कुनो : चित्ता भारतात आला, पण समोर आहेत 'ही' आव्हानं...

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाल्यानंतर आता ते नामिबियातून ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणणं म्हणजे गेल्या अनेक दशकांच्या आपली मेहनतीचं फळच मिळालं असं वन्यप्राणीतज्ज्ञांचं मत आहे.

या मोहिमेत गेली अनेक वर्षं भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ सहभागी होऊन काम करत होते.

17 सप्टेंबर रोजी एका भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या या 8 चित्त्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडलं. मात्र या मोहिमेत चित्ते आणून सोडणं हे एवढंच पुरेसं नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.

अर्थात सर्व चित्त्यांच्या गळ्यात कॉलर लावलेल्या आहेत आणि या जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे लक्षही ठेवलं जातंय.

सध्या हे चित्ते क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचा एक महिना पूर्ण झाला की त्यांना पुन्हा एकदा जंगलात सोडलं जाईल. परंतु मध्यप्रदेशातील वनरक्षकक आणि कुनो राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांसमोर काही प्रश्न निर्माण होणार आहेत.

या चित्त्यांचा इतर मांसाहारी प्राण्यांबरोबर संघर्ष होईल तेव्हा खरं आव्हान सुरू होईल, असं मध्य प्रदेश सरकारचे मुख्य वनरक्षक आणि चिफ वाइल्डलाईफ वॉर्डन जसवीर सिंह बीबीसीशी बोलताना म्हणाले.

चौहान म्हणाले, "अर्थात चित्ते येण्यापूर्वी आम्ही अनेक प्रकारची व्यवस्था केलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जंगलातील मोठ्या भागात लावलेले आहेत. नियंत्रण कक्ष बनवलेला आहे. त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवलं जातंय. जंगलात सोडल्यावर त्यांच्यावरचं लक्ष कमी होईल असं नाही. प्रत्येक चित्त्यासाठी एक वनरक्षक आहे आणि प्रत्येक चित्त्याला कॉलर लावलेली आहे. त्याद्वारे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाईल."

चित्ते आजूबाजूच्या गावात तर घुसणार नाहीत ना याची चौहान यांना जास्त काळजी आहे. त्यामुळेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि ग्रामस्थांनाही सतर्क करण्यात आलं आहे.

अनेक समस्या

भारतात आणलेले चित्ते हे आशियाई चित्ते नसून अफ्रिकन असल्यामुळे समस्या थोडी मोठी आहे, असं काही वन्यप्राणीतज्ज्ञांचं मत आहे. या दोन प्रकारच्या चित्यांच्या जनुकांमध्ये थोडासा बदल आहे.

अर्था अनेक वर्षं अभ्यास करुन हे चित्ते आणले गेले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते नामिबिया आणि विशेषतः दक्षिण अफ्रिकेतील चित्ते स्वबळावर इतर शक्तीशाली मांसाहारी प्राण्यांचा सामना कसे करतील? हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.

कुनोमध्ये बिबट्यांची संख्या भरपूर आहे, तिथं तरसही भऱपूर आहेत. तरस चित्त्यांपेक्षा ताकदवान असतात आणि चित्त्यांवर हल्लाही करतात.

चौहान म्हणतात, "तिथं बिबटे आहेत, तरसही आहेत. चित्त्यांना जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यापासूनही स्वतःचं रक्षण करावं लागतं. दक्षिण अफ्रिका आणि नामिबियामध्ये हे चित्ते सिंहांशी तसेच वाघांसारख्या मांसाहारी प्राण्यांबरोबरच राहात असत. या दोन्ही ठिकाणी तरस आहेत. तरस टोळी करुन राहात आणि चित्त्यांवर हल्ला करतात. पण कुनोमधले तरस टोळीत राहात नाहीत. त्यामुळे कुनोमध्ये चित्त्यांना फक्त बिबट्यांशी जमवून घ्यावं लागेल."

जाणकारांचं काय मत आहे?

या मोहिमेसाठी दोन दशकांहून अधिक काळ काम करणारे भारतीय वनसेवेचे माजी अधिकारी हरभजन सिंह पाबला हे प्राणीतज्ज्ञही आहेत आणि मध्यप्रदेशचे मुख्य वनरक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे.

पाबला यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "ज्याप्रकारे या चित्त्यांचा नैसर्गिक अधिवास दक्षिण अफ्रिका आणि नामिबियात आहे त्याच प्रकारचा अधिवास इथं तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अडचणी येता कामा नयेत."

चित्ता कॉन्झर्वेशन फंड या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक लॉरी मार्कर यांनी नामिबियातून बीबीसीशी साधलेल्या एका संवादात म्हणाले होते, "या प्रकल्पासाठी आम्ही विशेष मेहनत केली होती आणि सर्व काही नीट होईल अशी आम्हाला आशा आहे. हे चित्ते सिंह, बिबट्यांबरोबर राहिलेले आहेत. भारतातही ते रुळतील. जरा पाच-सात वर्षांचा काळ जाऊद्या, हा प्रकल्प वेगाने वाढेल."

या योजनेत सहभागी झालेल्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डिन यादवेंद्र देव यांनीही बीबीसीशी बोलताना याला एक आव्हानात्मक काम समजतात परंतु नामशेष झालेल्या प्राण्यांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताला एक मोठं यश मिळाल्याचंही ते मानतात.

या मुद्द्यावर तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आढळतात. प्रसिद्ध प्राणीतज्ज्ञ वाल्मिकी थापर यांनी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना, या चित्त्यांचा जंगलात अनेक शत्रूंशी सामना होईल आणि त्यांना शिकारीसाठी फारच कमी सावज मिळेल असं सांगितलं.

गवताळ प्रदेशांच्या अभावावरही थापर बोट ठेवतात. ते म्हणतात, की दक्षिण अफ्रिकेत चित्त्यांना पळण्यासाठी मोठे प्रदेश तसेच गवताळ प्रदेश उपलब्ध असल्यामुळे त्यांची तिथं मोठी संख्या आहे. इथं तसं नसल्याचं थापर सांगतात.

याला उत्तर देताना जसवीर सिंह चौहान सांगतात, "जेव्हा इथं गीरचे सिंह आणण्याचा विचार करण्यात येत होता तेव्हा राज्य सरकारनं मोठ्या भागाचं अधिग्रहण करुन ठेवलेलं होतं."

तसेच सुमारे 150 गावांना या प्रदेशातून काढून कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील प्रदेशात पुन्हा वसवलं आहे. त्या गावांच्या भागांना गवताळ प्रदेश म्हणून विकसित करण्यात आलं आहे.

जैवशास्त्रज्ञ आणि हैदराबादस्थित सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे विभागप्रमुख डॉ. कार्तिकेयन मात्र एक शंका वाटते. ती म्हणजे अफ्रिकेतून नव्या वातावरणात आणलेल्या चित्यांमध्ये प्रथिनांचा संसर्ग होऊ शकतो. इतरही प्रकारच्या संसर्गांची त्यांना शक्यता वाटते. चित्ते जखम किंवा संसर्ग सहन करू शकत नाहीत.

प्रसिद्ध वन्यप्राणीतज्ज्ञ आदित्य पंडा यांनी बीबीसीला सांगितलं, "इतक्या दशकांनी होत असलेली ही घटना म्हणजे एक प्रयोग आहे. प्रयोग सफल झाला तर चांगली गोष्ट आहे. जर नाही झाला तर त्यातून शिकायला मिळेल आणि नव्या चित्त्यांच्या आगमनापुर्वी त्याप्रमाणे बदल करता येतील."

पंडा म्हणाले, "जो शक्तीशाली आहे तोच वाचेल हेच जंगलाचा नियम सांगतो. चित्ते इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा कमजोर नक्कीच आहेत. पण इतर मांसाहारी प्राण्यांना याची सवय होईल. या योजनेवर अनेक दशकं काम चाललं ही चांगली गोष्ट आहे. सर्व काही अभ्यास करुनच केलं जात आहे. पुढेही यातून मार्ग निघत जाईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)