नितीश कुमार 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का?

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'2014 ला निवडून आलात म्हणून 2024मध्ये सगळं आलबेल समजू नका. बघा आता काय होतंय ते!' असं नितीश कुमार काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना दिलेला तो इशाराच होता.

विधानसभेत भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रीय जनता दलाशी त्यांनी संधान बांधलं यामागे नेमकं कारण काय यावरही राजकीय चर्चा सुरू आहे. म्हणजे काहींच्या मते भाजपा आपला पक्ष फोडेल याची भीती वाटल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. तर काहींच्या मते नितीश यांना भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय राजकारण खुणावतंय.

म्हणजेच 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांची नितीश आणि भाजपाच्या इतर विरोधकांनी खेळलेली ही राजकीय खेळी आहे. पण, खरंच नितीश नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतील का या प्रश्नाचा घेतलेला आढावा.

नितीश यांना दिल्ली खुणावतेय?

काल (11 ऑगस्ट 2022) ला नितीश यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा काही गोष्टी त्यांनी स्वत:च स्पष्ट केल्यात. भाजपाची राज्यात साथ का सोडली हे सांगताना नितीश म्हणतात,

'भारतीय जनता पार्टीने कायम जनता दल युनायटेडचा पराभव कसा होईल हेच पाहिलं. मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हतो. पण, माझ्यावर त्यासाठी दबाव टाकला. आणि पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंच.'

पुढे जाऊन केंद्रीय राजकारणाबद्दल बोलताना नितीश म्हणाले,

'विरोधी पक्षांचा विरोध प्रबळ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. देशातून विरोधी पक्ष हद्दपार व्हावेत असा काहीजणांचा प्रयत्न आहे. पण, मी तसं होऊ देणार नाही. विरोधी पक्षाचं बळकटीकरण आवश्यक आहे.'

सुरुवातीपासून नरेंद्र मोदींना असलेला नितीश यांचा विरोध आणि आता त्यांच्याकडूनच 2024च्या निवडणुकीचा झालेला उल्लेख यामुळे राष्ट्रीय पातळीवरही आता चर्चा सुरू झाली आहे की, 71 वर्षीय नितीश कुमार दिल्लीत नरेंद्र मोदींना आव्हान उभं करू शकतील का, किंवा विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ते समोर येऊ शकतात का?

नितीश कुमार विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का?

71 वर्षीय नितिश कुमार 1977मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकले. आणि 1989 पासून ते सलग लोकसभेत निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी काही काळ रेल्वेमंत्री आणि कृषिमंत्री म्हणूनही काम केलंय. या सगळ्या काळात राष्ट्रीय पातळीवर नितीश यांचा हिंदी पट्ट्यातला आघाडीचा नेता अशीच ओळख होती.

2014च्या निवडणुकीपूर्वी त्यांची पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणूनही चर्चा झाली होती. पण, नरेंद्र मोदींची तेव्हा हवा होती. आणि नेमकं नितीश यांचं मोदींशीच पटायचं नाही. त्यामुळे पंतप्रधान पदाची स्पर्धा सोडाच नितीश राष्ट्रीय राजकारणातूनच या काळात बाहेर पडले.

तसंही 2005 पासून त्यांची राजकीय कारकीर्द बिहारपुरतीच मर्यादित राहिली होती.

आता मात्र दिल्लीतलं राजकारण त्यांना खुणावतंय असं दिसतं. राहुल गांधी सध्या काँग्रेस पक्षाचंच नेतृत्व करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. शरद पवार निवडणूक लढतील की नाही हे ही सांगता येत नाही. तर ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि दक्षिणेतले केसीआर यांना देशभरात मान्यता मिळेल का हे सांगता येत नाही. मग विरोधकांना नितीश कुमार हा पर्याय चालू शकेल का?

नितीश यांच्या जमेच्या आणि विरोधी बाजू

त्यांच्यासाठी जमेच्या बाजू म्हणजे धर्मनिरपेक्ष विचार आणि राजकारणाची त्यांना असलेली बैठक, आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असलेली कामाची धडाडी. बिहारमध्ये महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. पंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आणणारं बिहार हे पहिलं राज्य आहे.

तर रेल्वेमंत्री असताना ऑनलाईन तिकीट आरक्षण, रेल्वे कार्यालयांचं संगणकीकरण ही कामं त्यांनी तत्परतेनं पूर्ण केली. तर देशातील सहा बंदरांना रेल्वेनं जोडणारे मार्ग कमीत कमी वेळात उभं करताना त्यांनी कार्यतत्परताच दाखवून दिली.

दुसरीकडे, त्यांच्या विरोधात जाणारे मुद्देही आहेत.

यात पहिला आहे त्यांची राजकीय धरसोड वृत्ती - राजकारणात वारंवार दलबदल म्हणजे आपली बाजू बदलणाऱ्याची विश्वासार्हता राहात नाही असं म्हणतात. नितीश कुमार यांच्याबाबतीत हा अनुभव सगळ्यांनीच घेतलाय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर असताना ते नरेंद्र मोदींचं गुणगान करतात. आणि बिनसलं की, त्यांच्याचवर टीका करतात. बिहारमध्येही एकेकाळचे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव यांच्याच पक्षाशी ते अधून मधून संपर्कात असतात आणि युतीही करतात.

तरीही द हिंदूच्या सहयोगी संपादक स्मिता गुप्ता यांच्यामते इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नितीश कुमार उजवे आहेत.

'धरसोड वृत्ती सोडली तर इतर अनेक गोष्टी नितिश यांच्या बाजूने आहेत. एक तर त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. बिहारमध्ये गुंडगिरी कमी करताना आणि महिलांसाठी त्यांनी केलेलं काम आणि नेता म्हणून त्यांची प्रतिमा या गोष्टी त्यांच्यासाठी खूपच जमेच्या आहेत.'

सर्वमान्यतेचा अभाव - 2014 पासून नरेंद्र मोदींच्या विरोधात एकही नेता उभा राहू शकला नाही. कारण, अशा कुठल्याही नेत्याला सर्वमान्यता नव्हती. ते फक्त आपापल्या राज्यांत लोकप्रिय होते. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या नावाला काँग्रेसचा पाठिंबा नव्हता. तसंच नितीश कुमार यांच्या बाबतीतही आहे. काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण, इतरांचा पाठिंबा राष्ट्रीय स्तरावर त्यांना मिळेल का हा प्रश्नच आहे.

वाढतं वय - 2024मध्ये नितीश 73 वर्षांचे होतील. आणि त्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ म्हटलं तरी 78 वर्षांचे होईपर्यंत त्यांना सक्रिय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. आणि ही गोष्ट त्यांच्या विरोधात जाऊ शकते.

या पलीकडे जाऊन नितीश यांच्या उमेदवारीची शक्यता काय आहे जाणून घेऊया राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्याकडून…

त्यांच्यामते, सध्या देशभरात नरेंद्र मोदींना राजकीय विरोध करू शकेल असा नेता विरोधी पक्षांना हवा आहे. हीच नितीश यांची जमेची बाजू आहे. ते म्हणतात, 'विरोधी पक्षांमध्ये सध्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे, हे खरंच आहे. आणि नरेंद्र मोदी यांना हरवू शकेल, आव्हान उभं करू शकेल असं नेतृत्व त्यांना हवं आहे. केसीआर रेड्डी यांना तर भाजपा चालेल पण, त्यात मोदी नको अशी परिस्थिती आहे. अशावेळी नितीश कुमार हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. दुसरं म्हणजे काँग्रेस बिहारमध्ये नितीश यांना पाठिंबा देऊ शकतो तर केंद्रात का देणार नाही.?'

हे मुद्दे मांडतानाच 2024 ची सार्वत्रिक निवडणूक उत्कंठा वाढवणारी ठरणार असल्याचंही मत अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)