मेघालय : फार्म हाऊसवर 'वेश्यालय' चालवणाऱ्या भाजप नेत्यास अटक

फोटो स्रोत, Dilip Sharma/BBC
- Author, दिलीप कुमार शर्मा
- Role, बीबीसी हिंदीसाठी, गुवाहाटीहून
मेघालयचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष बर्नार्ड एन. मराक यांना फार्महाऊसवर सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "बर्नार्ड एन. मारोक उर्फ रिंपू यांना उत्तर प्रदेशातील हापूर येथून मंगळवारी (26 जुलै) अटक करण्यात आली. येथून त्यांना मेघालयच्या तुरा येथे नेलं जाणार आहे, अशी माहिती वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याची पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी दिली आहे."
मेघालयात मारोक यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मारोक यांना सर्वप्रथम हापूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. त्यानंतर त्यांना मेघालयकडे नेण्यात येईल.
छापेमारीत सुमारे 73 जणांना अटक
मेघालय पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या तुराच्या जवळील एका फार्म हाऊसवर छापा मारला. तिथं कथितरित्या 'देहविक्री' सुरू असल्याचे दिसले. इथून सहा अल्पवयीनांना सोडवण्यात आलं, तर 73 जणांना अट करण्यात आलं. अल्पवयीनांमध्ये चार मुलं आणि दोन मुली होत्या.
या फार्महाऊसवरुन दारूच्या बाटल्या, वापर न करण्यात आलेले 500 काँडम्स जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्येही एक अल्पवयीन आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या फार्म हाऊसमध्ये देहविक्री केली जात होती, त्याचे मालक बर्नार्ड एन. मराक उर्फ रिम्पू हे आहेत.
बर्नार्ड एन. मराक हे मेघालय प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. गारो हिल्स जिल्हा परिषदेचे ते सदस्यही आहेत. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राजकीय सुडातून हे आरोप करण्यात आले आहेत असं त्यांनी म्हटलंय.
वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह राठोड यांनी या घटनेला दुजोरा देताना बीबीसीला सांगितलं की, "आमच्याकडे रिम्पू बागान नामक फार्म हाऊसमध्ये देहविक्री चालत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याआधारे पोलिसांनी बर्नार्ड एन. मराक यांच्या मालकीच्या या फार्म हाऊसवर छापा मारला. ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू राहिली."
पोलीस अधीक्षक राठोड पुढे म्हणाले, "ज्या फार्म हाऊसमध्ये देहविक्री सुरू होती, त्याचा मालक बर्नार्ड एन मराक उर्फ रिम्पू हा आहे. तोच देहविक्रीचा व्यवसाय चालवत होता. आम्हाला तिथं रजिस्टर सापडली, त्यानुसार, 2020 पासून देहविक्री चालवली जात होती. हे सर्व बेकायदेशीरपणे सुरू होतं. त्यामुळे त्याची कुठलीही नोंद ठेवली गेली नव्हती."
पोलिसांचं म्हणणं काय आहे?
या संपूर्ण घटनेत गुन्हा दाखल करण्याशी संबंधित प्रश्न पोलिसांना विचारलं असता, ते पोलीस अधीक्षक राठोड म्हणाले, "आम्ही फार्म हाऊसमधून सहा अल्पवयीन मुलांना सोडवलं. यात चार मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. सुरुवातीला या प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाशी संबंधित फेब्रुवारीतच गुन्हा दाखल करण्यात आला होता."

फोटो स्रोत, Dilip Sharma/BBC
"कारण तिथल्या एका खोलीत एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलीनं कोर्टात आपला जबाबही नोंदवला होता. आताची छापेमारी त्याच माहितीच्या आधारावर करण्यात आली होती. मात्र, नंतर सापडलेल्या गोष्टी आणि माहितीच्या आधारावर पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत नवे गुन्हे दाखल केले."
पोलिसांच्या माहितीनुसार, "ज्या अल्पवयीन मुलांना सोडवण्यात आलं, ते सगळेजण एका अत्यंत घाणेरड्या खोलीत बंद होते."
या छापेमारीत पोलिसांनी 27 वाहनं, 30 हजारांची रोख रक्कम, 500 पॅकेट्स कंडोम आणि दारूच्या 400 बॉटल्स जप्त केले.
या छापेमारीतून सोडवण्यात आलेल्या मुलांना सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याकडे या मुलांची जबाबदारी देण्यात आलीय. पोलिसांनी छापेमारीदरम्यान अनेक तरुण आणि तरुणींना विवस्र अवस्थेत दारू पिताना पकडलं.
फार्म हाऊसवर छापा
ज्या फार्म हाऊसवर छापा मारण्यात आला, तिथं 30 खोल्यांची तीन मजली इमारत आहे. यावेळी पोलिसांनी फार्म हाऊसचे व्यवस्थापक, केअर टेकर आणि तीन कर्मचाऱ्यांनाही अटक केलीय.
फार्म हाऊसचे मालक आणि भाजपचे नेते बर्नार्ड एन मराक फरार आहेत. पोलिसांनी मारक यांना चौकशीला सहकार्य करण्याचं आणि शिलॉन्ग सदर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलंय.

फोटो स्रोत, Dilip Sharma/BBC
भाजप नेते मराक यांनी शुक्रवारी पत्रक जारी करत म्हटलं की, "मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या फार्म हाऊसवर छापेमारी करण्यात आली."
माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचाही आरोप मराक यांनी केला.
"मुख्यमंत्री संगमा हे निराश आहेत, कारण त्यांना कळलंय की, ते दक्षिण तुराची जागा भाजपकडून पराभूत होणार आहेत," असं मराक म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "जेव्हा मी शहरात नव्हतो, तेव्हा माझ्या फार्म हाऊसवर छापा मारण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला. हा राजकीय सूडाचा प्रकार आहे. दुसरं काहीही नाही."

फोटो स्रोत, Dilip Sharma/BBC
फार्म हाऊसवर देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे आरोप मराक यांनी फेटाळलेत.
फार्म हाऊसच्या छापेमारीवर मेघालय भाजपने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाहीय.
राजकारणात येण्यापूर्वी....
राजकारणात येण्यापूर्वी मराक हे मेघालयमधील एका कट्टरतावादी संघटनेचे नेते होते.
मेघालय पोलिसांच्या माहितीनुसार, बर्नार्ड एन. मराक उर्फ रिम्पू अचिक नॅशनल व्हॉलंटरी काऊन्सिल (बी) नावाच्या कट्टरतावादी संघटनेचे अध्यक्ष होते. या संघटनेवर 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
सध्या ही कट्टरतावादी संघटना बरखास्त करण्यात आलंय.
मेघालयमध्ये कोनराड संगमा यांच्या नेतृत्त्वात सध्या नॅशलन पिपल्स पार्टी (एनपीपी) चं सरकार आहे. भाजप या सरकारमध्ये सहकारी पक्ष आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









