रणजी ट्रॉफी: आमदार जेव्हा शतक झळकावतात! पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्र्याची किमया

मनोज तिवारी, पश्चिम बंगाल, क्रिकेट, तृणमूल काँग्रेस

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI

फोटो कॅप्शन, मनोज तिवारी

आमदार विधिमंडळात सत्रावेळी उपस्थित असतात. आमदार सभा, मोर्चांमध्ये असतात. आमदार संबंधित पक्षाच्या बैठकींना उपस्थित असतात. पण आमदार मैदानात उतरून शतक झळकावतात हे दृश्य तुम्ही किती वेळा पाहिलंय?

यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत हे अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मनोज तिवारी क्रीडामंत्री आहेत. क्रिकेटपटू ते राजकारणी अशी भरारी घेतलेल्या 36वर्षीय तिवारी यांनी आमदारपदी असतानाही क्रिकेट सोडलेलं नाही. बंगालच्या रणजी संघाचा ते अविभाज्य घटक आहेत.

10 जून रोजी तिवारी यांनी रणजी करंडक स्पर्धेत बंगालतर्फे खेळताना झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शतक झळकावलं. तिवारी यांनी 136 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही तिवारी यांनी 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

रणजी करंडक स्पर्धेची सेमी फायनल सुरू आहे. अलूर इथे सुरू असलेल्या या लढतीतही तिवारी दमदार फॉर्ममध्ये आहेत. बुधवारी दिवसअखेर तिवारी नाबाद 84 धावांवर खेळत आहेत.

आमदार व्यक्तीने रणजी स्पर्धेत शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ असावी असा दावा एका ट्वीटर युझरने केला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे अनेक खेळाडू आहेत. पण आमदार आणि नंतर मंत्री झाल्यावरही खेळणं न सोडता त्याच तडफेने खेळत शतक झळकावणारे तिवारी बहुधा पहिलेच असण्याची शक्यता आहे.

मनोज तिवारी, पश्चिम बंगाल, क्रिकेट, तृणमूल काँग्रेस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मनोज तिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या शतकानंतर (संग्रहित छायाचित्र)

रणजी स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तिवारी यांचा बंगालच्या संघात समावेश करण्यात आला. 2020 मध्ये बंगाल आणि सौराष्ट्र या संघांमध्ये रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम मुकाबला झाला होता. तिवारी त्या सामन्यात बंगालचा भाग होते. 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे तिवारी यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.

"ममतादीदींनी जेव्हा मला राजकारणात प्रवेश करायचा सल्ला दिला तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. मला क्रिकेट खेळत राहायचं आहे, इतक्यात खेळणं सोडायचं नाहीये असं सांगितलं. तुला जेवढे दिवस खेळायचं असेल तेवढे दिवस खेळ असं त्यांनी मला सांगितलं," तिवारी यांनी स्पोर्ट्सस्टार मासिकाशी बोलताना ही आठवण सांगितली होती. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर तिवारी पश्चिम बंगालमधल्या शिबपूर मतदारसंघातून निवडून आले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिवारी यांच्यावर क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवली. माझ्याकडे चांगली टीम आहे. त्यामुळे राजकीय कारकीर्द आणि खेळ हे दोन्ही मी एकाचवेळी सांभाळतो. टीका करणारे, समीक्षक बोलत राहतील. मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. गेली 18 वर्षं मी बंगालसाठी खेळतो आहे.

आमदार आणि मंत्री असल्यामुळे संघातल्या खेळाडूंशी असलेलं नातं बदललेलं नाही असं तिवारी सांगतात. मी मंत्री म्हणून खेळत नाही. संघातले खेळाडू माझे मित्र आहेत. आम्ही एकमेकांवर हास्यविनोद करतो. बंगाल क्रिकेट संघटनेनं खेळात मोठी गुंतवणूक केली आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन मिळावं यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची फौज तयार केली आहे.

भारताचं प्रतिनिधित्व

भारतीय संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू खेळत असल्यामुळे तिवारी यांना सातत्याने सलग संधीच मिळाली नाही. तिवारी यांनी 12 वनडे आणि 3 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2015 मध्ये तिवारी यांनी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. दुखापतींमुळेही तिवारी यांच्या कारकीर्दीचं मोठं नुकसान झालं.

11 डिसेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई इथे खेळताना तिवारी यांनी शतकी खेळी साकारली होती. छोट्या कारकीर्दीतलं तिवारी यांचं हे एकमेव शतक.

मनोज तिवारी, पश्चिम बंगाल, क्रिकेट, तृणमूल काँग्रेस

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, मनोज तिवारी आयपीएल स्पर्धेदरम्यान

डोमेस्टिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव तिवारी यांच्या नावावर आहे. 129 सामन्यांमध्ये तिवारी यांनी 49.94च्या सरासरीने 9289 धावा केल्या आहेत.

यामध्ये 28 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. बंगालसाठी खेळताना सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिवारी यांना 'छोटा दादा' असं टोपणनाव मिळालं. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना दादा म्हटलं जातं.

आयपीएल स्पर्धेत तिवारी यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)