1 जुलै : आजपासून दोन मोठे बदल, तुमच्या खिशावर 'असा' होईल परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आलोक जोशी,
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी.
'खुश है जमाना आज पहली तारीख है..'
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणत्या ना कोणत्या रेडिओ चॅनलवर हे गाणं अजूनही ऐकण्यास मिळतं.
नवा महिना सुरू होत असल्यामुळे पहिली तारीख महत्त्वाची असते. पगार मिळतो, खर्चाचं बजेट तयार केलं जातं. नव्या गोष्टींचा विचार होतो. काही गोष्टी खरेदी केल्या जातात.
पण यंदाच्या जुलै महिन्यातील पहिली तारीख खास आहे. आजच्या दिवशी काही गोष्टी बदलणार आहेत. या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या बदलांसाठी तयार असाल, तर ते तुमच्यासाठीच चांगलं ठरणार आहे.
नवा कामगार कायदा
देशात एक नवा कामगार कायदा येऊ घातला आहे. यंदाच्या 1 जुलैपासून तो बहुतांश राज्यात लागू करण्यात येऊ शकतो.
पण या कायद्याविषयी अद्याप अनेक शंका आणि तक्रारी यांचं सत्र सुरू आहे. देश या बदलांसाठी अद्याप तयार नाही, असं म्हटलं जात आहे.
नवा कामगार कायदा लागू करण्याचं काम राज्य सरकारांना करायचं आहे. देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी या कायद्यांना मंजुरीही दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
पण, हा कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पडणारा पगार कमी होऊ शकतो. तसंच कामाच्या तासांमध्येही बदल केला जाऊ शकतो. विशेषतः खासगी क्षेत्रात या बदलांचा परिणाम जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतो.
कंपन्यांना ही परवानगी मिळाली तर कर्मचाऱ्यांचे कामाचे तास 8-9 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढवण्यात येऊ शकतात.
पण, आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी कुणालाच नसेल. रोज 12 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळू शकते.
इतकंच नव्हे तर फॅक्टरी कायद्यात कामगारांकडून दर तिमाहीत जास्तीत जास्त 50 तास ओव्हरटाईम करून घेतलं जाऊ शकतं. पण नव्या कामगार कायद्यात यामध्ये वाढ करून 125 तास ओव्हरटाईमची परवानगी मिळू शकते.
नव्या कायद्यात सर्वात मोठा बदल हा पगारासंदर्भात होणार आहे. यानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या एकूण पगारापैकी म्हणजेच ग्रॉस सॅलरीपैकी किमान निम्मा भाग बेसिक वेतन स्वरुपात असला पाहिजे. म्हणजे, याच बेसिक पेच्या आधारावर तुमचा प्रॉव्हिडंट फंड (PF) जमा केला जाईल.
या बदलामुळे खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात काही प्रमाणात घट होऊ शकते. त्या बदल्यात PF खात्यात जास्त रक्कम दरमहा जमा केली जाईल. भविष्यात ही रक्कम त्यांच्याच निर्वाहाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. याशिवाय, नव्या बदलांनुसार निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या रकमेतही वाढ होईल.
सुट्ट्यांच्या बाबतीतही नवे बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या कायद्यानुसार, नवी नोकरी सुरू केल्यानंतर किमान 240 दिवसांनंतरच पगारी रजा मिळू शकायची. पण नव्या कायद्यानुसार 180 दिवस पूर्ण केल्यानंतरच पगारी रजा मिळू शकेल.
पण सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. दर 21 कामाच्या दिवसांनंतर एक सुटीचा दिवस तुमच्या खात्यात जमा होत जाईल.
करप्रणालीत बदल
कामगार कायद्यांशिवाय करप्रणालीतही मोठे बदल होणार आहेत. पॅन आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी बऱ्याच वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. नंतर काही महिन्यांपासून त्याची फी 500 रुपये इतकी आकारण्यात येत होती. पण आता ही रक्कम वाढवून 1000 रुपये इतकी करण्यात येणार आहे.
तुम्ही तुमच्या डीमॅट किंवा शेअर ट्रेडिंग अकाऊंटचं KYC केलं नसेल तर 1 तारखेपासून तुमचं ट्रेडिंग अथवा नवे व्यवहार बंद होतील.

फोटो स्रोत, Getty Images
तुमच्या खात्यात असलेले शेअरही तुम्ही KYC शिवाय विकू शकणार नाही. हाच नियम म्युच्युअल फंड खात्यालाही लागू असणार आहे.
क्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के आयकर लावण्याची घोषणा यंदाच्या वर्षीच्या बजेटमध्ये झाली होती.
पण 1 जुलैपासून सरकार क्रिप्टोकरन्सी किंवा व्हर्चुअल डिजिटल असेट्स यांच्या प्रत्येक व्यवहारावर 1 टक्का इतकं TDS लागू होईल.
यामुळे व्यवहारात नुकसान असो किंवा फायदा, हा कर लागूच असणार आहे. याचा अर्थ, क्रिप्टोकरन्सी खरेदी करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीला या प्रत्येक व्यवहारादरम्यान एक टक्का TDS सरकारी तिजोरीत भरावाच लागेल.
एक्सचेंजच्या माध्यमातून हे करत असलेल्या लोकांचा टॅक्स कापण्याची जबाबदारी एक्सचेंजचीच असेल. पण कोणत्याही एजंटशिवाय, हा व्यवहार तुम्ही करत असाल, तर टॅक्स भरण्यासाठी काय करावं लागेल, यासाठी वेगळे नियम आहेत.
यानुसार, व्यवहार रोख स्वरुपात होत असेल, तर पैसे भरण्याआधीच टॅक्सची रक्कम भरावी लागेल.
आणखी कोणते बदल?
आयकर नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल डॉक्टर आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर यांच्या संदर्भात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या लोकांना कंपनीकडून सेल्स प्रमोशन करण्यासाठी वर्षातून 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम, भेटवस्तू किंवा औषधांचे सँपल मिळतात, तर त्याच्या किंमतीच्या 10 टक्के TDS भरणं गरजेचं आहे.
सध्याच्या काळात सरकार PPF आणि अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण याबाबत लोकांची निराशा झाली आहे.
सलग नवव्या तिमाहीत सरकारने या गोष्टींवरील व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 जुलैच्या सकाळी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचीही बातमी येऊ शकते. कारण याचा दर वाढवण्याची किंवा कमी केल्याची घोषणा करण्याचा दिवसही हाच असतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








