उद्धव ठाकरेंचा मार्ग कोणता? एनडीए, यूपीए, महाविकास आघाडी की 'एकला चालो रे'?

- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'एनडीए'च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे तर उपराष्ट्रपतिपदासाठी 'यूपीए' आणि इतर विरोधकांच्या उमेदवार असलेल्या कॉंग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांना त्यांचा पाठिंबा आहे. दिल्लीत शरद पवारांच्या घरी जेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली सेनेचे खासदार त्याला संजय राऊत हजर होते.
या एका गोष्टीवरुन शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची दोलायमान अवस्था सध्याच्या स्थितीत दिसते आहे. यूपीए की एनडीए? मुख्यमंत्रिपद जाऊ देणारे उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्यास तयार असतील अशी स्थिती अद्याप तरी नाही. मग महाराष्ट्रात 'एकला चालो रे' की 'महाविकास आघाडी'चा प्रयोग मागच्या पानावरुन पुढे?
शिवसेनेच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात आलेल्या सर्वांत मोठ्या वादळातून बाहेर पडताना या एका प्रश्नाला ओलांडल्याशिवाय पुढे जाणं अवघड आहे. 'एकला चालो' की भाजपा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी. जवळपास तीन दशकं भाजपासोबत हिंदुत्वाचा संसार केल्यानंतर उद्धव ठाकरे एक नवा राजकीय प्रयोग महाराष्ट्रात करु पाहत होते.
पण त्या प्रयोगाला अडीच वर्षातच खिळ बसली आणि पक्षफुटीची जबरदस्त किंमत ठाकरेंना द्यावी लागली. आमदारांनंतर काही खासदारही उद्धव यांची साथ सोडत आहेत असं चित्र आहे. पण आता पुढे जातांना उद्धव कोणता मार्ग पकडणार हे सेनेतल्या बंडानंतर जवळपास महिनाभरानंतरही अद्याप स्पष्ट झालं नाही आहे.
'एनडीए'तून बाहेर पडले पण 'यूपीए'त गेले नाहीत
वास्तविक 2014 मध्येच विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली होती. भाजपानंच ती तोडली होती. तेव्हाच सेना एका प्रकारे भाजपाप्रणित 'एनडीए' पासून लांब गेली होती. पण निवडणुकीनंतर लवकरच सेनेला 'युती'च्या सरकारमध्ये परतावं लागलं आणि 'एनडीए'मध्ये सुद्धा. स्थानिक स्वराज्य संस्था दोघांनी विरोधात लढवल्या, पण 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'एनडीए'चं होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी वेगळा प्रयोग केला. ते कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि 'महाविकास आघाडी' अस्तित्वात आली. त्यानंतर शिवसेनेला हा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला की तुम्ही राष्ट्रीय पातळीवर 'एनडीए' सोडली की नाही. शेवटी सेना 'एनडीए'तून बाहेर पडली आणि सेनेच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळांतून राजीनामा दिला. त्यांच्यानंतर काहीच काळात पंजाबची 'शिरोमणी अकाली दल'ही बाहेर पडली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतरचा प्रश्न होता हा की शिवसेना महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करते तर ती 'यूपीए'मध्ये जाणार का? हा प्रश्न गेल्या अडीच वर्षांत सेनेला वारंवार विचारला गेला. पण सेना अधिकृतरित्या 'यूपीए'मध्ये गेली नाही. संसदेत विरोधकांच्या बैठकांना सेनेचे नेते उपस्थित राहिले, काही प्रश्नांवर सरकारविरोधात भूमिका घेतल्या. संजय राऊतांचे राहुल गांधीशी झालेली जवळीक चर्चेचा विषय झाली.
केवळ कॉंग्रेसच नव्हे तर उद्धव यांनी देशातल्या इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा सुरू केल्या. ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव अशा नेत्यांना भेटत राहिले. पण तरीही 'यूपीए'मध्ये ते सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे कमी झालेला उद्धव ठाकरेंच्या हातातला पक्ष राजकीय आधार आणि ताकद म्हणून 'यूपीए' कडे जाईल का आणि महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी' कायम ठेवेल का?
'राष्ट्रपती-उपराष्ट्रपती'पदांच्या निवडणुकीवरुन पहिली परीक्षा
उद्धव ठाकरे कोणासोबत जातील याचा अंदाज येण्याची पहिली परीक्षा झाली ती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत. त्यांनी 'एनडीए'च्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ही उद्धव ठाकरेंनी पत्करलेली पहिली शरणागती आहे असंही म्हटलं गेलं. पण त्यांनी सांगितलं की मी खासदारांच्या दबावामुळे हा निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेच्या खासदारांनी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी जाहीर पत्र ठाकरेंना लिहिलं होतं.
पण आता मुर्मूंना पाठिंबा म्हणजे उद्धव यांनी आजचा धोका उद्यावर ढकलला असंच सिद्ध झालं. शिवसेनेचे किमान 12 खासदार फुटून शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वांचं नाव अंतिम करण्याच्या बैठकीला संजय राऊतांची उपस्थिती हेच दाखवते की मुर्मूंना पाठिंबा हे उद्धव यांचं भाजपाकडे जाणं नव्हतं तर खासदारांना समजावण्याचा शेवटचा प्रयत्न होता.

फोटो स्रोत, Getty Images
पण अल्वांना पाठिंबा हे उद्धव ठाकरेंचं 'यूपीए'कडे टाकलेलं पाऊल आहे असंही म्हणता येणार नाही. जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तेव्हा 'महाविकास आघाडी'तर्फे सेनेचे राजन साळवी उमेदवार म्हणून उभे राहिले. पण त्यानंही 'महाविकास आघाडी'आहे यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं नाही. त्यामुळे अद्यापही सेनेचं तळ्यात-मळ्यात आहे असंच चित्र आहे.
अर्थात शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. ठाकरेंसाठी सर्वप्रथम पक्षसंघटना आपल्याकडे राखणं यासाठी जमिनीवरची आणि न्यायालयातली लढाई जिंकणं हे आवश्यक आहे. त्यानंतर राजकीय रणनीति म्हणून 'यूपीए' की 'एनडीए' की स्वतंत्रपणे एकटं चालण्याची तयारी हा निर्णय त्यांना करायचा असेल.
त्यातला पहिला टप्पा येईल मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये. तेव्हा उद्धव यांना त्यांच्याकडच्या संघटनेचं बळ पाहता कोणासोबत युती आवश्यक आहे का त्याचा निर्णय घ्यावा लागेल. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. पण राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीमुळेच सेना पक्षफुटीपर्यंत पोहोचली. आता उद्धव ठाकरे तो पर्याय कसा निवडतील हे महत्वाचं आहे.
'मुर्मूंना पाठिंबा दिल्यानं विरोधकांमधली उद्धव यांची विश्वासार्हता कमी झाली'
ज्येष्ठ राजकीय पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते उद्धव यांना कोणासोबत आघाडी करायची याचा पर्याय निवडावाच लागेल पण त्याअगोदर त्यांना त्यांच्याकडे असलेला पक्ष उभा करणं हे जास्त महत्वाचं आहे.
"त्यांना जी सेना शिल्लक आहे ती उभी करणं आता आवश्यक आहे. जेव्हा न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा त्यांची दिशा अधिक स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना आपण कोणासोबत जायचं हे ठरवावं लागेल. पण पुढच्या निवडणुकीपर्यंत ते त्यांना ठरवावं लागेल. तोपर्यंत त्यांच्या रस्ता एकट्याचाच असेल," असं चोरमारे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण तसा एक निर्णय जो त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घ्यावा लागला त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे असं विजय चोरमारेंना वाटतं. "ते खासदारांच्या दबावाला बळी पडले आणि मुर्मूंना त्यांनी पाठिंबा दिला. पुढे काय झालं? खासदार जायचे ते गेलेच. पण त्यांच्या या अशा निर्णयानं विरोधी पक्षांमधली उद्धव यांची विश्वासार्हता कमी झाली. ती त्यांना परत मिळवावी लागेल. ममता बॅनर्जी त्यांना अनेकदा भेटल्या होत्या. पण तरीही आता उद्धव यांनी वेगळा निर्णय घेतला," चोरमारे म्हणतात.
"पण मला असं वाटतं की भाजपा लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंसह सगळी शिवसेना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करेल. सेना सोबत नसेल तर त्यांची महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान 25 जागांवर नुकसान होईल. त्यामुळे त्यांच्या प्रयत्न तर ठाकरेंना सोबत घ्यायचाच असेल. फक्त उद्धव ठाकरे तोपर्यंत काय करतात हे महत्वाचं आहे," चोरमारे पुढे म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








