ऑल्ट बालाजीवर सैनिक पत्नीचे दाखवले अफेअर, एकता कपूर विरोधात अटक वॉरंट

फोटो स्रोत, Getty Images
बिहारच्या बेगूसरायमधील कोर्टाने प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
'XXX' नामक एका वेब सिरीजमध्ये सैनिकांना अपमानित केल्याच्या तसंच त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
PTI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, न्यायमूर्ती विकास कुमार यांच्या न्यायालयात माजी सैनिक शंभू कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना कपूर मायलेकींविरुद्ध अटक वॉरंट जारी केला.
बेगूसराय येथील रहिवासी शंभू कुमार यांनी 2020 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत आरोप केले होते की ट्रिपल एक्स वेब सिरीजच्या सीझन-2 मध्ये लष्करातील जवानांच्या पत्नींसदर्भात अनेक आपत्तीजनक दृश्य आहेत.
या प्रकरणात कोर्टाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांना समन्स पाठवलं होतं. तरीही त्या हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.
याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय?
शंभू कुमार यांचे वकील ऋषिकेश पाठक म्हणतात, "सदर सिरीज ऑल्ट बालाजी नामक ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली होती. हा प्लॅटफॉर्म एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालकीचा आहे. शोभा कपूर यासुद्धा बालाजी टेलिफिल्मशी संबधित आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पाठक म्हणाले, "कोर्टाने एकता कपूर आणि शोभा कपूर या दोघांनाही समन्स पाठवले होते. त्यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं. पण त्यांनी सिरीजमधून आक्षेपार्ह दृश्य हटवल्याचं कोर्टाला कळवलं. मात्र त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. यानंतर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे."
ट्रिपल एक्स सिरीजमध्ये लष्करात अधिकारी असलेल्या व्यक्तीची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड यांचे आक्षेपार्ह दृश्य आहेत.
या वेब सिरीजनंतर एकता कपूर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तसंच त्यांनी भारतीय लष्कर आणि त्यांच्या वर्दीचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण वाढत जाऊन एकता कपूर यांच्या अटकेची मागणी करण्यात येऊ लागली.

फोटो स्रोत, Getty Images
या वेब सिरीजसंदर्भात एकता कपूर यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे, सैनिकांचा अपमान करणे तसंच राष्ट्रीय चिन्हाचा दुरुपयोग करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिगबॉस सीझन 13 मध्ये स्पर्धक राहिलेला विकास पाठक (हिंदुस्तानी भाऊ) याने मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तर, गुरुग्राममध्ये मार्टियर वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक टी. राव यांनीही तक्रार दाखल केली.
कपूर मायलेकींविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आल्यानंतर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
इतकंच नव्हे तर कपूर यांचा पद्मश्री पुरस्कारही परत घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
एकता कपूर यांनी काय म्हटलं होतं?
ट्रिपल एक्स आक्षेपार्ह दृश्य प्रकरणात वाद वाढू लागल्यानंतर एकता कपूर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
त्यावेळी एकता कपूर म्हणाल्या होत्या, "एक नागरिक आणि एक संस्था म्हणून आम्ही भारतीय लष्कराचा प्रचंड आदर करतो. आपल्या संरक्षणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, यात कोणताच वाद नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त लष्करी संघटनेने मागणी केली तर आम्ही बिनशर्त माफी मागण्यास तयार आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणानंतर बलात्काराच्या धमक्या देण्यात येत असल्याबाबत एकता कपूर यांनी शोभा डे यांच्याशी चर्चा करताना म्हटलं, "अभद्र पद्धतीची सायबर बुलिंग आणि असामाजिक तत्त्वांमार्फत देण्यात येत असलेल्या बलात्काराच्या धमक्यांसमोर आम्ही झुकणार नाही."
यावेळी एकता कपूर यांनी सांगितलं की एका दृश्यामुळे केवळ त्यांनाच नव्हे तर 76 वर्षीय आई शोभा कपूर यांनाही धमक्या देण्यात येत आहे. ट्रोल्सचं हे कृत्य अत्यंत लज्जास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
एकता कपूर यांनी त्यावेळी म्हटलं, "शोमध्ये वादग्रस्त दृश्याचं चित्रण हे काल्पनिक होतं. आमच्याकडून चूक झाली. ती आम्ही सुधारली आहे. या प्रकरणात माफी मागण्यास मी तयार आहे. पण यासंदर्भात देण्यात येत असलेल्या धमक्या या अतिशय असभ्य आणि चुकीच्या आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








