राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र आल्यास शिवसेनेच्या मराठी मतांचं काय होईल?

एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मनसे, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी सत्तागणितं जुळवणं सुरु झालं. एकनाथ शिंदेंचा बंडखोर आमदारांचा गट आणि भाजपा यांनी विधानसभेत गणित तर जुळवलं, पण ते तसं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जुळेलच असं नाही. त्यामुळे नव्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे. ती युती आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या मनसेची.

गेले काही दिवस ज्या वेगानं हालचाली होत आहेत आणि त्यासाठी गाठीभेटी होत आहेत, ते पाहता एकेकाळचे शिवसेनेतले हे दोन नेते आता त्या शिवसेनेबाहेर एकत्र येतील अशी शक्यता दाट आहे.

गणेशोत्सवात अगोदर शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दर्शनासाठी जाणं आणि लगेचच राज यांनी 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणं ही 'दर्शन डिप्लोमसी' नवी युती तयार होण्याचंच लक्षण आहे, हे स्पष्ट आहे.

या दोघांमधला दुवा आहे भाजपा. शिंदेंचं बंड होण्याच्या कैक महिने अगोदर भाजपा आणि मनसे यांची युती होणार असं म्हटलं जाऊ लागलं होतं. 2019 ला शिवसेनेच्या 'महाविकास आघाडी' प्रयोगानंतर भाजपाशी दुसऱ्या ठाकरेंशी जवळीक वाढली.

त्यानंतर अचानक एकनाथ शिंदेंचं बंड झालं. त्याला सेनेतलं अंतर्गत द्वंद्व जरी जबाबदार असलं, तरीही त्यातली भाजपाची भूमिका कालांतरानं समोर आली. शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केले.

एकनाथ शिंदेंच्या गटाला मूळ शिवसेना असे मानून त्यांच्याबरोबर पुढच्या निवडणुकांमध्ये आमची युती असेल असं देवेंद्र फडणवीसांनी वारंवार म्हटलं आहे.

पण भाजपाच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्था'च्याही वाऱ्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ती युतीही होणार हे निश्चित आहे. पण तिचं स्वरुप कसं असणार हे अद्याप स्पष्ट नाही.

भाजपा मनसेसोबत जाहीर युती करणार की अंतर्गत वाटाघाटींनी काही जागांवर एकमेकांशी प्रदर्शनीय स्पर्धा करुन काही त्या जागा तिथं ताकद असेल त्या मित्रासाठी सोडणार, असा तो प्रश्न आहे.

आता एक चर्चा अजून होते आहे की, एकनाथ शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल. ते जागा ठरवून एकत्र लढतील. प्रत्यक्षात भाजपा मात्र यांच्यासोबत युती करणार नाही.

असं झालं तर हेतू स्पष्ट आहे तो म्हणजे मराठी मतांमध्ये अधिक वाटे पडतील. मुंबईत मराठी आणि अमराठी मतं अशी सरळसरळ विभागणी आहे, हे सर्वांना माहित आहे. मराठी मतं मुंबई महानगरपालिकेसाठी बहुतांशानं शिवसेनेकडे गेली तीन दशकं जात आहेत.

राज ठाकरेंच्या 'मनसे'च्या स्थापनेनंतर त्यांच्याकडे त्यातला बराचसा भाग गेला, पण त्यानं शिवसेनेची सत्तेवरची पकड सैल होऊ दिली नाही. आता शिंदे गटाच्या निमित्तानं सेनेतला मोठा वर्ग पक्षाच्या, म्हणजे ठाकरे गटाच्या, बाहेर पडला आहे. त्यांची मुंबईतली मतांची संख्या अद्याप माहित नसली तरीही ती परिणामकारक असेल असं अनुमान आहे.

त्यामुळेच मराठी मतांमध्ये असे हिस्से तयार झाल्यानं स्पर्धा अटीटतीची होणार. प्रत्येक वॉर्डातलं बहुमत हे निसटतं असणार. अनेक वर्षं मराठीबहुल भागांमध्ये सहज निवडून येणाऱ्या शिवसेनेला आव्हान अधिक कठीण होणार, असा राजकीय तर्क लावला जातो आहे.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, facebook

असे तर्क सिद्ध होतात किंवा न होतात त्यासाठी निवडणुकाच व्हाव्या लागतील. पण त्या अगोदर अशी रणनीती सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उभ्या राहिलेल्या तीन पक्षांसाठी कशी फायद्याची वा तोट्याची ठरु शकेल याचा सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन अंदाज घेता येईल.

एकनाथ शिंदेंचा गट

शिंदेंच्या गटानं मूळ शिवसेनेवरच दावा केला असला तरीही मुंबईच्या जमिनीवर त्यांच्याकडे शिवसैनिक किती आले आहेत याचा अंदाज नाही.

शिवाय शिवसेनेचा मराठी मतदार या सगळ्या बंड प्रकरणानंतर किती विखुरला आहे आणि शिंदेंच्या बाजूला आला आहे, याचाही नेमका अंदाज नाही. पण एक निश्चित म्हणता येतं की शिंदें गटाचा मतदार हा शिवसेनेचाच पारंपारिक मतदार असणार आहे.

नवा मतदार तयार करण्यासाठी त्यांना वेळही मिळाला नाही आहे. एक तर शिंदेंचा शिवसेनेवरचा आणि 'धनुष्यबाण' या चिन्हावरचा दावा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.

शिवाय या सत्तांतराबातच्या, अपात्रतेच्या, घटनात्मक वैधतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे संघटनेतंही संभ्रम आहे की नेमकं कोणत्या दिशेला जायचं. तसंच मतदारांमध्येही आहे. असं म्हटलं जातं की निवडणूक आयोगानं चिन्हं कोणाचं किंवा ते गोठवायचं का हा निर्णय घेतल्यानंतर संघटनेत मोठी हालचाल पहायला मिळेल.

तोपर्यंत संयम आणि संभ्रम दोन्ही कायम राहील. तेच मतदारांसाठीही असेल कारण धनुष्यबाण म्हणजे शिवसेना हे आता मुरलेलं समीकरण आहे.

पण या दोन्ही स्थितीत मराठी मतदार हाच शिंदे गटाच्या उमेदवाराचाही कोअर मतदार असणार आहे. पण यानं या गटाचा काय फायदा होणार हेही पाहिलं पाहिजे.

एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मनसे, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे

जे प्रस्थापित नगरसेवक त्यांच्याकडे येतील, ज्यांचा स्वत:चा वॉर्ड हा वैयक्तिकरित्या बांधला आहे, त्यांची विजयाची खात्री अधिक असेल. नव्यानं उमेदवार देऊन शिंदे गटाचे किती विजयी होतील याबद्दल विविध कयास आहेत.

अशा स्थितीतही मराठी मतांचा एक हिस्सा मात्र या गटाकडे येऊ शकतो. कोणाच्याही विजयात वा पराभवात हा हिस्सा निर्णायक ठरु शकतो.

पण राज ठाकरेंची मनसे आणि शिंदे गट अशी एकत्र निवडणूक लढवली गेली तर दोघांचा एकत्र हिस्सा विजयाशी पोहोचेल असा निर्णायक असू शकतो. तो जिथं मनसे आणि शिवसेनेची, म्हणजेच मराठीबहुल, ताकद आहे तिथं दिसू शकतो.

ज्यांच्यासोबत शिंदेंनी सरकार स्थापन केलं त्या भाजपानं मुंबई महापालिकेसाठी 'मिशन 150' ची घोषणा केली आहे. जरी राज्यात भाजपानं शिंदे गटासोबत युती केली असल्याचं म्हटलं असलं तरीही या 150 मध्ये शिंदे गटाचे किती हे मात्र स्पष्ट केलं नाही.

शिंदे गटासाठी वॉर्डांच्या वाटाघाटी होणार आहेत की शिंदे गटाला आपल्या मित्रपक्षाशिवाय लढावं लागणार आहे, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

राज ठाकरेंची 'मनसे'

हे लपून राहिलं नाही आहे की 'मनसे'मधल्या मोठ्या वर्गाला भाजपासोबत युती करावी असं वाटतं आहे. राज ठाकरेंनीही अनेक भाजपा नेत्यांची बोलणी केली आहेत. पण अधिकृत युती होण्याची घोषणा अजूनही झाली नाही.

आणि आता जेव्हा शिंदे गटासोबत युती होण्याची चर्चा आहे, तेव्हा भाजपासोबत काय होणार याबद्दल पुन्हा अनिश्चितता आहे.

मनसेला स्थापनेनंतर मिळालेलं मोठं यश पुढच्या महापालिका निवडणुकींमध्ये कमी होत गेलं. गेल्या निवडणुकीत तर निवडून आलेले दहा नगरसेवक नंतर शिवसेनेत गेले. पण तरीही मुंबईत काही भागांमध्ये, मुख्यत्वाने मराठीबहुल, भागांमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद मोठी आहे.

त्यात राज ठाकरेंचा प्रभाव आहेच. शिवसेना वा भाजपाच्या तुलनेत मर्यादित भागात असलेली ही ताकद शिंदे गटासोबतच्या युतीनं वाढेल हे नक्की. त्याचा फायदा मनसेला होऊ शकतो. पण परत ही परत मराठी वा शिवसेनेचीच पारंपारिक मतं असल्यानं, नवीन कोणती मतं त्यांच्याकडे येतात हा प्रश्न आहेच.

राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांपासून केवळ मराठीचा मुद्दा न घेता विस्तार वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली. शिवाय उत्तर भारतीयांबद्दलही उदारमतवादी भूमिका घेतली. त्यांचे मेळावे घेतले.

एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मनसे, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे

हा पक्षाचा बेस व्यापक करण्याचाच प्रयत्न होता. त्यामुळे ते भाजपाच्याही जवळ जाऊ शकले. पण आता शिंदे गटासोबतच्या युतीमुळे, या रणनीतिवर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. मुख्यत: नवीन मतदार त्यांच्याकडे येतो की केवळ मराठी मतदारांचा एक हिस्साच येतो, याचं गणितही मनसेला मांडावं लागेल.

याशिवाय मनसे आणि शिंदे गटासमोर याही वास्तवाचा विचार असेल की सगळी मराठी मतं ही शिवसेनेची वा मराठीवादी पक्ष-नेत्यांची पारंपारिक मतं आहेत का? वास्तविक भाजपानंही आता मराठी मतांमध्ये मोठी ताकद तयार केली आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ते दिसलं आहे. शिवाय आताच्या आक्रमक रणनीतीचा फायदाही त्यांना होऊ शकतो. अशा वेळेस युतीमुळं आपल्याला काय फायदा होईल, विस्तार होईल असा विचार दोघांसमोर असेल.

भाजपला फायदा की तोटा?

या सगळ्या रचनेत भाजपाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांचं टागगेट उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. जर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असतील तर ते शिवसेनेच्या पारंपारिक मतदारांमध्येच हिस्सा तयार करतील. यामुळे अर्थातच सेनेच्या संख्येवर परिणाम होईल.

दुसरीकडे राज यांच्या पक्षासोबत अद्याप युती न करण्याचं अथवा महापालिका निवडणुकीच्या भविष्यापर्यंतही कदाचित ती न करण्याचं कारण सांगितलं जातं आहे ते भाजपाचा उत्तर भारतीय मतदार. कधी काळी कॉंग्रेसकडे मोठ्या संख्येनं असलेला हा मतदार आता 2014 नंतर भाजपाकडे खेचला गेला आहे.

त्याच्यावर भाजपाच्या बहुमताची मदार आहे. पण राज यांच्या सोबत असल्यानं तो मतदार नाखूष होऊ शकतो, हे उत्तर प्रदेश निवडणुकीवेळेचं समीकरण अद्यापही कायम असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शिंदे-मनसे युती करुन भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवेल, पण रणनीति एकत्र असेल, असं दिसतं आहे.

मराठी मतांमध्ये हिस्से तयार झाले तर त्याच्याही गणितात फायदा होऊ शकतो. शिवाय मोठा मराठी वर्गही भाजपा आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न करते आहे. गुजराती समाज हा त्यांचा पारंपारिक मतदार समजला जातो. त्यामुळे या गणितातून मिशन 150 पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

दुसरीकडे, मुंबईत मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रं हाती घेतल्यापासून कायम मराठी व्यतिरिक्त अन्य भाषिक मतदारही आपल्याकडे आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 'मी मुंबईकर' या कार्यक्रमापासून तो प्रयत्न दिसून येतो.

शिवसेनेचा मतदार आता मुंबईत बहुभाषिक झाला आहे. त्यामुळे कोणतीही गणितं बांधतांना त्याचा विचार करावा लागेल. पण सेना आता ज्या मराठी मतदारांमध्ये हिस्से निर्माण होणार आहेत, त्यातून वाचण्यासाठी काय करते हे पाहणंही महत्वाचं असेल.

'शिवसेना डाऊन असली तरीही अजून आऊट नाही'

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते सध्याच्या भेटीगाठी पाहता शिंदे आणि मनसे यांच्यात काही सकारात्मक घडतं आहे हे नक्की आहे आणि त्यामुळे मराठी मतांमध्ये विभागणी होऊ शकते. पण दुसरीकडे मराठी मतांचं एकत्रिकरणही या स्थितीत होऊ शकतं असं त्यांना वाटतं.

महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

"मुंबईमध्ये आता नाही तर पुन्हा नाही असं देवेंद्र फडणवीस परवा म्हणाले याचा अर्थ असा आहे की जिंकण्यासाठी त्यांना अजून ताकद हवी आहे. झालेल्या बंडामुळे सेना डाऊन आहे. पण आऊट नाही असं सध्या मुंबईत चित्र आहे. त्यामुळे नवे गट त्यांना हवे आहे. त्यामुळे शिंदे आणि मनसे एकत्र असणं आणि त्यांना मदत करणं अशी भाजपाची रणनीति दिसते आहे. त्याचं कारण हेही आहे की जरी शिंदेंना पक्ष मान्यता मिळाली किंवा नाही मिळाली तरी ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे म्हणून कोणतेही ठाकरे आपल्या बाजूला हवेत असं त्यांना वाटतं," देशपांडे म्हणतात.

"एक लक्षात घ्यायला हवं की मुंबईकर मराठी माणसाची मानसिक गरज ही शिवसेना आहे आणि त्याचा सेनेला नेहमी फायदा होत आला आहे. सध्या सगळ्या बाजूंनी शिवसेनेला कॉर्नर केल्यानं सहानुभूतीही आहे. शिवसेनेचं काडर अजून हललं आहे असं चित्र नाही. त्यामुळे मराठी मतांच्या विभागणीशिवाय एकत्रिकरणही होऊ शकतं. मुंबईत किमान 45 वॉर्ड असे आहेत जिथं सेनेला हरवणं अशक्य आहे. त्यासाठी त्यांना राज ठाकरे हवे आहेत," देशपांडे पुढे म्हणतात.

त्यामुळे शिंदे गट, मनसे आणि भाजपा यांच्या एकत्र येण्यामुळे नवं मराठी मतांचं आणी भाषिक राजकारणाचं गणित यंदा मुंबईत मांडलं जाणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे ते कधीच मांडलं गेलं नाही आहे. त्यामुळेच सगळ्या शक्यता केवळ शक्यता आहेत. येणाऱ्या दसरा मेळाव्यात याचं अधिक स्पष्ट चित्र कदाचित दिसू शकेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)