विजयसिंह दहिया: चित्रपटातले स्टंट कसे केले जातात, जाणून घ्या एका नावाजलेल्या स्टंटमॅनकडून

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vikram singh dhaiya

    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

बॉलीवूडचे सिनेमे आणि अॅक्शन हे समीकरण आपल्याला काही नवं नाही. या सगळ्यांत जोरदार जबरदस्त स्टंट, मारधाड असते. या अॅक्शन चित्रपटातले हिरो एकसे एक स्टंट करताना दिसतात. कधी उंच इमारतींवरून उडया मारताना दिसतील, तर कधी आगीत सापडलेल्या हिरॉईनला वाचवायला आगीत उड्या मारतील.

कधी कधी हे हिरो खोल समुद्रात पाण्याखाली स्टंट करताना दिसतील तर कधी कार किंवा बाईकवर सुसाट वेगाने धावत करामती करताना दिसतील.

हे स्टंट बघून चाहत्यांना देखील या हिरोंवर जीव ओवाळून टाकावा वाटतो. हे स्टंटचे सिन सुरू झाले की लोक कधी शिट्ट्या मारतात, तर जोशात येऊन टाळ्या वाजवून दाद देतात. पण प्रत्यक्षात हे स्टंट साकारण्यासाठी कुणीतरी आपल्या जीवाची बाजी लावत असतं. हे स्टंट करतात स्टंट डबल. अर्थात पडद्यामागचा स्टंटमन.

अशाच एका स्टंटमनची गोष्ट आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. त्यांचं नाव आहे विजयसिंह दहिया. ते अॅक्शन डायरेक्टर म्हणून देखील काम करतात.

तलाश, रांझना, ये जवानी है दीवानी, बँग बँग, रागिनी एमएमएस, न्यूटन, सेक्रेड गेम्स, मुक्केबाज, यमला पगला दीवाना, भावेश जोशी, धडक, भूत, गुंजन सक्सेना, ड्राइव, मर्दानी 2, गुड न्यूज, हसीन दिलरुबा, एके वर्सेस एके, अंतिम, तडप, गहराइयाँ अशा एक ना अनेक चित्रपटात आणि ओटीटी प्लेटफार्मवर रिलीज होणाऱ्या वेब शोजमध्ये त्यांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले आहे.

विक्रम सांगतात की, "या अॅक्शनपटात काम करणं खूप जोखमीचं असत. आम्ही हे सीन्स करताना योग्य ती काळजी घेतो."

पैशांची गरज होती म्हणून एक्टर स्टंट डबल बनावं लागलं

जेव्हा चित्रपटात एखादा धोकादायक सीन करायचा असतो तेव्हा कोणत्याही चित्रपट निर्मात्याला बॉलीवूडच्या मोठ्या स्टारचा जीव धोक्यात घालायचा नसतो. त्यासाठी मग अॅक्टर स्टंट डबल कडून हा सीन करवून घेणं बॉलिवूडमध्ये नेहमीचंच आहे.

अॅक्टर, स्टंटमॅन आणि डायरेक्टर असलेले विक्रम सिंह दाहिया बीबीसीशी बोलताना सांगतात की, "मला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून मी बॉलिवूडच्या प्रेमात आहे. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अॅक्टिंग शिकायला काही गेलो नाही. पण मी खूप सारे थियेटर्स केलेत. मला अॅक्टिंगच्या या क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागला.

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vijay singh dahiya

आपल्या प्रवासाबद्दल दहिया सांगतात, "त्यावेळी आजच्यासारखे फारसे प्लॅटफॉर्म नव्हते. फारच कमी लोकांना हिरो बनण्याची संधी मिळायची. पण मला माझं घर चालवायचं होतं, सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याकाळात मार्शल आर्ट शिकलो होतो. मी ब्लॅक बेल्ट असल्याचा फायदा मला मिळाला. मी सुरुवातीला इंडस्ट्री मध्ये लहानसहान काम करायचो.

"अशीच ओळख निघत निघत मला स्टंटमॅनच्या कामाच्या काही ऑफर्स आल्या. मला असं ही पैशांची गरजच होती, म्हणून मी लगेचच होकार कळवला. मला वाटलं यातून काही निष्पन्न होणार असेल, तर तो फायदाच असेल. कदाचित यातून मला माझ्या करिअरमध्ये फायदा होऊन मला अॅक्टिंगची काम मिळतील असं मला वाटलं," दहिया सांगतात.

"जेव्हा जेव्हा मी अॅक्शन सीनसाठी घराबाहेर पडतो तेव्हा मनात थोडी धाकधूक असते."

विक्रम दाहिया सांगतात की, "बॉलिवूडच्या अॅक्टर्सऐवजी स्टंट डबलचं काम करणं सोपं नसतं. जेव्हा जेव्हा मी अॅक्शन सीनसाठी घराबाहेर पडतो तेव्हा मनात थोडी धाकधूक असते. कारण तुम्हाला तिथं जाऊन परफॉर्म करायचं असतं. सगळे स्टंट रियल असतात. पण लोकांना असं वाटतं की, हे काहीतरी नकली असेल. जेव्हा पंच मारायचा सीन असतो तेव्हा तर काहींच्या नाकाओठावर मार बसतो. यासाठी बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. ऑन द स्पॉट रिहर्सल करावी लागते. टायमिंग जुळून येणं गरजेच असतं."

हिरॉईन्ससाठी पण करावे लागतात स्टंट

स्टंट डबलसाठी बऱ्याच चित्रपटात ऍक्शन सीन करणारे विक्रम सांगतात की, "शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, रणबीर कपूर, अजय देवगण अशा अनेक अभिनेत्यांसाठी मी स्टंट केलेत. मागच्या 14 वर्षांत मी फायर शॉट्स, हाय-फॉल्स, हॉर्स रायडिंग करताना पडणं, कार स्टंट, बाईक स्टंट, बाईक स्किडिंग असे अनेक धोकादायक स्टंट केलेत. कधीकधी जबरदस्त मार लागायचा. यासाठी मोठ्या ट्रीटमेंट घ्याव्या लागायच्या.

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vikram singh dahiya

"पण दैव बलवत्तर म्हणून अजूनही मी नीट आहे. मी जेव्हा केव्हा सेटवर असतो तेव्हा काहीतरी शिकायच्या उद्देशाने जातो. माझा शॉट झालाय आणि मी आता जातो असा अॅटिट्यूड मी ठेवत नाही. डायरेक्टर फिल्म कशी डायरेक्ट करतात, सीनसाठी कसा विचार करतात, या सगळ्या गोष्टींवर मी लक्ष ठेऊन असतो. संजय लीला भन्साळीच्या गुजारिश आणि राकेश रोशनच्या क्रिशमध्ये मी हृतिक रोशनचा स्टंट डबल म्हणून काम केलं होतं.

"या दिग्दर्शकांकडून मला खूप काही शिकायला मिळाल. इंडस्ट्रीतले लोक मला बंटी म्हणतात. मी काही हिरॉइन्ससाठी ही स्टंट केलेत. काही चित्रपटांमध्ये जर हिरॉइन्ससाठी धोकादायक स्टंट असतील तर ते स्टंट्स आमच्याकडून करवून घेतले जातात. पण त्यासाठी स्टंटमॅनला हिरॉइन सारख दिसावं लागत. तुमच्या वजनापासून ते तुमच्या लूकपर्यंत तुम्हाला संपूर्ण गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं," दहिया सांगतात.

स्टंटमॅनची अंगकाठी-वजन हिरोसारखं असायला हवं

दुसऱ्या एका धोकादायक स्टंटचा उल्लेख करताना विक्रम सांगतात, "दिग्दर्शक विक्रम मोटवानी यांच्या भावेश जोशी चित्रपटासाठी मी एक स्टंट केला होता. त्यात आठव्या मजल्यावरून खाली पार्क केलेल्या कारवर पडायचं होतं. त्यासाठी वायर रोपवर लटकून खाली यायचं होतं. आता हा स्टंट म्हणजे मनात आलं आणि केलं असं होत नाही. यासाठी बिल्डिंगची हाईट मोजावी लागते. त्यानंतर आम्हाला अंदाज येतो की, उडी कशी मारता येईल. स्टंट करताना स्टंटमॅनची अंगकाठी वजन हिरोसारखं असायला हवं. आणि तरच तुम्हाला काम मिळतं."

नवाजच्या सेक्रेड गेम्ससाठी केलं होतं धोकादायक स्टंट

आपल्या कारकीर्दीतल्या सर्वांत जबरदस्त स्टंटचा संदर्भ देताना विक्रम सांगतात, "नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या वेबशोमध्ये एक सीन चित्रित करण्यात आला होता. या सीनमध्ये नवाज आणि पठाण यांच्यात पाण्याखाली मारामारी सुरू असते. तिथंच एका जहाजात तस्करी होताना दाखवली आहे.

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vikram singh dahiya

त्या सीनमध्ये नवाज त्या पठाणाच डोकं दगडाने फोडतो. हा सीन एकदम अस्सल दाखवायचा होता. यावेळी अनुराग सर मला म्हणाले, बंटी हा सीन एकदम खराखुरा झाला पाहिजे. खरं तर हा सीन खूप महत्त्वाचा होता कारण या सीननंतरच गायतोंडे मोठा स्मगलर म्हणून पुढं येतो. पाण्याखालचे स्टंट सोडून फ्लाइंग, जंपिंग सीनसाठीसुद्धा माझी ओळख आहे. अशा स्टंटला आम्ही वायर वर्क म्हणतो. हे स्टंट करण्यासाठी बॉडी कंट्रोल खूप गरजेचं असतं. केबल्स लावलं की झालं असं नाही तर, शरीराचं संतुलन राखणंही महत्त्वाचं असतं.

आगीच्या सीनसाठी केमिकल वापरल जातं

तिसरा आणि सर्वांत धोकादायक सीन असतो तो फायर सीन. ज्यात कोणतीही चूक होऊन चालत नाही. फायर सीन करण्यासाठी, आम्हाला बॉडीसूट घालावा लागतो.

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vikram singh dahiya

"त्यामध्ये केळीच्या पानांनी आम्ही आमचं शरीर गुंडाळतो, जेणेकरून शरीराला थंडावा मिळतो. हा झाला देशी जुगाड. याशिवाय बऱ्याच साऱ्या खबरदाऱ्या घ्याव्या लागतात. आगीपासून चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही मास्क लावतो.

"कधीकधी फायर शॉट्स देताना आमचा श्वास गुदमरतो, समोरून धूर निघत असतो. कारण शरीराला केमिकल लावलेलं असतं. केमिकल लावल्याशिवाय आग पेट घेत नाही. कधी कधी काही कलाकार हे स्टंट स्वतः करतात, कारण हे स्टंट करण्यासाठी जास्त कोणी तयार होत नाही,"

बदलत्या काळानुसार टेक्नलॉजी सुद्धा बदलली

काळानुरूप हिंदी सिनेमे बदलले, सिनेमासोबत टेक्नलॉजीही बदलल्याच विक्रम सांगतात. ते म्हणतात, 'जसा काळ सरतो आहे तसतशी नवी टेक्नॉलॉजी येते आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेत वाढ होतेय. पूर्वी उंच इमारतीवरून उडी मारताना केबल वायर्स नव्हत्या, पण आता मात्र त्या असतात. पूर्वीच्या जंपिंग सिक्वेन्समध्ये नेट असायचे आता गाद्या आणि बॉक्सेस असतात.

विक्रम सिंह दाहिया

फोटो स्रोत, vikram singh dahiya

आता स्टंट कलाकाराला पैसे आणि इन्शुरन्ससुद्धा मिळायला लागला आहे.

पूर्वीच्या तुलनेत आज अपघात कमी होत असले तरी ते होतच नाहीत असं नाही. अक्षय कुमारमुळे आम्हाला या अपघातांचा मोबदला मिळायला लागला आहे. सेटवर एखाद्या स्टंटमॅन सोबत काही अपघात घडल्यास त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही रक्कम आणि सोबत इन्शुरन्ससुद्धा दिला जातो. पूर्वी असं नसायचं.

एखाद्याला सेटवर काही झालचं तर त्याच कुटुंब वाऱ्यावर पडायचं.

मिळणारी मदत सुद्धा नगण्य असायची. पण आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. मी स्टंटमॅनचे आयुष्य जवळून पाहिलंय, त्यामुळे जेव्हाही मी चित्रपटात अॅक्शन डायरेक्टर असतो तेव्हा माझ्या सर्व स्टंट कलाकारांची काळजी घेण्याची माझी जबाबदारी असते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)