NCRB अहवाल : भारतात स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या आत्महत्येत 17 टक्क्यांनी वाढ

फोटो स्रोत, Getty Images
2021 वर्षांत भारतात 1 लाख 64 हजार 33 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालात करण्यात आली आहे.
आत्महत्या केलेल्यांमध्ये चारपैकी एक व्यक्ती रोजंदारीवर काम करणारा मजूर असल्याची माहितीही स्पष्ट झाली आहे.
आत्महत्या केलेल्या एकूण संख्येपैकी 25.6 % मृत व्यक्ती मजूर असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
NCRB च्या अहवालानुसार 2021 मध्ये एकूण 42 हजार 4 रोजंदारी मजूरांनी आत्महत्या केली. मृतांमध्ये महिलांची संख्या 4 हजार 246 इतकी होती.
शिवाय, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एक मोठं प्रमाण स्वयं-रोजगार करणाऱ्यांचंही आहे.
या वर्गातील एकूण 20 हजार 231 जणांनी आत्महत्या केली. एकूण संख्येपैकी हे प्रमाण 12.3 % इतकं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या अहवालात शेतीशी संबंधित मजूरांची आकडेवारी ही रोजंदारीवर मिळेल ते काम करणाऱ्या मजूरांपेक्षा वेगळी मोजण्यात आली आहे.
त्यांचं वर्गीकरण शेतीशी संबंधित व्यवसायांत काम करणाऱ्या व्यक्ती अशा गटात करण्यात आलं आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या गटातील 10 हजार 881 जणांनी 2021 या वर्षात आत्महत्या केली. यामध्ये 5 हजार 318 जण शेतकरी होते. तर 5 हजार 563 जण शेतमजूर होते.
इतर गटात किती आत्महत्या?
अहवालानुसार, 2021 मध्ये प्रोफेशनल किंवा वेतनधारी गटात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 15 हजार 870 इतकी आहे.
तसंच 13 हजार 714 बेरोजगार व्यक्ती आणि 13 हजार 89 विद्यार्थ्यांनीही या वर्षात आत्महत्या केल्याचं आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
2021 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 23 हजार 179 गृहिणींचाही समावेश आहे.
यामध्ये कोणत्याही गटात न मोडणाऱ्या व्यक्तींना इतर गटात घालण्यात आलेलं आहे. या गटातील 23 हजार 547 जणांनी आत्महत्या केली आहे.
ही आकडेवारी फक्त आत्महत्या केलेल्या व्यक्तींचा व्यावसायिक पेशा सांगते. त्याचा आत्महत्येच्या कारणाशी कोणताच संबंध नाही, असंही अहवालात सांगण्यात आलेलं आहे.
आत्महत्या केलेल्या 42 हजार 4 मजूरांपैकी सर्वाधिक प्रमाण तामिळनाडू राज्यात आहे. या ठिकाणी 7 हजार 673 जणांनी आत्महत्या केली. खालोखाल महाराष्ट्रात 5 हजार 270, मध्य प्रदेशात 4 हजार 657, तेलंगण राज्यात 4 हजार 223, केरळमध्ये 3 हजार 345 तर गुजरातमध्ये 3 हजार 206 जणांनी आत्महत्या केली.
दरवर्षी वाढणारी आकडेवारी
NCRB ने गेल्या पाच वर्षांत वाढणाऱ्या आत्महत्येची आकडेवारीही प्रसिद्ध केली.
2017 मध्ये देशात 1 लाख 29 हजार 887 जणांच्या आत्महत्येची नोंद झाली होती. त्यावेळी आत्महत्या दर 9.9 इतका होता.

फोटो स्रोत, Getty Images
प्रति लाख लोकसंख्येमागे किती जणांनी आत्महत्या केली, याचा बोध आत्महत्या दरातून होतो. म्हणजे, 2017 मध्ये एक लाख लोकसंख्येत 9.9 आत्महत्यांची नोंद करण्यात आली.
2018 मध्ये आत्महत्या दर वाढून 10.2 वर गेला. यावर्षी 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली.
2019 मध्ये एकूण 1 लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. तर 2020 मध्ये हीच संख्या वाढून 1 लाख 53 हजार 52 वर पोहोचली.
ताज्या आकडेवारीनुसार, 2021 वर्षात 1 लाख 64 हजार 33 जणांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
रोजंदारी मजूरांच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढलं
2020 मध्ये 37 हजार 666 रोजंदारी मजूरांनी आत्महत्या केली. यावर्षी या गटातील आत्महत्येचं प्रमाण 11 टक्क्यांनी वाढलं आहे.
याचप्रमाणे, 2020 मध्ये आत्महत्या करणाऱ्या सेल्फ-एम्प्लॉईड लोकांची संख्या 17 हजार 332 होती. 2021 वर्षात यात सुमारे 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आकडेवारीचं प्रमाण पाहता, ज्या गटात आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण घटलं, असा गट आहे, बेरोजगार व्यक्तींचा.
2020 मध्ये 15 हजार 652 बेरोजगारांनी आत्महत्या केली होती. तर 2021 मध्ये 13 हजार 714 जणांनी आत्महत्या केल्याचं नोंदवण्यात आलं आहे. म्हणजे यावर्षी हे प्रमाण 12 टक्क्यांनी घटलं आहे.
आत्महत्येची योग्य आकडेवारी
मानसिक आजार आणि आत्महत्या रोखण्याबाबत संशोधन करणारे डॉ. पढारे यांनी गेल्यावर्षी याविषयी बीबीसीला माहिती दिली होती.
त्यांच्या मते, भारतात अधिकृत आकडेवारी चुकीची आहे, असं समजलं जातं. तसंच ही आकडेवारी समस्याही पूर्णपणे समोर आणत नाही.
त्यांनी सांगितलं होतं की, "तुम्ही जर मिलियन डेथ स्टडी (यामध्ये 1998 ते 2014 दरम्यान 24 लाख घरांमध्ये सुमारे 1 कोटी 40 लाख जणांचा अभ्यास केला होता.) किंवा लॅन्सेटचा अभ्यास पाहिला, तर भारतातील आत्महत्यांची नोंद कमी प्रमाणात केली जाते."

फोटो स्रोत, Getty Images
"आत्महत्येवर अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. याला कलंक समजलं जातं. बहुतांश कुटुंब ते लपवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भारतात शवविच्छेदनाचं प्रमाण कमी आहे. तसंच श्रीमंत स्थानिक नागरीक पोलिसांशी संगनमत करून आत्महत्येची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करून घेतात. याठिकाणी पोलिसांची नोंद तथ्याला धरून नसते."
डॉ. पठारे त्यावेळी म्हणाले होते, "भारतात होणाऱ्या आत्महत्यांची आकडेवारी पाहिली, तर ते प्रमाण अत्यंत कमी आहे. जगभरात प्रत्यक्ष संख्या 4 ते 60 टक्क्यांनी जास्त असते. भारतात गेल्या वर्षी दीड लाख प्रकरणं नोंदवण्यात आली, म्हणजे हे प्रमाण 6 लाख किंवा 60 लाखांपर्यंत असू शकतं."
डॉ. पठारे यांच्या मते, "आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी त्याची नेमकी आकडेवारी मिळणं गरजेचं आहे. पण चुकीच्या आकडेवारीमुळे हे काम योग्य प्रकारे करता येत नाही."
2030 पर्यंत जगभरात होणाऱ्या आत्महत्याचं प्रमाण एक तृतीयांशने कमी करावं, असं उद्दीष्ट संयुक्त राष्ट्र संघटनेने डोळ्यांसमोर ठेवलं आहे.
पण गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्महत्येचं प्रमाण 10 टक्क्यांनी वाढल्याचंच दिसून येतं. ते कसं कमी होणार हा प्रश्न आहे.

महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








