जयंत पाटीलः एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली #5मोठ्याबातम्या

एकनाथ शिंदे जयंत पाटील

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. -

1. एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली - जयंत पाटील

"आपली दहीहंडी सगळ्यांच्या समोर फुटत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी गुप्तपणाने, चोरून, कुठेतरी जाऊन फोडली आहे, त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही", अशा शब्दात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

पुण्यातील धायरी येथे रुपाली चाकणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील 50 थरांची हंडी फोडली होती. यादरम्यान त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता.

याच भाषणावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, " आपली दहीहंडी पाहण्यासाठी किमान 15 ते 20 हजार लोक जमले आहेत. ही दहीहंडी सगळ्यांच्या समोर फोडली जात आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी ही गुप्तपणाने, चोरून कुठेतरी जाऊन फोडलेली आहे. त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, त्यामुळे ती काही खरी दहीहंडी नाही." ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. बिल्किस बानो प्रकरणात दोषींची सुटका रद्द करा, सहा हजार जणांचं सुप्रीम कोर्टात निवेदन

सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

बिल्किस बानो यांनीदेखील "आपल्यावर अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या 11 दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे,'' अशी प्रतिक्रिया दिली होती.

बिल्किस बानो

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, बिल्किस बानो

दरम्यान, या निर्णयाचा निषेध करत अनेक प्रसिद्ध मंडळींनी दोषींची सुटका रद्द करण्याची मागणी एका निवेदनामार्फत केली आहे. दोषींची सुटका करणं अन्याय असून न्यायाशी प्रतारणा असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

तब्बल 6 हजार जणांनी या निवदेनावर स्वाक्षरी केली असून, यामध्ये सामान्य नागरिक, तळागाळात काम करणारे कर्मचारी, मानवाधिकार कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक, इतिहासकार, विद्वान, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार आणि माजी नोकरशहा यांचा समावेश आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. भाजपला अरविंद केजरीवाल यांना संपवायचं आहे, आपचा आरोप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी (19 ऑगस्ट) CBI ने धाड टाकली. यावरून आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, facebook

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रगतीची भीती वाटते. केजरीवाल यांनी 135 कोटी देशवासीयांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. त्यांची लाट रोखणं इतकं सोपं नाही. या देशातील सामान्य माणूस खूप हुशार आहे," असं आप नेते राघव चढ्ढा यांनी म्हटलं.

मनीष सिसोदिया यांच्या घरांवर CBI चा छापा हा निव्वळ योगायोग नाही, भाजपला अरविंद केजरीवाल यांना संपवायचं आहे, अशी टीका चढ्ढा यांनी केली. ही बातमी लोकमतने दिली.

4. नागपुरात पराभव दिसू लागल्याने फडणवीसांची पुण्यात चाचपणी - रुपाली पाटील ठोंबरे

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचा दावा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

2024 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून भाजपची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी एका पत्राद्वारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली होती.

याच मुद्द्यावरून रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पाटील-ठोंबरे म्हणाल्या, "अकार्यक्षमतेमुळे भाजपाने मुख्यमंत्रिपदी नाकारलेले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरी उघडा पडला आहे. नागपूरमध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे?" असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई कुणाच्या साहेबांची नाही - नितेश राणे

"वरळीमध्ये उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कुणी करू नये. मुंबई ही कुणाच्या साहेबांची नाही. मुंबई ही असंख्य सर्वसामान्य मुंबईकरांची आहे, हे लक्षात ठेवावं," अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

वरळी येथील जांबोरी मैदानात सचिन अहीर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी दहीहंडी आयोजित करण्यात येत होती. पण यंदा भाजपकडून या मैदानात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरून राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोमणा मारल्याचं पाहायला मिळालं.

राणे म्हणाले, वरळीच भाजपला आव्हान देण्याची हिंमत कुणीही करू नये, विधानसभेत साधं मी म्याव म्याव आवाज काढल्यानंतर काय अवस्था झाली होती, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कुणीही करू नये." ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)