पंकजा मुंडेंच्या समर्थकांची हिंसक निदर्शनं, ‘पंकजा मुंडे भाजपपासून दूर चालल्यात?’

पंकजा मुंडे, भाजप

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं पंकजा मुंडेंना संधी न दिल्यानं मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे दिसून येत आहेत. प्रत्यक्ष निदर्शनं असोत किंवा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया असोत, यातून मुंडे समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी काही समर्थकांनी हिंसक निदर्शनंही केली. अगदी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या गाडीवर धावून जाण्याचा प्रयत्नही काही समर्थकांनी केला.

भाजपनं प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या पाच जणांना विधानपरिषदेचं तिकीट दिलंय.

पंकजा मुंडे यांच्या नावासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला होता, असं स्वत: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्ष यादीत पंकजा मुंडेचं नाव नव्हतं.

पंकजा मुंडेंना तिकीट मिळाली नसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या. पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीवासी झालेल्या एकनाथ खडसे यांनी पंकजांना उमेदवारी न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली.

"पंकजा मुंडेंना डावललं याचं मला अतिव दु:ख आहे. मुंडे-महाजन-खडसे-फुंडकर या नावानं काही कालखंड भाजपची ओळख होती. मुंडेसाहेब आमचे नेते होते. त्यांनी पक्षासाठी उभं आयुष्य खर्ची घातलं आणि त्यांच्या मुलीला, ज्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रभर आहे, त्यांना डावलण्याचं कारण मी समजू शकलो नाही," असं खडसे म्हणाले.

पंकजा मुंडे, भाजप

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्याबाबत 'चिंता' व्यक्त केली. राऊत म्हणाले, "आम्हाला पंकजा मुंडेंबद्दल चिंता आहेच ना. कारण त्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत. गोपीनाथराव मुंडे आणि शिवसेनेचे संबंध कौटुंबिक होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात काही घडत असेल तर आम्हाला त्यांची चिंता वाटणारच."

महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केवळ चिंता नि खंत व्यक्त केली, मात्र पंकजा मुंडे समर्थकांनी निदर्शनं केली आणि यातल्या काही निदर्शनांना हिंसक वळणही लागलं. अगदी प्रवीण दरेकरांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यापर्यंत समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले.

"बऱ्याच वेळाला हे समर्थक कोण आहेत, कोणाचे आहेत हेही बघण्याची आवश्यकता असते. आणि ते समर्थर ताईंवर खरं प्रेम करणारे असतील तर आशा प्रकारच्या कृती करून ते भविष्यामधली पंकजाताईंची प्रगती रोखत आहेत. खरं अशा प्रकारच्या गोष्टींना संघटनेमध्ये कधीच एन्टरटेन केलं जाणार नाही," असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना केलंय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या या निदर्शनांचा अर्थ काय आणि पंकजा मुंडेंच्या नाराजीचा भाजपला फटका बसू शकतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ. तत्पूर्वी, पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आतापर्यंत कुठे कुठे आणि काय काय निदर्शनं केली, हे पाहूया.

मुंडे समर्थकांनी आतापर्यं कुठे कुठे निदर्शनं केली?

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली नसल्याचं कळताच मुंडे समर्थक नाराज झाले आणि त्याचं रुपांतर आक्रमक नि हिंसक निदर्शनांमध्ये झालं. विशेषत: मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

प्रवीण दरेकरांच्या गाड्यांचा अडवण्याचा प्रयत्न

भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा बीड शहरात मुंडे समर्थकांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रवीण दरेकर

फोटो स्रोत, Twitter/Pravin Darekar

दरेकर हे आमदार विनायक मेटेंच्या निमंत्रणावरून अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमासाठी जिल्ह्यात आले होते. या कार्यक्रमानंतर परत जात असताना धांडेनगरजवळ दरेकरांच्या ताफ्यासमोर घोषणा देत काही कार्यकर्ते आले.

यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

मुंडे समर्थकांनी भाजपचं औरंगाबादमधील उस्मानपुरा येथील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत, कार्यकर्त्यांना रोखलं.

पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या भावना कार्यकर्त्यानी यावेळी व्यक्त केल्या.

मोदींच्या प्रतिमेसमोर दुग्धाभिषेक करून नाराजी व्यक्त

बीडमध्ये मुंडे समर्थकांनी शांततेच्या मार्गानं आपली नाराजी व्यक्त केली.

काही मुंडे समर्थकांनी बीडच्या कंकालेश्वर मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसमोर शंकराला दुग्धाभिषेक केला आणि कृपादृष्टी ठेवण्याची प्रार्थना केली.

बीडबाहेर मुंडे समर्थक आक्रमक होत असताना, बीडमध्ये ती तीव्रता दिसून येत नाहीय.

पंकजा मुंडे-भागवत कराडांचे समर्थक भिडले

औरंगाबादमध्ये डॉ. भागवत कराड आणि पंकजा मुंडे यांचे समर्थकही एकमेकांना भिडल्याचं समोर आलं. भागवत कराडांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि नंतर केंद्रीय मंत्रिपदही देण्यात आलं. या दोन्हीवेळा पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली होती. त्यामुळे पकंजा मुंडेंसमोर कराडांना उभं केलं जात आहे का, अशीही चर्चा झाली.

आता विधानपरिषदेचं तिकीटही मिळालं नसल्यानं नाराज मुंडे समर्थकांनी कराडांच्या समर्थकांवर धावून गेल्याचं औरंगाबादमध्ये दिसून आलं. यावेळी कराडांचे समर्थक घोषणाबाजी करत होते.

मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगरमधील पाथर्डीतील पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडेंना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याचा निषेध करीत मुकुंद गर्जेंनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर गर्जेंना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथं प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.

या काही निवडक निदर्शनांच्या घटना झाल्या. आणखीही बऱ्याच घटना गेल्या काही दिवसात पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ मराठवाड्यात घडल्या. मात्र, पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या प्रतिक्रियांमध्ये इतका आक्रमकपणा का वाढला, याचं उत्तर पंकजा मुंडेंना 2019 च्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर डावलण्यात आलेल्या प्रकारात आहे.

पंकजा मुंडे, भाजप

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

2019 साली परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंचा पराभव त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केला. यानंतर पंकजा मुंडेंना भाजपनं राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी दिली खरी, पण दरम्यानच्या काळात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मात्र त्यांना डावलण्यात आलं.

विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडेंचे समर्थक राहिलेल्या अनेकांना उमेदावारी देण्यात आली. मात्र, पंकजा मुंडेंना बाजूला सारण्यात आलं. हा संताप आता विधान परिषद निवडणुकीतही उमेदवारी न मिळाल्यानंतर समोर आल्याचं दिसून येतं.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या हिंसक निदर्शनांचा अर्थ समजून घेण्यापूर्वी, आतापर्यंत पंकजा मुंडेंना कुठल्या निवडणुकीत किंवा पदासाठी डावलण्यात आलं, हे थोडक्यात पाहूया.

परळीत हरल्यानंतर पंकजा मुंडेंना आतापर्यंत कितीवेळा डावललं?

2020 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं रमेश कराड यांना उमेदवारी दिली. यावेळी पंकजा मुंडेंना मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. रमेश कराडांना उमेदवारी दिल्यानं मुंडे समर्थक नाराज झाले होते.

अशीच स्थिती 2020 मध्येच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी झाली, ती म्हणजे डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं. यावेळीही पंकजा मुंडेंना राज्यसभ्येत पाठवण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तसं झालं नाही. किंबहुना, पुढे डॉ. भागवत कराडांना केंद्रात राज्यमंत्रिपदही देण्यात आलं.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत डॉ. अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांना भाजपनं तिकीट दिलं. यावेळीही पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली.

पाठोपाठ भाजपनं विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर केले. त्यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरेंची नावं जाहीर करण्यात आली.

मात्र, यावेळीही पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांमधील नाराजी वाढण्यास या सर्व घडामोडी कारणीभूत ठरल्याचं आणि पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याची चर्चा मुंडे समर्थकमांमध्ये होऊ लागली. परिणामी समर्थकांनी आता आक्रमक मार्ग अवलंबत हिंसक निदर्शनं सुरू केली.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या हिंसक निदर्शनांचा अर्थ काय?

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्याशी आम्ही याबाबत चर्चा केली. त्यांच्या मते, मुंडे समर्थकांची ही निदर्शनं एकप्रकारे पंकजा मुंडेंनाच अडचणीची ठरू शकतात.

एस. एम. देशमुख म्हणतात की, "एखादं पद न मिळाल्यास एखादा नेता आणि त्याचे समर्थक नाराज होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. दोन-तीन वेळेस पंकजा मुंडे सातत्यानं डावलल्या गेल्या. त्यामुळे मराठवाड्यात नाराजीची भावना आहेच. ती नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे नाराजी सहाजिकच आहे.

पण त्यामुळे हिंसक निदर्शनांपर्यंत पोहोचणं, हे बरोबर नाही. यामुळे पक्षामधला पंकजा मुंडेंचं पक्षातलं वजन असो वा पंकजा मुंडेंप्रती सहानुभूती असलेल्यांच्या मताला ठेच पोहोचू शकते. परिणामी पंकजा मुंडेंचंच नुकसान होऊ शकतं."

पंकजा मुंडे, भाजप

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

"पंकजा मुंडे बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे या गोष्टींना. भागवत कराडांच्या कार्यालयासमोर निदर्शन झाली, त्याचवेळी पंकजा मुंडेंनी शांततेचं आवाहन केलं असतं, तर पुढे हिंसक घटना घडल्याच नसत्या. परंतु, त्या बोलत नाहीत, याचा अर्थ होतो की, त्यांचा मौन पाठिंबा या घडामोडींना आहे. यामुळे पक्षापासून त्या दूर चालल्यात असा अर्थ निघेल."

एस. एम. देशमुख पुढे म्हणतात की, "मुंडे समर्थक विचारतात की, किती दिवस संयम पाळायचा. पण राजकारणात असा टप्पा येतोच, जेव्हा संयमाची परीक्षा पाहिली जाते. पंकजा मुंडेंनी हा टप्पा नीट हाताळला, तर त्यांच्या फायद्याचंच ठरेल."

मराठवाड्यातील राजकारणाचे अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणतात की, "पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ज्यांनी निदर्शनं केली, ते कोण आहेत हे पाहावं लागेल. कारण विविध निदर्शनांमध्ये एक-दोन कार्यकर्तेच कसे दिसू शकतात? शिवाय, या निदर्शकांना पंकजा मुंडेंनी कार्यकर्ता म्हणून स्वीकारलं आहे का, हेही पाहावं लागेल.

या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडत नसतील, तर या सर्व प्रकारांमागे काहीतरी राजकारण असल्याचं दिसून येईल आणि त्यातून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचाच हेतू दिसून येतो."

"तिकीट मिळालं किंवा तिकीट मिळालं नाही तरी आपल्या नावाची चर्चा होणारच असल्याचं कदाचित पंकजा मुंडेंनी स्वीकारलं असावं, म्हणून त्या आपली भूमिका स्पष्ट करण्यासही पुढे येत नसतील," असं सुशील कुलकर्णी म्हणतात.

तसंच, "पंकजा मुंडेंनी सार्वजनिक व्यासपीठावरून अद्याप विधानपरिषद किंवा राज्यसभा यांसाठी आपल्याला तिकीट हवं, असं म्हटलं नाही. असं असतानाही माध्यमांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्या चालवणं चूक आहे. बातमी तयार करून त्यावर प्रतिक्रिया घेऊन नाराजी वगैरे म्हणणं आणि त्यावर पंकजांनी बोलण्याचा आग्रह करणं हे मला योग्य वाटत नाही."

"मात्र, पंकजा मुंडेंनी एकदा तरी आपल्या पुढील वाटचालीबाबत स्पष्ट भूमिका मांडायला हवी, जेणेकरून त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी पसरतात त्या थांबण्यास मदत होईल," असंही सुशील कुलकर्णी म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)