'पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा आदित्य ठाकरे, #5मोठ्याबातम्या

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Facebook/Aditya Thackeray

फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, आता कोस्टल रोड सेना असेही म्हणा - आदित्य ठाकरे

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

विरोधकांकडून शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर टीका करताना अनेकदा पेंग्विनचा उल्लेख केला जातो. मात्र, आदित्य ठाकरेंनी या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असं म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.

बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं आम्हीच लुटणार, या टीकेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला वाटतं खोके सरकारनं टीका करणं, हेच आता हास्यास्पद झालेलं आहे. वेदांताचा प्रकल्प आपल्या राज्यातून गेला आणि हे त्यांच्या सरकारच्या काळात झालं आहे. सरकार घटनाबाह्य बनलं आहे. त्यामुळे हे झालं आहे. देशभरातील शिवसैनिकाची यंदाच्या मेळाव्या बाबत उत्सुकता वाढली आहे."

"पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास अधिकाधिक लोकं आले होते आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा,आम्ही अशी अनेक काम केली आहेत. त्याबद्दलही बोलत राहा. कोस्टल रोड सेना, असेही म्हणू शकता," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

2. RBI ने रेपो रेट 0.50% नी वाढवला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रेपो दरात 0.50% नी वाढ केली आहे. यामुळे रेपो दर 5.40% वरून 5.90% होईल.

यामुळे गृह कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग होऊ शकते आणि जास्त EMI भरावा लागू शकतो. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

आरबीआय

फोटो स्रोत, Getty Images

व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 28 सप्टेंबरपासून मॉनेटरी पॉलिसी समितीची बैठक सुरू आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत व्याजदरांबाबत माहिती दिली. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 4.90% वरून 5.40% करण्यात आले होते.

3. '25 लाख नकोत, आरोपींना मृत्युदंड द्या'

उत्तराखंडमधील अंकिता हत्याकांड सध्या संपूर्ण देशात चर्चेत आहे. या घटनेत नुकतंच सरकारनं पीडितेच्या कुटूंबियांसाठी 25 लाखाची मदत जाहीर केली होती.मात्र या मदतीवर आता प्रथमच पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

अंकिता भंडारी

फोटो स्रोत, Vinay Pandey

फोटो कॅप्शन, अंकिता भंडारी

अंकिता भंडारीचे वडील वीरेंद्र भंडारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना म्हटलं, "आम्हाला 25 लाख रुपये नकोत, पण अंकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुमच्या कुटुंबासोबत असा गुन्हा घडला तर तुम्ही काय कराल? अंकिता जर तुमची बहीण किंवा तुमची मुलगी असती तर तुमचं काय झालं असतं?"

मुख्यमंत्री धामी यांनी पौडी जिल्ह्यातील श्रीनगरमधील डोभ श्रीकोट गावात पोहोचून अंकिताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. यावेळी अंकिताला न्याय मिळवून देण्यासाठी उत्तराखंड सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

4. आरएसएस बंदीवर चर्चा व्हायला हवी - सुप्रिया सुळे

केंद्र सरकारनं पीएफआय संघटनेवर बंदी घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सुळे म्हणाल्या, "कुठलीही गोष्ट बॅन करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि ज्या गोष्टी देशात व्हाव्यात त्या संविधानाच्या चौकटीत व्हाव्या. नियम कायदे सगळ्यांना लागू हवे. पीएफआय़वर जी बंदी घातली आहे त्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे."

सु्प्रिया सुळे

पीएफआयनंतर आता आरएसएस बॅन करण्याची मागणी होतेय. या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, "मला वाटतं प्रत्येकाची मागणी असते. तर त्याची चर्चा तर झाली पाहिजे. त्यामुळे तो इन्स्टंट टॉपिक नाही. काही गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे."

5. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

आज कोकणातील तिन्ही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)