणत्याही महत्त्वाच्या स्थळाला भेट द्या.

लाल किल्ला, इंडिया गेट किंवा अक्षरधामला गेला की तुम्हाला एक तरी मराठी ग्रुप सापडतो आणि 'काय पाव्हणे कुठले' हे विचारलं जातं. नाव-गाव ओळखी विचारल्या जातात आणि ते लोक एक प्रश्न हमखास विचारतात की दिल्लीत आणखी पाहण्यासारखं काय आहे?

आपण जे पण सांगावं, ते त्यांनी आधीच पाहिलेलं असतं. त्यांना तुम्ही म्हणा कुतुब मीनार, राजघाट, राष्ट्रपती भवन परिसर, चांदणी चौक जे ही सांगा ते त्यांनी पाहिलेलं असतं.

म्हणजे दिल्लीत प्रेक्षणीय स्थळं म्हणून ज्या गोष्टी नावारूपाला आल्या आहेत त्या सर्वच त्यांनी पाहिलेल्या असतात. मग प्रश्न पडतो आता पाहण्यासारखं आहे उरलं तरी काय?

पण दिल्ली म्हणजे फक्त इंडिया गेट आणि लाल किल्लाच आहे का? दिल्लीमध्ये सात आठ वर्षं राहिल्यानंतर आता वाटू लागलं आहे की हळूहळू या शहराची ओळख होऊ लागली आहे.

दिल्लीत अनेक ठिकाणी फिरल्यानंतर अनेक जागा अशा सापडल्या ज्या पाहिल्यावर वाटलं की या जागा शहर जसं आहे त्या जागा मात्र शहराहून अगदी वेगळ्या आहेत.

लाल किल्ला आणि इंडिया गेट पलीकडचं दिल्ली शोधण्याचा प्रयत्न मी या लेखातून केला आहे.

त्या सर्वच गोष्टी एका लेखात मांडणं कठीण आहे, पण दसरा दिवाळीच्या निमित्ताने ज्या कॉलन्या बहरलेल्या असतात त्यांचाच मी या लेखात समावेश केला आहे. पण जर दसरा दिवाळीच्या काळात दिल्लीला आलात तर या ठिकाणांना भेट द्या किंवा खास त्या पाहण्यासाठी या काळात या.

तितारपूर - रावण बनवणारं गाव

आता गाव म्हटल्यावर एक वेगळीच कल्पना आपल्या मनात येते.

चूल, रम्य पहाट, डोक्यावर मडकी घेऊन नदीवरुन पाणी आणणाऱ्या तरुणी, शेतावर जाण्याआधी आपल्या गाई-बैलांना आंबोण खाऊ घालणारे शेतकरी. हे गाव आहे. पण तसं हे गाव नाही.

दिल्लीच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत. या ठिकाणी श्रमिक वर्ग आणि फेरीवाले प्रामुख्याने राहतात. कधीकधी तर असं चित्र दिसतं की मोठ-मोठे बंगले ( इकडे याला कोठी म्हणतात) बिल्डिंग असतील आणि रस्त्याच्या दुसऱ्याच्या बाजूला तुम्हाला अत्यंत साधी वस्ती दिसेल.

दिल्लीत आपल्याला काही ठिकाणी 'झुग्गी' म्हणजे झोपड्याही दिसतील. तर या ज्या वस्त्या आहेत त्या कधी काळी गाव होत्या आणि जागा मिळेल त्याप्रमाणे काही बिल्डर्सने तिथे बांधकाम केलं आणि उरलेल्या ठिकाणी श्रमिक वर्गातील लोक राहिले.

तसंच तितारपूर हे गाव आहे. आता तितारपूरची ओळख ही रावण बनवणारं गाव अशीच बनली आहे. ब्लू लाईन मेट्रोने देखील तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

दसऱ्याच्या काही दिवस आधी सुभाष गार्डन मेट्रो स्टेशनला उतरलात की तुम्हाला विचारावे देखील लागणार नाही की रावण कुठे बनवतात. कारण जिकडे नजर जाईल तिकडे रावणाचे मुखवटेच मुखवटे दिसतात.

दीड दोन फुटाच्या रावणापासून ते अगदी 50 फुटांपर्यंत इथे तुम्हाला रावण दिसतील. रस्त्याच्या कडेलाच बांबू तासणारे, पेंढा भरणारे कारागीर दिसतील. कुणी रावणाला बांधण्यासाठी असलेल्या तारा तोडतोय असं दृश्य आपल्याला दिसतं.

दोन वर्षं कोव्हिडमुळे कुठलेच सार्वजनिक कार्यक्रम झाले नव्हते. पण या वर्षी मात्र सर्व कार्यक्रम पूर्वीइतक्याच नाही तर त्याहून अधिक उत्साहाने होताना दिसत होते.

या वर्षी रावणाच्या ऑर्डर देखील जास्त आहेत, असं तिथले विक्रेते सांगत होते. तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्या भागात अनेक ट्रक, टेम्पोमध्ये रावण चढवताना कामगार दिसत होते.

दीडशे-दोनशे रुपयांपासून 50 हजार रुपयापर्यंतचे रावण तितारपूरमध्ये दिसतात. एका एका विक्रेत्याकडे 20-25 कामगार असतात.

हे कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशातून दोन महिन्यांसाठी येतात. इतर वेळी ते त्यांच्या भागात मजुरी करतात, पण दरवर्षी दसऱ्याच्या वेळी मात्र ते दिल्लीत हजर होतात.

कित्येक जण अनेक वर्षांपासून हेच काम करत असल्यामुळे त्यांचा हात त्यावर बसलेला असतो.

'रावणवाले बाबा'

पण तितारपूर हे गाव रावणाचं गाव म्हणून कसं नावारूपाला आलं याची गोष्ट सत्यपाल राय सांगतात. ते विक्रेते आहेत, अगदी लहान असल्यापासून ते या व्यवसायात आहेत. आता हे काम करता करता चाळीस वर्षं झाल्याचं ते सांगतात.

"चाळीस वर्षांपूर्वी सिकंदराबादहून हरी सैनी नावाचे एक गृहस्थ तितारपूर येथे आले. आणि रावण बनवण्यास त्यांनी सुरुवात केली. दिल्लीतील अनेक रामलीला मंडळातील लोक त्यांच्याकडून रावण बनवून घेत असत त्यामुळे त्यांचे नाव रावणवाले बाबा असेच पडलं.

"त्यांनी या भागातील अनेक जणांचा रावण बनवण्याची कला शिकवली पुढे हे लोक आपला स्वतंत्र व्यवसाय करू लागले. असं करता करता अख्खी वस्तीच रावण बनवण्याचं काम करू लागली. त्यानंतर या गावाची 'रावण बनानेवाला गाव' अशी ओळख बनली," असं सत्यपाल राय सांगतात.

रामायणातील कथेप्रमाणे रावण हा खलनायक आहे. पण तितारपूरमधील लोकांना मात्र त्याच्याविषयी आदर आहे. कारण ज्याच्यामुळे आपली 'रोजी-रोटी' चालते त्याला खलनायक कसं म्हणावं, हा प्रश्न सत्यपाल विचारतात.

"आम्ही तर दसऱ्याला संध्याकाळी घराबाहेर पण पडत नाही. कारण तेव्हा लोक रावण जाळतात. आपणच बनवलेली गोष्ट कुणी जाळत असेल तर ते कसं पाहावं, त्यामुळे आम्ही घराबाहेर पडत नाहीत," असं सत्यपाल सांगतात.

रावणाबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. "रावण शक्तिशाली होता, विद्वान होता, महापंडित होता. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे यज्ञकार्य होत असे तेव्हा त्याला पौरोहित्य करण्यासाठी बोलवलं जात असे," असं सत्यपाल म्हणतात.

त्याच्यासारख्या व्यक्तीला हरवलं म्हणूनच तर राम मोठे होतात ना. छोट्या-मोठ्या माणसाला हरवून ते महान थोडी झाले असते. रावणाबद्दलचा हा वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडूनच ऐकायला मिळू शकतो जे दिवसरात्र रावण बनवण्याचं काम करतात, असं वाटतं.

ते रावणाबद्दल अजून बरंच काही सांगत होते. पण हरयाणवी हिंदी इतकी चटकन लक्षात येत नाही आणि बऱ्याच गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगत होते म्हणून मध्येच मी विचारलं, "मग रावण इतका चांगला होता तर त्याचा अंत असा का झाला?"

यावर ते म्हणतात, "अहंकार आणि परस्त्रीवर नजर टाकल्यामुळे झालं हे. मन चंचल असतं. त्या चंचल मनामुळेच त्याचा अंत झाला."

"जर मन एकदा वाईट मार्गाला लागलं की किती मोठा माणूस असेना का त्याचा अंत असाच होतो," असं ते सांगत होते.

ते जे बोलत होते त्याची झलक त्यांच्या काही पुतळ्यावर देखील जाणवत होती. कारण रावणाच्या एका पुतळ्यावर 'अंत बुरे का बुरा, आणि पराई नार पे नजर मत डालो' हे लिहिलेलं होतं. काही पुतळ्यांवर लिहिलं होतं, 'बुरी नजर का ये भुगतान, न राष्ट्र बचा ना संतान असं लिहिलं होतं.'

रामायणाच्या बऱ्याच गोष्टी त्यांना येत होत्या आणि सांगाव्या देखील वाटत होत्या.

त्यांचा निरोप घेऊन त्या गावातल्या इतर रावण निर्मात्या विक्रेत्यांना भेटलो.

शिवलाल राठोड नावाचे एक गृहस्थ तिथे भेटले. कित्येक वर्षापासून ते दिल्लीत राहतात. मुलं आणि नातवंडासह ते या भागात राहतात.

जुन्या प्लास्टिकच्या बॉटल्सचे रावण ते बनवतात. मैदानातील रावण पाहून मुलं हट्ट करतात आम्हालाही रावण हवा आहे मग त्यांच्यासाठी दीड ते पाच फुटापर्यंतचे रावण आम्ही बनवतो. शक्यतो हे रावण कुणी जाळत नाही. घरातच ठेवले जातात असं शिवलाल सांगतात.

दसऱ्याच्या सीझनमध्ये ते आणि त्यांचं कुटुंब हे काम करतं इतर वेळी ते फेरीवाले असतात. जुने कपडे विकत घेणं आणि पुन्हा नीट करून ते विकण्याचं काम ते वर्षभर करतात.

रस्त्याच्या दुतर्फा रावणच रावण आणि ते विकत घेण्यासाठी आलेली लोकांची गर्दी यामुळे तितारपूर हे गाव रावणमयच झालेलं दिसतं.

कठपुतल्यांचं गाव

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्यातला जादूगर हा कोणत्याही पुतळ्यात प्राण टाकू शकत असतो. त्या नंतर तो पुतळा जिवंत होतो. अशी ती कथा होती. ती गोष्ट खरी होती की नाही याचा विचार अनेकदा मनात येतो.

पण कठपुतली कॉलनीमध्ये गेल्यावर वाटतं ती गोष्ट खरी असावी. कारण अक्षरशः काही बाहुल्यांना हातात घेऊन ते अशी कथा सांगतात की आपल्याला क्षणभर वाटतं की खरंच यांनी या बाहुल्यांमध्ये प्राण टाकले आहेत.

करवाचौथ झाली की इकडे थंडी पडायला सुरुवात होते आणि थंडीच्या काळात विविध मेले, उत्सव भरले जातात. इतर भारतीय भागात कठपुतल्यांचे खेळ आता खूप कमी झालेले दिसतील, पण उत्तर भारतात मात्र ते नियमितपणे होताना दिसतात.

दिल्लीत कठपुतल्यांचे खेळ कुठेही असू द्या पण हे खेळ खेळवणारे लोक मात्र कठपुतली कॉलनीतलेच असतात. आधी शादीपूर डेपो या ठिकाणी हे लोक राहत असत. पण ही वस्ती अधिकृत नव्हती.

त्यामुळे दिल्ली डेव्हलपमेंट अॅथोरिटीने (डीडीए) 2017 साली कॉलनीवर बुलडोझर फिरवले. त्याच ठिकाणी त्यांना फ्लॅट देण्याचे डीडीएने कबुल केलं आहे. सध्या त्या साइटवर बांधकाम सुरू आहे आणि ही कॉलनी आता आनंद पर्बत या ठिकाणी स्थलांतरित झाली.

पश्चिम दिल्लीत आनंद पर्बत या ठिकाणी डीडीएने कठपुतली कॉलनीतील लोकांसाठी ट्रांझिट कॅम्प लावला आहे. या ठिकाणी 2800 कुटुंबं राहतात. हे सर्वच लोक कठपुतली कलाकार नाहीत.

तीस ते पस्तीस कुटुंबं ही कठपुतली कलाकार आहेत. आधी बरेच जण हे काम करत होते पण परिस्थितीमुळे अनेकांनी ढोल वाजवण्याचे काम स्वीकारलं आहे.

असे चार-पाचशे कुटुंबं आहेत ज्यांचा उदरनिर्वाह हा ढोलवर चालतो. दोन तीन पिढ्यांपासून दिल्लीतच राहणारी 20-22 मराठी कुटुंबं देखील आहेत. ते फेरीवाल्याचं काम करतात. छोट्या मोठ्या वस्तू विकून त्यांचं घर चालतं.

कठपुतली कॉलनीत जादूगर, ढोलवाले, ट्राफिक सिग्नलवर शोभेच्या वस्तू विकणारे, डोंबारी असे अनेक लोक राहतात.

आनंद पर्बतवरील कठपुतली कॉलनी शोधत शोधत आम्ही ट्रांझिट कॅम्पच्या वेशीवर पोहोचलो आणि तिथे दोन जण शोभेचे उंट, घोडे बनवत होते. ते पाहून जीव भांड्यात पडला आणि आपण बरोबर ठिकाणी पोहोचलो आहोत, असं वाटलं.

कठपुतली कॉलनीत गेल्यावर तिथे एक दोन लोकांशी बोललो आणि भेटीचं कारण सांगितलं. तिथे असलेल्या एक मध्यमवयीन गृहस्थाने लकी नावाच्या तरुणाची ओळख करून दिली.

लकीचे वडील पूरन भाट हे देशातील नावाजलेले कठपुतली कलाकार आहेत. पूरन यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री हे पुरस्कार मिळाले आहेत.

लकी सांगतो की "माझे वडील हे त्यांच्या वडील मालूराम भाट यांच्याकडून ही कला शिकले होते. सर्वांत आधी ते आणि काही कुटुंब राजस्थानमधून दिल्लीत आले आणि शादीपूर कॉलनीत स्थायिक झाले. त्यांच्या सारख्या अनेक कलाकारांमुळे शादीपूर कॉलनीलाच कठपुतली कॉलनी म्हटलं जाऊ लागलं."

"ही कला 400 वर्षं जुनी आहे असं म्हटलं जातं. राजा-महाराजांच्या दरबारात त्यांच्या शौर्याचे वर्णन कठपुतल्यांच्या माध्यमातून सांगितले जात असे. हाच या कलेचा उगम आहे," असं लकी सांगतो.

"माझ्या वडिलांचे संपूर्ण जगात कार्यक्रम झाले आहेत. सध्या ते बार्सिलोनामध्ये आहेत. माझेच 16 देशात कार्यक्रम झाले आहेत," असं लकी सांगतो.

"माझ्या वडिलांनी पारंपरिक कठपुतली कला आणि आधुनिक कलांचा मिलाफ केला. मी हीच कला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय," लकी सांगतो.

मनी हाईस्ट हा नेटफ्लिक्सवरचा शो भारतातही फार प्रसिद्ध झाला. नेटफ्लिक्सने या शोच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकारांना एकत्र आणले होते. त्यापैकी आपणही होतो असं लकी सांगतो.

"मनी हाईस्टच्या फॅन अँथममध्ये मी बनवलेले पपेट्स वापरण्यात आले आहेत," लकी सांगतो. हे सांगता सांगता पटकन त्याने आपल्या मोबाईलवर युट्युबची ती क्लिप लावली आणि प्रोफेसर, बर्लिन यांचे पपेट्स दाखवत तो म्हणाला, 'दोनच सेकंदासाठी हे वापरले आहे पण असं नवं काही केलं की छान वाटतं.'

लकीने आपल्या कलेची झलक दाखवली. घरात असलेला एक मुखवटा काढला आणि तो घातला.

सिमेंटच्या चौथऱ्यावर बसून देखील तो असे हातवारे करू लागली की तो खरंच राजा आहे असं वाटू लागलं.

मग एक निळ्या रंगाची बाहुली हातात घेऊन त्याने अत्यंत नजाकतीने तिचे हात, पाय, डोकं हलवलं. त्याच्या छोट्या पुतणीला देखील त्याने दाखवलं की ही बाहुली कशी हाताळायची.

कठपुतली कॉलनीमधील कलाकार त्यांची बाहुली किंवा वाद्य अत्यंत आदराने हाताळताना दिसतात. ही कलाच आपलं सर्वकाही आहे, अशी त्यामागे भावना असल्याचं त्यांना वाटतं.

पूरन भाट आणि लकी भाट हे मोठ्या ठिकाणी शोज करून आपली कला सादर करतात.

तर इतर अनेक कलाकार आहेत जे उत्सवात आणि जत्रेत (मेला) आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करतात.

हरिश भाट आणि विमला भाट यांचे कुटुंब हे अशा कलाकारांपैकी एक आहेत. ते सांगतात की "काही वर्षांपूर्वी पर्यंत लग्न कार्य किंवा लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आम्हाला बोलवलं जात असे."

"पण आता युट्युब, टीव्ही अशा गोष्टी आल्यामुळे आमच्याकडे कमी काम असतं. म्हणून आम्हाला इतर दिवशी सजावटीच्या वस्तू बनवाव्या लागतात. आम्ही त्या सिग्नलवर विकतो किंवा कुणी जर ऑर्डर दिली तर त्यांना विकतो," हरिश सांगतात.

हरिश भाट यांनी ते वस्तू कशा तयार करतात हे दाखवलं. दोन बाहुल्या घेऊन त्यांनी एक छोटासा खेळ देखील दाखवला. पतीवर नाराज झालेल्या चंपाला तिचा पती गाणं म्हणून, संगीत ऐकवून कसं मनवतो अशी छोटीशी कथा त्यांनी आपल्या खेळातून सादर केली.

जसं जसं ते सांगू लागले आणि गाऊ लागली तसे आजूबाजूची मुलं आली आणि ती देखील गाऊ लागली.

या वस्तीला पण कठपुतली कॉलनीच म्हणतात पण शादीपूरची गोष्ट वेगळी होती, असं हरिश सांगतात. आता इथं काडीपेटीच्या डब्यांसारख्या घरात राहावं लागत आहे. सरकारकडून घर मिळेपर्यंत आता हाच आमचा पत्ता आहे.

ट्रांझिट कॅम्पमधील घरं ही काडीपेटीच्या डब्यांसारखी दिसत असली तरी ढोलवाले, कठपुतली कलाकार आणि गाणाऱ्या मुलांमुळे कॉलनीत चैतन्य आहे असं वाटतं आणि काही वेगळं पाहायला मिळाल्याचं समाधान देखील मिळतं.

'ब्रह्मदेवा'ची कॉलनी

दिवाळी म्हटलं की रंगरंगोटी आणि पणत्या तर आल्याच ना. पणत्याशिवाय दिवाळी म्हणजे रंगाशिवाय रंगपंचमी. दिल्लीतल्या उत्तमनगरच्या कुंभार गल्लीबद्दल खूप ऐकलं होतं.

देशभरातच नाही तर परदेशातही मातीची खेळणी, भांडी आणि शोभेच्या वस्तू या गल्लीतून जातात अशी 'प्रजापती कॉलनी'ची ख्याती आहे.

प्रजापती कॉलनीत जाण्याआधी आम्ही सरोजिनी नगरच्या ए. के. मार्गावर गेलो. रांगोळी, दिवे, पणत्या, नंदादीप विविध मूर्ती या ठिकाणी मिळतात.

म्हणजे थोडक्यात दिवाळीसाठी सजावटी आणि रोषणाईच्या ज्या काही वस्तू लागतील त्याचं हे 'वन स्टॉप डेस्टिनेशन' आहे.

या बाजारातील पन्नास टक्के वस्तू या बाहेर राज्यातून येतात. पण बऱ्याचशा वस्तू या दिल्लीच्या उत्तम नगरमधून येतात. तिथे देखील वारंवार उत्तम नगरचं नाव ऐकल्यावर तिथे जाण्याची इच्छा आणखी बळकट झाली.

उत्तम नगरमध्ये गेल्यावर थोडं चाललात की लगेच कुंभार गल्ली किंवा प्रजापती कॉलनी कुठे आहे हे आपल्याला कळतं.

कारण हीच एकमेव गल्ली आहे जिथे मडक्यासाठी लागणाऱ्या लाल मातीच्या थराने डांबरी रस्ता झाकून गेलेला दिसतो.

संपूर्ण गल्लीत भाजलेल्या मातीचा गंध दरवळतो. कुठे चिखल भिजवला जात आहे तर कुठे दिवे तयार केले जात आहेत, रंगरंगोटी होतेय तर चिंचोळ्या रस्त्यावर टेम्पोमध्ये माल भरला जात आहे असं चित्र दिसतं.

दिवाळी तोंडावर आल्यामुळे सर्वांची लगबग आपल्याला दिसत होती. या ठिकाणी वस्तू बनतातही आणि विक्रीदेखील केली जाते.

चहासाठी लागणारे कुल्हड, वाईनच्या ग्लासप्रमाणे असणारे मातीचे ग्लास, कॉफी मग, वन्य प्राण्यांच्या मूर्ती, देवी-देवतांचा मूर्ती सारं काही एकाच गल्लीत तुम्हाला पाहायला मिळतं.

आम्ही विक्रेते आणि वस्तू तर पाहिल्या पण याचे निर्माते कुठे आहेत हे आम्ही शोधत होतो. बाहेर भट्टी पाहून एका घरात शिरलो.

तिथे मध्यमवयीन पतीपत्नी चाकावर दिवे बनवण्याचं काम करत होते. त्यांना विचारलं की तुमचे फोटो काढले तर चालतील का. त्यांनी होकार दिला, पण आम्हाला डिस्टर्ब तर करणार नाहीत ना? असं स्पष्टपणे विचारलं.

म्हटलं नाही, फक्त तुमचे फोटो काढायचे आहेत. फोटो काढल्यानंतर काही वेळ गेला आणि ते काकाच स्वतः बोलायला लागले. तुम्ही कुठून आलात, काय शिकला आहात असं विचारलं.

त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळलं की त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्या काळात घरातील जबाबदारी खांद्यावर येऊन पडली आणि पुन्हा याच पिढीजात व्यवसायात पडलो, असं जगमोहन प्रजापती यांनी सांगितलं.

उत्तम नगरची कुंभार गल्ली ही देशातल्या सर्वांत मोठ्या कुंभार वस्तीपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. अनेक टुअर गाईड्स आणि टुरिस्ट कंपन्या देखील या गल्लीची भेट घडवून आणण्याचे पॅकेजेस देतात. पण तुम्ही स्वतः जरी गेला तरी या गल्लीविषयी माहिती तेथील स्थानिक लोक आनंदाने देतात.

50-60 वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी देशाच्या विविध भागातून येऊन लोकांनी दिल्लीत हा व्यवसाय सुरू केला. मी जितक्या लोकांशी बोललो तितक्या लोकांनी त्यांचं आडनाव प्रजापती हेच सांगितले. त्यावरूनच या कॉलनीला प्रजापती कॉलनी हे नाव पडलं, असं दिसत होतं.

जगमोहन प्रजापतींना हा प्रश्न मी विचारला, या कॉलनीला प्रजापती कॉलनी का म्हटलं जातं?

जगमोहन यांनी काही सेकंदाचा पॉज घेतला आणि मलाच प्रश्न केला की 'भारतीय पुराणांनुसार प्रजापती कोण होते तुम्हाला माहीत आहे का?' आता पॉज घेण्याची वेळ माझी होती. मी सांगितलं ब्रह्मदेव.

पुन्हा त्यांनी हा प्रश्न केला मग सांगा ब्रह्मदेवाला प्रजापती का म्हटलं जातं. हा प्रश्न थोडा तुलनेनं सोपा होता. म्हटलं कारण त्यांनी सृष्टी निर्माण केली, असं पुराणात म्हटलं जातं.

मग जगनमोहन म्हणाले जसा तो "सृष्टीचा निर्माता आहे तसे आम्ही वस्तूंचे निर्माते आहोत. त्यामुळे आम्हाला प्रजापती म्हटलं जातं आणि आम्ही इथे राहतो म्हणून या जागेला प्रजापती कॉलनी म्हटलं जातं."

त्यांचा निरोप घेऊन आम्ही जिथे रंगरंगोटीचं काम सुरू होतं तिथं गेलो आणखी काही दुकानदारांशी बोललो.

अनेक जणांशी बोलल्यावर कळलं की आता पूर्वीइतकी या व्यवसायाची मागणी राहिली नाही. प्लास्टिकचे दिवे, कप यांच्याशी स्पर्धा करणं अवघड जातं असं ते सांगतात.

अनेक जण इतर व्यवसाय देखील स्वीकारत आहेत तर काही जण मजुरीची कामं करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दिवाळीला काही दिवस बाकी असल्यामुळे गर्दीने बाजार फुललेला होता.

आधुनिक ब्रह्मदेवांनी तयार केलेल्या वस्तू संपूर्ण बाजारात दिसत होत्या, पण आधुनिकीकरणाच्या तडाख्यात ब्रह्मदेवाच्या कॉलनीची म्हणजेच प्रजापती कॉलनीची हीच ओळख राहील का, असा विचार मनात घेऊन मी गल्लीतून बाहेर पडलो.

जेव्हा आम्ही ही भटकंती करत होतो तेव्हा माझ्यासोबत असललेला फोटो-जर्नलिस्ट शाहनवाज म्हणाला की आजकाल कोणतंही शहर पाहा, सारखंच दिसतं. तेच मॉल्स, तीच दुकानं त्या शहराची ओळख म्हणून काही राहिली असं वाटतच नाही.

ही गोष्ट खरी वाटते पण जेव्हा दिल्लीतल्या या कॉलन्या पाहिल्या तेव्हा वाटलं की या शहराची इंडिया गेट, लाल किल्ला आणि मॉल्स पलीकडेही ओळख आहे.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता..)