रामदास कदम : 'मातोश्रीला खोके नवीन नाहीत, आम्हाला तोंड उघडायला लावू नका'

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1.मातोश्रीला खोके नवीन नाहीत, आम्हाला तोंड उघडायला लावू नका - रामदास कदम
"मातोश्रीला खोके नवीन नाहीत. मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले, हे आम्हाला माहिती आहे," असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
तसंच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असल्याचं म्हणत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
"बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का," असा थेट सवाल रामदास कदम यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घ्यावा, हे आपलं मत आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धवजींकडे शरद पवार यांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असल्याचं रामदास कदम म्हणालेत.
2. अनिल परब यांचं रिसॉर्ट दिवाळीपूर्वी जमीनदोस्त करणार- किरीट सोमय्या
"ठाकरे सरकारमधील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्या अनिल परब यांचं ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही," असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
लोकमतने ही बातमी दिली आहे. भिवंडी भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर मित्र मंडळाने किरीट सोमय्या यांना गदा भेट म्हणून दिली. तीच गदा घेऊन परब यांच्या रिसॉर्टवर आपटणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"राज्यात जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राज्य आलं आहे. त्यामुळे आता मुंबईप्रमाणे भिवंडीतही मेट्रो धावेल," असं ते यावेळी म्हणाले.
3. एसी लोकल बंद करा- शरद पवार
ठाणे-बदलापूर-कळवा मार्गावरील लोकल बंद करा या प्रवाशांच्या मागणीत आता शरद पवारही सहभागी झाले आहेत. गर्दीच्या वेळी या लोकल चालवू नयेत. इतकं भाडं सामान्यांना परवडत नाहीय त्यामुळे रेल्वेने या लोकल चालवणं बंद केल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, "गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांचे हाल मी पाहतो आहे. त्यांना प्रवासासाठी इतका पैसा देणं परवडत नाही. त्यामुळे रेल्वेने साध्या लोकल पुन्हा या मार्गावर आणाव्यात. जर रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर मी स्वत: रेल्वेमंत्र्यांकडे जाईन," असं ते ठाण्यात बोलताना म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच ठाण्यात आले होते.
4. जीएसटीतून मिळणाऱ्या महसुलात पुन्हा एकदा वाढ
वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सरकारला जीएसटीतून 1,43,612 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या महसुलात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयातीतून मिळणाऱ्या महसुलात 57% कपात झाली आहे. तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात 19 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या सहा महिन्यात जीएसटीतून मिळणाऱ्या महसुलात सातत्याने वाढ होत आहे, असं अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी जीएसटी संकलनात 33 टक्के वाढ झाली आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.
5. 'भारत जोडो' अभियान काँग्रेसचं तरी कुठे राहिलं - पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर सातत्याने उघड नाराजी व्यक्त करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या प्रस्तावित आणि बहुचर्चित अशा 'भारत जोडो' यात्रेमध्ये आपण जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
"आता ही यात्रा कॉँग्रेसची तरी कुठे राहिली. योगेंद्र यादव सांगत फिरतात मी भारत जोडो यात्रा काढतो आहे अन् काँग्रेस माझ्यासोबत आहे," असा टोला चव्हाण यांनी लगावला.
मध्यंतरी चव्हाण यांनी गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. त्याबाबत खुलासा करताना त्यांनी मी कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असंही म्हटलंय. सकाळ ने ही बातमी दिली आहे.

चव्हाण म्हणाले की, "माझ्याविरोधात प्रतिक्रिया याव्यात यासाठी पक्षाच्या मुख्यालयात बसलेले काही नेते कामाला लागले आहेत. या सगळ्या नेत्यांवर मोदींची छाप आहे, पक्षाची घसरण व्हायला तेच कारणीभूत आहेत. माझी भूमिका स्पष्ट आणि पक्षहिताची आहे. पक्षात घटनेप्रमाणेच कार्यकारिणीच्या निवडणुका झाल्यात असे म्हणणाऱ्या नेत्यांसोबत मी टीव्हीवर खुली चर्चा करायला तयार आहे. गुलाम नबी आझाद हे पक्ष सोडून बाहेर पडले असले तरी ते देशव्यापी राजकारण करणार नाहीत. त्यांचा पक्ष केवळ जम्मू काश्मीरपुरताच मर्यादित असेल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








