Oral Cancer Day: जेव्हा डॉक्टरांनी शरद पवारांना सांगितलं होतं की, 'तुमचं आयुष्य सहा महिने बाकी आहे'

फोटो स्रोत, Gettyimages
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
"डॉक्टरांनी सांगितलं होतं. तुमचं आयुष्य सहा महिने आहे. काही कामं राहिली असतील तर संपवून घ्या. मी म्हणालो लागली पैज. मी काही जात नाही."
औरंगाबादमध्ये सोमवारी (11 जुलै) मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला. 2004 मध्ये पवारांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. आपल्या पुस्तकात, त्यांनी स्वत:ला 'कॅन्सर सर्व्हायव्हर' म्हटलंय.
कॅन्सरविरोधात त्यांनी कसा लढा दिला हे सांगताना ते पुढे म्हणाले, "कॅन्सरची शंका जरी आली तरी 'यू हॅव टू फाईट'. कॅन्सरवर मात करून लढाई जिंकायची असा निर्धार करायचा."
भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, देशात 2025 पर्यंत कॅन्सरग्रस्तांची संख्या 29.8 दशलक्षापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
'तुला पोहोचवल्यानंतर जाईन'
सोमवारी (11 जुलै) शरद पवार मराठवाडा कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी कॅन्सरचं निदान झाल्यानंतर डॉक्टरांसोबत घडलेला एक किस्सा सांगितला.
शरद पवारांवर कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 10 दिवस पवार रुग्णालयात दाखल होते. त्यावेळचा एका डॉक्टरसोबतचा किस्सा सांगताना ते म्हणाले, "सर्जरी झाल्यानंतर एक नवीन MBBS झालेला डॉक्टर माझ्या उपचारासाठी होता. आम्ही गप्पा मारताना मी त्याला विचारलं. माझ्याकडे बघून तुला काय दिसतं.
तो म्हणाला खरं सांगू... "तुमची काही कामं राहिली असतील तर करून घ्या. मी म्हटलं मला समजलं नाही. तो म्हणाला, तुम्हाला सहा महिन्यांचं आयुष्य आहे." "2004 ते 2022 मी अजूनही आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर आणि त्यांच्यातील संभाषण पुढे कसं रंगलं याबाबत पवार म्हणाले, "मी त्याला म्हणालो लागली आपली पैज. मी काही जात नाही. आणखी जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यानंतर जाईन. तू काही असा विचार करू नको."
काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पवार म्हणाले होते, 36 वेळा रेडिएशन ट्रीटमेंट घ्यायची होती. मंत्रालयात काम झाल्यानंतर मी दुपारी रेडिएशन थेरपी घ्यायचो.
'महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून घेतो सल्ला'
2004 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांना कॅन्सर असल्याचं निदान करण्यात आलं. उमेदवारी फॉर्म भरून परतत असतानाचा किस्सा त्यांनी पुढे सांगितला.
"निवडणुकीचा फॉर्म भरून येताना केईएम रुग्णालयाचे सर्जन डॉ. रवी बापट यांनी सांगितलं, तुमच्या कानाजवळ काहीतरी वेगळं दिसतंय. सूज दिसून येतंय. आम्ही रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, कॅन्सर असण्याची शक्यता आहे. मी म्हटलं ठीक आहे."
कॅन्सरच्या उपचारासाठी शरद पवार अमेरिकेतील न्यूयॉर्कला रवाना झाले. डॉक्टरांनी कॅन्सर असून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. याबाबतचा अनुभव सांगताना पवार म्हणाले, "डॉक्टरांनी मला विचारलं इथे का आलात. मी सांगितलं चांगले उपचार होतात म्हणून. तर, डॉक्टर म्हणाले, तुमच्यासारखे 8-10 रुग्ण येतात. पण, आम्ही महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून सल्ला घेतो."
तेव्हापासून शरद पवार मुंबईतील ब्रीज कॅंडी रुग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुल्तान प्रधान यांच्याकडे कॅन्सरचे उपचार घेत आहेत. कॅन्सर सर्जरी झाल्यानंतर पवार 10 दिवस रुग्णालयात दाखल होते.
'यू हॅव टू फाईट'
कॅन्सर म्हटलं की घरातील वातावरण बिघडतं. घर कोलमडून पडतं. रुग्ण आणि कुटुंबीय खचून जातात.
याबाबत शरद पवार म्हणाले, "कोणालाही कॅन्सरची शंका आली तरी यू हॅव टू फाईट. कॅन्सरविरोधात लढाई करायची. आणि कॅन्सरवर मात करून ही लढाई जिंकायची असा निर्धार करायचा."
'मला कोणी तंबाखू सेवनाबाबत सावध केलं असतं तर.....'
साल 2018 मध्ये इंडियन डेंटल असोसिएशनच्या 'ओरल कॅन्सर डे'च्या कार्यक्रमात पवार आले होते. त्यावेळी तंबाखू आणि सुपारी सेवनाच्या व्यसनाबाबत त्यांना पश्चाताप होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ते म्हणाले होते, "मला 40 वर्षांपूर्वी ही सवय सोडण्यासाठी कोणी सावध केलं असतं तर.."मला सुपारी खाण्याचं व्यसन होतं. सुपारी खाण्यामुळे मला तोंडाचा कॅन्सर झाला. मला शस्त्रक्रिया करावी लागली. पण, सर्वांत महत्त्वाचं मला सर्व दात काढावे लागले. मला तोंड उघडता येत नव्हतं. बोलताना आणि खाताना खूप त्रास होत होता."
ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेच्या माहितीनुसार, साल 2016-17 मध्ये 19 टक्के पुरूष आणि 2 टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात. तर 29 टक्के पुरुष आणि 12 टक्क्यांपेक्षा जास्त महिला स्मोकलेस टोबॅकोचं सेवन करतात.
ओरल कॅन्सर संदर्भात देशभरात काहीच पॉलिसी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








