राष्ट्रपती निवडणुकीत इंदिरा गांधींच्या उमेदवाराने काँग्रेसच्याच उमेदवाराला पराभूत केलं तेव्हा...

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी.

1969 साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसैन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची वेळ आली होती.

हुसैन यांच्या निधनानंतर तत्कालीन उपराष्ट्रपती वराहगिरी व्यंकट गिरी म्हणजेच व्ही. व्ही. गिरी यांना काळजीवाहू राष्ट्रपती बनवण्यात आलं. त्यांनीच राष्ट्रपती व्हावं, अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती.

पण, इंदिरा गांधींच्या आर्थिक धोरणांवर नाराज असलेल्या 'सिंडिकेट'चं याविषयी वेगळं मत होतं. इंदिरा गांधी यांना कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपतिपदाचे उमेदवार निवडण्याची संधी देऊ नये, असं त्यांना वाटायचं.

इंदिरा गांधी यांचा अपमान करण्याची हीच योग्य वेळ आहे, असा विचारही त्यामागे होता.

आपल्या पसंतीचा राष्ट्रपती उमेदवार निवडून आणून काँग्रेसमध्ये नेमकी कुणाची मर्जी चालते, हेसुद्धा त्यांना दर्शवायचं होतं.

इंदिरा गांधी यांचा प्रस्ताव

तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांची राष्ट्रपतिपदासाठी पहिली पसंती अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावाला होती.

पण या मुद्द्यावर ते मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा करण्यास गेले असता देसाई म्हणाले, "मला तुम्ही मंत्रिमंडळातच राहू द्या. अन्यथा ही बाई देश कम्युनिस्टांना विकून टाकेल."

दरम्यान, इंदिरा गांधी यांना समजलं की काँग्रेस कार्यकारिणी ही गिरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार नाही. त्यावेळी त्यांनी जगजीवन राम यांना या निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत विचार केला.

व्ही. व्ही. गिरी

फोटो स्रोत, THE PRESIDENT OF INDIA WEBSITE

फोटो कॅप्शन, व्ही. व्ही. गिरी

पण त्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की जगजीवन राम यांच्या नावाशी अनेक वाद जोडलेले आहेत. किंबहुना त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून आपला कर परतावाही(टॅक्स रिटर्न) भरलेला नाही.

त्यावेळी कामराज यांनी आयती संधी साधून मास्टरस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंदिरा गांधी यांनीच राष्ट्रपती बनावं, असा प्रस्ताव त्यावेळी मांडला.

नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी

पण इंदिरा गांधी त्यांच्या जाळ्यात सापडल्या नाहीत. त्यावेळी कामराज आणि सिंडिकेटच्या इतर नेत्यांनी या पदासाठी नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

56 वर्षीय रेड्डी त्यावेळी लोकसभा अध्यक्षपदावर कार्यरत होते. 1960 ते 1962 दरम्यान ते काँग्रेस अध्यक्षही राहिले होते.

1978 मध्ये राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर ITBP पोलिसांच्या कार्यक्रमात सहभागी झालेले नीलम संजीव रेड्डी

फोटो स्रोत, TWITTER @ITBP_OFFICIAL

फोटो कॅप्शन, 1978 मध्ये राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर ITBP पोलिसांच्या कार्यक्रमात सहभागी झालेले नीलम संजीव रेड्डी

ते पूर्वी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्यही होते. पण 1967 च्या निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं.

पण रेड्डी यांचं नावसुद्धा इंदिरा गांधी यांच्या पचनी पडलं नाही.

त्यांनी थेट उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यास तयार केलं.

'सिंडिकेट'चे नेते

दरम्यान, 75 वर्षीय व्ही. व्ही. गिरी यांचं मनोधैर्य वाढलं.

"काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवेन," अशी भूमिका त्यांनी घेतली.

तर, पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अंतरात्म्याच्या आवाजानुसार मतदान करावं, असं आवाहन इंदिरा गांधी यांनी यावेळी केलं.

दरम्यान, सिंडिकेटच्या नेत्यांनी रेड्डी यांना विजय मिळवून देण्यासाठी उजव्या विचारांच्या जनसंघ आणि स्वतंत्र पार्टी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ही निवडणूक आणखीनच रंजक बनल्याचं दिसून आलं.

गुलजारीलाल नंदा आणि के. कामराज यांच्यासोबत इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुलजारीलाल नंदा आणि के. कामराज यांच्यासोबत इंदिरा गांधी

इंदिरा गांधी यांनी त्यावेळी सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून गिरी यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

यामध्ये ज्या राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता नाही, अशा मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता.

16 ऑगस्ट 1969 रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं. तर 20 ऑगस्ट रोजी मतमोजणीस सुरुवात झाली.

कामराज गट

मतमोजणीत कधी व्ही. व्ही. गिरी पुढे होते तर कधी रेड्डी.

इंदिरा गांधी यांच्या जवळच्या मैत्रीण पुपुल जयकर त्यांच्या चरित्रात याविषयी लिहितात, "रेडिओवर मतमोजणीचे कौल समोर येत होते, त्यावेळी मी इंदिरा गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पहिल्या फेरीत व्ही. व्ही. गिरी पिछाडीवर होते. त्यामुळे कामराज यांच्या कँपमध्ये आनंद साजरा करण्यात येत होता."

"जेव्हा मी तिथे पोहोचले, त्यावेळी इंदिरा गांधी बिथोवनचं संगीत ऐकत होत्या. मी म्हणाले, दुसऱ्या फेरीची मतमोजणी होत आहे, याचा अर्थ गिरी यांचा पराभव. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, इतकी निराश होऊ नकोस पुपुल. लढाई कडवी आहे, पण मी त्यासाठी तयार आहे."

मोरारजी देसाई

फोटो स्रोत, PHOTODIVISION.GOV.IN

फोटो कॅप्शन, मोरारजी देसाई

पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर कुणालाच बहुमत मिळालं नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.

अखेर इंदिरा गांधी यांचे उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा म्हणजे नीलम संजीव रेड्डी यांचा 14 हजार 650 मतांच्या किरकोळ फरकाने पराभव केला.

काँग्रेसमध्ये फूट

गिरी यांना इंदिरा यांच्यासह कम्युनिस्ट, अकाली दल, द्रमुक आणि अपक्षांचाही पाठिंबा मिळाला होता.

इंदिरा गांधी या 'गुंगी गुडिया' सिद्ध होतील. त्या आपल्या इशाऱ्यावर चालतील, असं वाटणाऱ्या लोकांसाठी हा एक इशारा होता.

खरंतर, त्या सर्वांवर इंदिरा गांधी उलट भारीच पडल्या होत्या.

पण या कहाणीची सांगता इथे झाली नही. नोव्हेंबर 1969 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची दोन समांतर बैठका झाल्या.

यातली एक बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली होती. तर दुसरी पक्ष कार्यालयात.

आपल्या जन्माच्या 84 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेस त्यावेळी दोन भागांत विभागली गेली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)