विलासराव देशमुख फक्त अर्ध्या मतानं निवडणूक हरले पण त्यामुळेच पुढे मुख्यमंत्रीच झाले...

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

( 26 मे हा विलासराव देशमुख यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)

'विलासराव देशमुख विधान परिषद निवडणुकीत अर्ध्या मतानं पराभूत झाले आणि त्यामुळे पुढे जाऊन ते मुख्यमंत्री बनले' - हे वाक्य वाचायला विसंगत नि आश्चर्यकारक वगैरे वाटेल, पण खरं आहे.

विलासरावांशी संबंधित महाराष्ट्राच्य राजकारणातला हा रंजक किस्सा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

महाराष्ट्र विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी त्यांच्या प्रशासकीय कार्याकाळादरम्यान आठवणींच्या गाठोड्यातून हा किस्सा खास बीबीसी मराठीला सांगितला.

मुख्यमंत्री होण्याआधीचे सलग दोन पराभव

1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुखांचा लातूर मतदारसंघातून शिवाजीराव कव्हेकरांनी पराभव केला होता. कव्हेकर हे जनता दलाचे उमेदवार होते.

विलासराव हे तोवर लातूरमधील मातब्बर नेते बनले होते. त्यामुळे त्यांच्या पराभवाची त्यावेळी जोरदार चर्चा झाली.

नंतर 1996 साली विधान परिषद निवडणूक लागली. मात्र, विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. तरीही त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी त्यांचे समर्थक असलेल्या छगन भुजबळांचं नाव विधान परिषदेसाठी पुढे केलं.

मग विलासराव देशमुखांनीही बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीत शिवसेनेनं विलासराव देशमुखांना पाठिंबा दिला होता.

मात्र, शिवसेनेनं पाठिंबा देण्याआधी बाळासाहेबांनी विलासरावांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली होती. मात्र, 'माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार?' असा प्रश्न विलासरावांनी बाळासाहेबांना उद्देशून विचारला होता. विलासरावांचा हा प्रश्न त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.

विलासराव देशमुखांचे मित्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवारांनी बीबीसी मराठीशी याबाबत बातचित केली. उल्हासदादा म्हणतात की, "बाळासाहेबांनी शिवसेना प्रवेशाची विचारणा केल्यावर, विलासराव म्हणाले होते की, पराभव झाला तरी बेहत्तर, पण काँग्रेसचा विचार सोडणार नाही."

मग अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेला सामोरे गेलेल्या विलासरावांचा शिवसेनेचा पाठिंबा असतानाही पराभव झाला होता आणि तोही केवळ अर्ध्या मतानं.

त्यावेळी त्यांच्यासमोर लालसिंह राजपूत हे उमेदवार होते आणि ते अर्ध्या मताने जिंकले होते.

अर्ध्या मतानं पराभव आणि थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान

विलासरावांच्या या अर्ध्या मतानं झालेल्या पराभवाचा किस्सा विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसेंनी बीबीसी मराठीला सांगितला.

अनंत कळसे हे विलासरावांचा पराभव झालेल्या या निवडणुकीवेळी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहत होते. सध्या ते विधिमंडळाच्या प्रधान सचिवपदावरून निवृत्त झाले आहेत.

अनंत कळसे सांगतात की, "मला आठवतंय, 1996 सालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि विलासराव अर्ध्या मताने पराभूत झाले होते. मी त्या निवडणुकीत रिटर्निंग ऑफिसर होतो."

या काळात राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. मग विलासरावांनी विरोधक म्हणून काम केलं.

1995 मध्ये विधानसभेत आणि 1996 ला विधान परिषदेत पराभव, असे दोन सलग पराभव स्वीकारल्यानंतर विलासराव 1999 साली पुन्हा लातूरमधून विधानसभेसाठी उभे राहिले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झाले.

1999 ला आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर स्थापन झालेल्या राज्य सरकारचं नेतृत्त्वही विलासरावांनी केलं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

'कळसे, तुम्ही काटेकोर काऊंटिंग केली म्हणून...'

विलासराव मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी एकेदिवशी अनंत कळसेंना बोलावून घेतलं आणि मिठी मारली.

ही आठवण सांगताना अनंत कळसे म्हणतात, "मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, 'कळसे, तुम्ही काटेकोरपणे काऊंटिंग केली आणि मी अर्ध्या मतानं पडलो. जिंकलो असतो, तर शिवसेनेमध्ये मी अडकून पडलो असतो. पराभूत झालो म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये काम करू लागलो आणि मुख्यमंत्री झालो."

एखाद्या पराभवानं खचून न जातं, त्याकडे सकारात्मक पाहण्याचा स्वभाव त्यांच्याकडे होता, हेच यातून दिसून येतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)