'चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा, नाहीतर...' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. 'चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा, अन्यथा...'
'यापुढे माझ्यावर जर आरोप झाले तर कायदेशीर मार्गाने उत्तर देईन', असं मंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
"ज्या प्रकरणात माझ्यावर आरोप झालेले आहेत त्यामध्ये माझी पोलिसांनी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतरच माझा नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मलाही माझा परिवार आहे, मी अनेक वर्षं राजकारणात आहे. या प्रकरणात चित्रा वाघ यांना सगळ्या गोष्टींची माहिती नाही. त्यामुळे यापुढे जर माझ्यावर आरोप झाले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार," असं राठोड म्हणाले आहेत.
एबीपी माझनं हे वृत्त दिलं आहे.
शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतरच मी मंत्रिपदाची शपथ घेतली, असंही संजय राठोड म्हणालेत.
टीव्ही-9ने दिलेल्या वृत्तानुसार चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असं आवाहन बंजारा समाजानं केलं आहे.
'दोन दिवसात राठोड यांच्यावरील टीका वाघ यांनी थांबली नाही तर बंजारा समाज रस्त्यावर उतरले,' असा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
2. काही लोक काळ्या जादूचा अवलंब करतायत - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रसवर काळ्या जादूचा आरोप केला आहे. ट्वीट करत मोदींनी ही टीका केली आहे.
"काही लोक काळ्या जादूचा अवलंब करतातय. ते निराशा आणि नकारात्मकतेत बुडलेले असतात. काळ्या जादूचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं आपण सर्वांनी 5 ऑगस्ट रोजी पाहिलं. या लोकांना वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल," असं मोदींनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेसकडून ५ ऑगस्ट रोजी देशभर आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला होता.
सकाळनं ही बातमी दिली आहे.
3. उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमार वागले, आता बघाच - नवनीत राणा
'महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारून एक-एक करून पक्ष सोडला, आता त्याचप्रमाणे नितीश कुमार यांना सुद्धा आमदार सोडून जातील हे बघाच,' असं भाकीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी वर्तवलं आहे.

फोटो स्रोत, Ganesh Pol/BBC
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत नितीश यांनी मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन केलं आहे. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवनित राणा बोलत होत्या.
महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.
4. रुपी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द
पुण्याच्या रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे.
लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत, बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे, अशी कारणं आरबीआयनं दिलेली आहेत.
दरम्यान, ही बँक अन्य बँकेत विलीन करण्यासाठी आतापर्यंत बरेचसे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बँकेच्या प्रशासकांना यश मिळालं नाही. बँकेची स्थिती 21 सप्टेंबर 2022 पर्यंत 'जैसे थे' राहणार आहे. या काळात ठेवीदार आणि सेवकांना विश्वासात घेऊन आणि वैधानिक सल्ला घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असे बँकेच्या प्रशासकांकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मेहसाणा को. ऑप. बँक आणि सारस्वत बँकेने रुपी बँक विलीनीकरणाचे प्रस्ताव आरबीआयकडे सादर केले होते. मात्र, आरबीआयकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही.
5. गोल्ड मेडल गुंडाळून ठेवण्यासाठी अचिंतच्या आईने साडी फाडली
कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकून घरी पोहोचलेल्या अचिंत शेऊलीच्या आईनं त्याने आणणलेल्या मेडेलला सुरक्षित ठेवण्यासाठी तिची साडी फाडून स्टोल तयार केल्याचं वृत्त द क्विंटनं दिलं आहे.

फोटो स्रोत, ANI
साडीच्या एका तुकड्यात अचिंतच्या आईनं त्याचं गोल्ड मेडल सुरक्षित जपून ठेवलं आहे.
अचिंतला आता कपाट घ्यायला सांगणार असल्याचंही त्याची आई पूर्णिया शेऊली यांनी म्हटलं आहे. अचिंत आल्यानंतर त्याला पाहायला लोक आणि पत्रकार येतील म्हणून अचिंतच्या आईनं त्यांच्या 2 लोख्यांच्या घरामध्ये एका स्टुलवर कॉमनवेल्थचं मेडेल आणि ट्रॉफी सजवून ठेवली होती.
अचिंतच्या वडिलांनंतर त्याला इथपर्यंत पुढे पाठवणं कठिण होतं, असंसुद्धा पूर्णिया शेऊली यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








