शरद पवारांनी जेव्हा विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे यांचं 'बंड' मोडून काढलं होतं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्नेहल माने
- Role, बीबीसी मराठीसाठी
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील 8 नेत्यांनी आज शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधीनंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस या नावाखाली आणि घड्याळ या चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
एकप्रकारे अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा सांगितला आहे.
अर्थात, आपल्याच नेतृत्वाला आव्हान देण्याची महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली ही पहिलीच वेळ नाहीये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनाही त्यांच्या सहकाऱ्यांकडून आव्हान मिळालं होतं. हे सहकारी होते विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे...महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री.
पवारांच्या विरोधातलं हे बंड पेल्यातलं वादळ ठरलं होतं. पण ही घटना काय होती? नेमकं काय घडलं होतं?
विद्यार्थी जीवनापासून काँग्रेसचे समर्थक आणि यशवंतराव चव्हाण यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणवले जाणाऱ्या शरद पवार यांनी 1978 साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बंडखोरी केली होती. त्यांनी सुशिलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंकी अशा दिग्गज मंत्र्यांसह जवळपास 38 आमदारांना फोडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.

फोटो स्रोत, Getty Images
जनता पक्ष, जनसंघ अशा अनेक पक्षांची मोट बांधून त्यांनी पुलोदचा प्रयोग केला होता. पण हा प्रयोग फार काळ टिकला नाही. इंदिरा गांधींनी सत्तेत परतल्यानंतर हे सरकार विसर्जित केलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावली.
पुढे पवारांच्या समाजवादी काँग्रेसमधून अनेक आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. पण तरीही शरद पवारांनी ऐंशीच्या दशकात काँग्रेसला समर्थ पर्याय उभा केला होता. मधल्या काळात राष्ट्रीय पातळीवर देखील अनेक घटना घडून गेल्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी हे पंतप्रधान बनले.
ते स्वतः तरुण होते, एकविसाव्या शतकाला सामोर जाताना भारताचं राजकरण तरुणाईच्या हातात असावं असं त्यांचं मत होतं. पक्षातून बाहेर पडलेल्या तरुण नेत्यांना पुन्हा आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. यातच होते शरद पवार.
शरद पवार यांची काँग्रेसमध्ये झालेली घरवापसी
राजीव गांधी यांच्या आग्रहामुळे शरद पवार यांनी 7 डिसेंबर 1986 रोजी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्याकाळात शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं.
या नाराजीतूनच अखेर राजीव गांधींनी शंकरराव चव्हाणांना पायउतार व्हायला लावलं आणि 1989 साली शरद पवार हे राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. सुरुवातीच्या काळात शरद पवारांचा दिल्लीच्या श्रेष्ठींशी सुसंवाद होता. मात्र पुढे तसं राहील नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी असलेल्या पवारांच्या मैत्रीमुळे त्यांच्याबद्दल काहीसा अविश्वास निर्माण होऊ लागला. शिवाय राज्यातील जुने नेते हे शरद पवार यांच्या निष्ठेबद्दल साशंक होतेच.
शरद पवार यांच्याविरुद्ध बंड
स्वतः शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे.
ते आपल्या पुस्तकात लिहितात, "14 जानेवारी मकरसंक्रातीच्या दिवशी अस्वस्थतेला मुंबईतच तोंड फुटलं. माझ्या विरोधात शिवाजीराव देशमुख, रामराव आदिक, विलासराव देशमुख, जवाहरलाल दर्डा, सुरूपसिंग नाईक आणि जावेदखान या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या जोडीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुशीलकमार शिंदे, शंकरराव चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, बॅ. ए. आर. अंतुले हेही उपस्थित होते."
तत्कालीन वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांमध्ये या बंडाचा संदर्भ आढळतो. 15 फेब्रुवारी 1991 साली 'इंडिया टुडे' या इंग्रजी नियतकालिकात छापून आल्याप्रमाणे, शरद पवार यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केली नाही, तर महाराष्ट्रात कॉंग्रेस अडचणीत येईल. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करावं, किंवा त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. पवार यांनी राजीनामा दिला नाही, तर आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असं सांगत या मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण त्यामुळे तापलं.

फोटो स्रोत, Getty Images
शरद पवार लिहितात, "राजीनाम्याचं प्रकरण वरवर दिसतं तेवढं साधं नाही, याचा मला लगेचच अंदाज आला. याचं एक कारण म्हणजे, हे सारे मंत्री रोजच पत्रकार परिषदा घेऊ लागले. दिल्लीतून सूत्रं हलवली जातायत, हेही माझ्या लक्षात आलं. अन्यथा, मुख्यमंत्र्याविरुद्ध उघड भूमिका घेण्याची हिंमत ते करूच शकले नसते."
'विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवा' अशी सूचना मुख्यमंत्री पवार यांना करण्यात आली. 'काँग्रेस'च्या पद्धतीप्रमाणे 'अखिल भारतीय काँग्रेस महासमिती'चे दोन निरीक्षक जी. के. मोपनार आणि गुलाम नबी आझाद यांना आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी पाठवण्यात आलं. शरद पवार यांच्या बाजूनं या वेळी सर्वाधिक आक्रमक आणि उघड भूमिका सुधाकरराव नाईकांनी घेतली.
शरद पवार सांगतात, "तुम्ही अजिबात राजीनामा द्यायचा नाही, माघार घ्यायची नाही. आपण शक्तिप्रदर्शन करायचं!" असं सुधाकररावांनी मला बजावलं होतं.
विधिमंडळाच्या बैठकीत मात्र पक्ष निरीक्षकांना बदलत्या वातावरणाचा अंदाज आलाच. त्यांनी नेतृत्वबदल या विषयावर चर्चा होणार नाही, प्रत्येक आमदाराशी आम्ही व्यक्तिगत बोलणार आहोत, असं स्पष्ट केलं. या व्यक्तिगत भेटीमध्ये बोलताना काही सदस्यांनी स्पष्टपणानं 'सदस्यांचा कौल लक्षात न घेता काही निर्णय होणार असेल, तर तो राबवता येणार नाही.' असं त्यांना सुनावलं. आमदारांशी बोलून त्यांचा कल लक्षात येताच
दिल्लीमधल्या मंडळीना धक्काच बसला
शरद पवार यांना दोनच दिवसांत माखनलाल फोतेदारांचा फोन आला. राजीवजींना तुमच्याशी बोलायचं असल्याचा त्यांनी निरोप दिला. पवारांनी दिल्लीला जाऊन राजीव गांधींची भेट घेतली. या सगळ्या बंडामागे दिल्लीकर असल्याचं त्यांनी सूचित केलं. राजीव गांधी यांनी देखील हसत हसत ते मान्य केलं. ते म्हणाले, 'झाड नुसतं हलवा, मुळापासून उखडून टाकू नका, असं मी त्यांना सांगितलं होतं.'
यावर शरद पवार म्हणतात, "कोणत्याही गंभीर घटनेशिवाय विनाकारण माझ्या विरोधात दिल्लीतून रान पेटवण्यात आलं होतं. आमदार माझ्या बाजूने होते. या पार्श्वभूमीमुळे मला कणखर होता आलं. मी राजीवजींना स्पष्ट केलं की, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मीच पार पाडायची असेल, तर मंत्रिमंडळातल्या बदलांबाबतही मीच निर्णय घेईन."
त्या वेळी सुशीलकुमार शिंदे हे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.

फोटो स्रोत, Getty Images
शरद पवार यांनी कोणताही आडपडदा न ठेवता राजीव गांधी यांना सांगितलं, "सुशीलकुमार शिंदे यांना माझ्या मंत्रिमंडळात मी अजिबात स्थान देणार नाही. त्यांना राजकारणात मीच आणलेलं आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी विरोध नाही, याचीही मला कल्पना आहे. दिल्लीतून तुम्ही दिलेल्या सूचनांची केवळ ते अंमलबजावणी करत होते. पण पक्षाचा अध्यक्ष स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिनदिक्कत रोज उघडपणे बोलत असेल, तर मी ते खपवून घेणार नाही."
राजीव गांधी यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. सुशिलकुमार शिंदेनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्रीपद सोडू अशी धमकी पवारांनी दिली. राजीव गांधी यांना त्यांची मागणी मान्य करावी लागली. ज्येष्ठत्वाच्या नात्याने शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुशीलकुमार शिंदे वगळता इतर बंडखोर मंत्र्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलं. विशेषतः विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलताना शरद पवार सांगतात, "विलासरावांचे आणि माझे संबंध कौटुंबिक व जिव्हाळ्याचे होते. त्यांनी माझ्याकडे येऊन झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि हि घटना राजकीय असल्यामुळे मी देखील तत्क्षणी त्यावर पडदा टाकला."
पण शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे राजीव गांधींनी आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंड का घडवून आणलं?
सुभेदारांनी राजापेक्षा पॉवरफुल होऊ नये...
याबद्दल जेष्ठ राजकीय तज्ज्ञ सुनील गाताडे बीबीसीशी बोलताना सांगतात की, "राजीव गांधी यांना शरद पवार यांना हटवायचं नव्हतं तर त्यांना फक्त दाखवून द्यायचं होतं की, शेवटी राजा कोण आहे.
"शरद पवारांच्या विरुद्ध बंड हे राजीव गांधींच्या आशीर्वादानेच झालं होतं. राजा पेक्षा सुभेदार हा पॉवरफुल होऊ नये म्हणून काँग्रेस श्रेष्ठींनी पवारांचे पंख छाटण्यासाठी हे बंड घडवून आणलं होतं. सुशिलकुमार शिंदे हे शरद पवारांचे जवळचे मित्र होते. ते बंडासाठी तयार देखील नव्हते पण श्रेष्ठींच्या आदेशापुढे त्यांच्याकडे उपाय नव्हता."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








