'एकनाथ शिंदेंचा वापर काँट्रॅक्ट किलरप्रमाणे होत आहे' - सामनातून टीका #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Alamy
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. एकनाथ शिंदेंचा वापर काँट्रॅक्ट किलरप्रमाणे होत आहे - सामनातून टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात 'कॉन्ट्रॅक्ट किलर'प्रमाणे होत आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. 'सामना'मधील रोखठोकमधून शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. शिंदे यांनी कुठेतरी स्वत:ला ब्रेक लावायला हवा असं शिवसेनेने म्हटलं आहे.
येणाऱ्या पिढ्यांचे आशीर्वाद हे खऱ्या शिवसेनेलाच असतील असे या लेखात म्हटले आहे.
हे सदर संजय राऊत लिहित असत पण सध्या ते तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांच्याऐवजी 'कडकनाथ मुंबैकर' या टोपणनावाने हे सदर लिहिण्यात आले आहे.
या सदरात म्हटले आहे की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले."
"बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले. महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली. जीवनात काही गोष्टी पवित्र मानाव्यात, राजकारणाच्या पलीकडे मानाव्यात, हे सध्याच्या राज्यकर्त्यांना समजण्यापलीकडे आहे. शिवरायांची भवानी तलवार ही कथा की दंतकथा ते माहीत नाही, पण शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या रक्षणासाठी उपसलेली भवानी तलवारच आहे," असे सामनाने म्हटले आहे.
2. तो मी नव्हेच मधील लखोबापेक्षा मी प्रसिद्ध - भुजबळ
"जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा बाळासाहेबांनी माझा 'लखोबा लोखंडे' असा उल्लेख केला होता. 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही, तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला", असं छगन भुजबळ म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलताना भुजबळांनी यासंदर्भात उल्लेख केला.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत आम्ही श्रीकृष्ण आयोगाची स्थापना करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री होतो. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या सरकारने सर्व फाईल्स बंद केल्या होत्या.
"मात्र, एकेदिवशी अचानक एक फाईल माझ्या टेबलवर आली. त्यात पोलिसांचे काही अहवाल होते. जर मी त्यावेळी बाळासाहेबांविरोधात गुन्हा नोंदवला नसता, तर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता. बाळासाहेबांना अटक झाली, त्यावेळी त्यांना जेलमध्ये नेऊ नका, असे निर्देश मी पोलीस आयुक्तांना दिले होते," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
"शिवसेना सोडण्याची काही वेगळी कारणं होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मी विधानसभेत आमदार होतो. मंडळ आयोग जाहीर झालाच पाहिजे, अशा घोषणा आम्ही देत होतो. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाची घोषणा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला विरोध केला. जातीनिहाय आरक्षण देऊ नये, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, मी त्यावेळी भटक्या विमुक्त जातींचा मोर्च्यात सहभागी झालो होतो," असं त्यांनी सांगितलं.
3. ओडिशातून कंत्राटी धोरण हद्दपार
ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पटनाईक यांच्या या निर्णयानं राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी भरतीचं धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करुन घेतलं जाईल, अशी घोषणा पटनाईक यांनी केली आहे.
नवीन पटनाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा आहे.
राज्यातील कंत्राटी भरती धोरण कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवसाची मी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. ओडिशातील कंत्राटी रोजगार धोरणाच्या युगाचा अंत झाला आहे. आपण सर्वजण मिळून लोकांची सेवा करुया, असं पटनाईक म्हणाले. 'झी 24तास'ने ही बातमी दिली आहे.
नवीन पटनाईक यांच्या या निर्णयामुळं राज्यातील 57 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कंत्राटी भरतीचं धोरण रद्द करण्यात आल्यानं 57 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करुन घेतली जाईल. राज्याच्या तिजोरीतून यासाठी 1300 रुपये कोटींचा खर्च करण्यात येईल.
4. मुंबईत 2026 पर्यंत 337 किमीचं मेट्रोचं जाळं उभारणार-मुख्यमंत्री
"एमएमआरडीए'च्या माध्यमातून 337 कि. मी. चे मेट्रोचे जाळे विणले जात असून हा संपूर्ण प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल. मेट्रोमुळे रस्त्यावरील 40 लाख वाहने कमी होतील," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि 'कन्स्ट्रक्शन टाईम्स'च्या सहकार्याने शनिवारी मुंबईच्या फोर सिझन हॉटेलमध्ये 'मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अॅक्ट 2034' या विशेष एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आजही मुंबईतील 60 टक्के जनता झोपडपट्टीत राहते. 2052 मध्ये हे प्रमाण आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि त्याबरोबरीने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टीमुक्त करणे हे या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी झोपु योजनांना गती देण्यात येईल,
सध्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. लवकरच त्याच्या एका टप्प्याचे उद्घाटन होईल. समृद्धीचा विस्तारही करण्यात येत आहे. मुंबई - सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्गही बांधण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दळणवळण सेवाही मजबूत होईल
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यानुसार मुंबईतील एक हजार कि.मी.च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी 450 कि.मी.च्या रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.
5. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला धक्का, एकही पंचायत समितीत सभापती नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची पाटी कोरी राहिली असून फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे.
जिल्ह्यातील 13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहे. तर तीन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला आहे. तर एका तालुक्यात शिंदे गटाचा सभापती झाला आहे. 'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/CHANDRASHEKHAR BAWANKULE
कॉंग्रेसला सभापतीपद मिळालेल्या पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवापूर या पंचायत समितींचा सामवेश आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेली पंचायत समित्यांमध्ये नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले आहे. यासोबतच रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








