रणबीर कपूर : 'आमच्या लग्नातले मंत्र मी लक्ष देऊन ऐकत होतो, कारण मला वाटलं...'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या शमशेरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रणबीर कपूरचा शेवटचा चित्रपट होता संजू. तो 2018 मध्ये रिलीज झाला होता.
त्यानंतर जवळपास चार वर्षांच्या अंतराने रणबीरचा शमशेरा रिलीज होत आहे. त्यापाठोपाठ याच वर्षी रणबीरचा 'ब्रह्मास्त्र'ही रिलीज होत आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रीन दिसतील.
रणबीरच्या आयुष्यातील या पर्सनल आणि प्रोफेशनल घडामोडींबद्दल त्यानं शमशेराच्या निमित्तानं बीबीसी हिंदीसाठी मधु पाल यांनी संवाद साधला.
चार वर्षांच्या या गॅपबद्दल बोलताना रणबीरने म्हटलं, "मी जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येतोय. मी या दोन चित्रपटांमध्येच व्यग्र होतो. दोन्ही सिनेमांना मी खूप वेळ दिला आहे. दरम्यान, माझे वडीलही आजारी होते. मी त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. कुटुंबाबद्दलही आपली काही जबाबदारी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाला सावरावं लागतं. अशा प्रसंगांमधून जाताना प्रत्येक जण आपली जबाबदारी शिकतो. लोक माझ्या प्रगतीबद्दल बोलत आहेत. पण या चार वर्षांत मी कधीही करिअरचा विचार करून विचलित झालो नाही. माझ्यात एक चांगला गुण आहे, तो म्हणजे मी संयम ठेवू शकतो."
रणबीर कपूर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्टिव्ह नाहीये आणि त्याला आपल्या खाजगी आयुष्याची चर्चा करायलाही आवडत नाही. त्याने लग्नही घरगुती समारंभातच करणं पसंत केलं.

फोटो स्रोत, YASHRAJ FILMS
रणबीरला स्वतःचं मार्केटिंग करणं आवडत नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना रणबीरने म्हटलं की, "माझ्यासाठी मार्केटिंग हे सगळ्यांत कठीण काम आहे. लग्न किंवा आता आमचं बाळ यावर बोलणंही मला अवघड वाटतं. माझ्या आयुष्यातले हे क्षण मला आनंदानं घालवायला आवडतात. यावर्षी माझे दोन चित्रपट येत आहेत. मी अजून दोन चित्रपटांमध्ये काम करत आहे. यावर्षी आमच्या घरी बाळही येणार आहे. वडील होणं ही माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे."
आनंदासोबतच भीतीही वाटते...
मला किती आनंद झालाय हे सांगताही येणार नाही. पण या आनंदासोबतच सगळं काही नीट होईल ना याची धाकधूक वाटते, असं वडील होण्याचा आनंद व्यक्त करताना रणबीरनं म्हटलं.
"मी आणि आलिया खूप खूश आहोत. ही आमच्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी गोष्ट आहे. आम्हाला या आनंदाचा प्रत्येक क्षण जगायचा आहे. शमशेराचा दिग्दर्शक करण मल्होत्रालाही बाळ झालं आहे. मी त्याच्याकडून लहान बाळांची काळजी कशी घ्यायची याच्या खूप टिप्स घेतोय."

फोटो स्रोत, ANI
आलियाबद्दल बोलताना रणबीरनं सांगितलं की, ते दोघं जवळपास दोन महिन्यांनी भेटत आहेत. ती एका हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये काम करत होती. आता आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल.
"जेव्हा तुम्ही आई-वडील होता किंवा होणार असता तेव्हा तुमचा तुमच्या पालकांबद्दलचा आदरही वाढतो असं मला जाणवतंय. माझ्या आई-वडीलांनी मला आणि माझ्या बहिणीला जी मूल्यं दिली, जे शिकवलं तोच वारसा मला पण पुढे घेऊन जायचा आहे. जेव्हा मूल होतं, तेव्हा त्याच्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी शिकता. मुलासाठी म्हणून खूप साऱ्या गोष्टी करायला लागता. मी खूप आळशी आहे. मला वाटतं बाळ झाल्यावर मी अजून आळशी होईन. कारण मग मला माझ्या मुलासोबत जास्त वेळ घालवायचा असेल."
लग्नातले मंत्र खूप काळजीपूर्वक ऐकत होतो, कारण...
रणबीरने आपल्या वडिलांच्या भाविकतेबद्दलही यावेळी बोलताना सांगितलं.
"माझे वडील माझ्यासाठी देवासारखे आहेत. ते दोन वेळा देवपूजा करायचे. ते जर प्रवासात असतील तर वाटेत जे लहान-मोठं मंदिर लागायचं तिथं हात जोडायला थांबायचे. त्यांच्यामुळे मलाही ती सवय लागली."
सोशल मीडियावर काही व्हीडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये रणबीर कपूर आपल्या लग्नातले मंत्र खूप काळजीपूर्वक ऐकताना दिसतो.

फोटो स्रोत, ANI
त्याबद्दल त्यानं म्हटलं, "लग्न ही आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे पंडीत मंत्र म्हणताना काय सांगताहेत हे मला जाणून घ्यावं असं वाटत होतं. ते काहीतरी चुकीचं नाही सांगत ना असं मला वाटत होतं. लग्नच चुकीचं लावलं तर काय?"
"मला आनंद आणि दुःख दाखवता येत नाही. मी दुःखी असतो तेव्हाही तसाच असतो जेव्हा आनंदी असताना असतो. मला तर कधीकधी आनंदाचीही भीती वाटते. कारण आनंद ही अशी गोष्ट आहे, जी कधी निसटून जाते हे तुम्हाला कळतही नाही. त्यामुळेच मी स्वतःलाच अशाप्रकारे ट्रेनिंग दिलंय की, खूप कठीण परिस्थितीतही मी वाईट वाटून घेत नाही आणि चांगल्या काळात अति आनंदीही होत नाही. कायम मध्य साधतो."
माझे वडील कडक होते, पण...
रणबीरनं आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
"माझे वडील खूप कडक होते, पण त्यांचं माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर खूप प्रेमही होतं... त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या, खूप पाठिंबा दिला. आम्हाला त्यांच्यामुळेच बाहेरचं जग पाहता, अनुभवता आलं.
त्यांनी आम्हाला जग फिरवलं. शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. बऱ्याच गोष्टी केल्या आमच्यासाठी. तेच संस्कार आमच्यामध्ये आजही आहेत. तेच संस्कार मला पुढे घेऊन जायचे आहेत."
शमशेराबद्दल...
शमशेरा ही एका डाकूची गोष्ट आहे. ही कथा सध्याच्या काळात लोकांना आवडले का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं म्हटलं,
"आजकाल लोक सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत राहतात. पण मला असं वाटतं की, जर कथा चांगली असेल तर सिनेमा नक्की चालतो. जेव्हा मी 'संजू' सिनेमा केला होता तेव्हा अनेकांनी मी ही भूमिका करू शकेन का, असं म्हटलं होतं.
संजय दत्त कुठे, रणबीर कुठे असंही खूप जणांनी म्हटलं, पण सिनेमा रिलीज झाला आणि चाललाही. तसंच जेव्हा शमशेराची कथा पडद्यावर उलगडेल, तेव्हा तुम्हाला सिनेमा चांगला आहे की नाही याबद्दल एक दृष्टिकोन मिळेल."

फोटो स्रोत, YASHRAJ FILMS
रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शमशेरा' 22 जुलैला रिलीज होत आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे, तर रणबीर कपूर पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत असेल.
करण मल्होत्रानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








