राज्यसभा निवडणूक निकाल : भाजपचे धनंजय महाडिक विजयी, महाविकास आघाडीने केला पराभव मान्य

फडणवीस आणि ठाकरे

राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत.

शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना 33, तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली

त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे.

तसंच आम्हाला या पराभवाची समीक्षा करावी लागेल, असंही ते म्हणाले.

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, Facebook/Dhananjay Mahadik

फोटो कॅप्शन, धनंजय महाडिक

या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं की, "आमचे दोन आमदार मतदान करू शकले नाहीत. तर सुहास कांदे यांचं मत बाद झालं. याचा फटका महाविकास आघाडीला बसला. नाहीतर संजय पवारांना पहिल्या पसंतीत जास्त मतं मिळाली असती."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, "निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही. तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र !"

रात्रभरात काय घडलं?

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. याआधी निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली.

एएनआयनं ट्विट करत म्हटलं की, "निवडणूक आयोगाने आरओ/निरीक्षक/विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर आणि व्हीडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित केला आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मत नाकारण्याचे आदेश आरओला दिले असून मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना एबीपी माझा या वृत्तवाहिनीला सांगितलं, "शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे. मला अद्याप कोणतीही माहिती नाही. पण निकाल आल्यानंतर त्यावर कोर्टात जायचं का नाही ते ठरवू."

सुहास कांदे यांचं मत बाद ठरल्यानंतर 284 मतं वैध ठरली होती.

सुहास कांदे यांचं मत बाद होण्याची 5 कारणं

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला गेला. सुहास कांदे नांदगावाचे आमदार आहेत.

निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात सुहास कांदे यांचं मत बाद का झालं याची माहिती दिलीये.

  • सुहास कांदे यांनी बॅलेट पेपर फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेला.
  • सुहास कांदे यांनी पकडलेला बॅलेट पेपर बाजूच्या क्युबिकलमधून दिसत होता. त्याचसोबत कॅमेरा ॲंगलमध्ये येत होता.
  • त्यांनी बॅलेट पेपर आपल्या नेमून दिलेल्या एजंटला नेमून दिलेल्या जागेच्या बाहेर येऊन दाखवला.
  • निवडणूक अधिकाऱ्यांनी वारंवार बाजावूनसुद्धा ते खुला बॅलेट पेपर घेऊन हिंडत होते.
  • ते लोकांशी बोलत होते आणि खुला पेपर घेवून दुसऱ्या क्युबिकलकडे जात होते.

याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

"या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करायला हवी होती. पण त्यांनी कारवाई केली नाही," असं आयोगानं म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना सुहास कांदे यांचा बॅलेट पेपर मतमोजणी सुरू करण्याआधी बाजूला काढण्याचे आदेश दिले.

मतमोजणी 8 तास उशिरानं झाली कारण...

महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 10 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झालं. 5 वाजता मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होतं. पण, तब्बल 8 तासांनंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

कारण, महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावं, अशी मागणी भाजपनं केली होती.

या तक्रारीनंतर त्याचा अहवाल दिल्लीच्या निरीक्षकांनी मागवला होता. हा अहवाल येईपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात आठ तासांपासून निकाल रखडला होता. रात्री 1 च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.

राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नेतेमंडळींनी विधीमंडळात दाखल व्हायला सुरुवात केली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

राज्यसभेची निवडणूक कशी होते?

संसदेची दोन सभागृहं आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेत 543 निवडलेले आणि 2 नेमणूक केलेले असे एकूण 545 खासदार असतात. या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात.

राज्यसभेत 238 निवडलेले आणि 12 नेमलेले असे एकूण 250 खासदार असतात, या निवडणुका दर 2 वर्षांनी होतात. लोकसभेच्या सगळ्या खासदारांची टर्म एकाच वेळी संपते, राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळेच या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणारं सभागृह म्हणतात.

लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात, राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात.

मतदान कसं होतं?

सगळ्या आमदारांना मतपत्रिका म्हणजे बॅलट मिळते. जितके खासदार निवडायचेत त्या प्रत्येकासाठी त्यांना वेगवेगळी मतपत्रिका देतात का? तर नाही. राज्यसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेला Proportional Representation by Single Transferable Vote असं म्हणतात.

म्हणजे आमदार जेव्हा मतदान करतील तेव्हा त्यांना एकूण उमेदवारांमधून आपला प्राधान्यक्रम नोंदवायचा असतो. म्हणजे आत्ता 6 जागांसाठी 7 उमेदवार आहेत तर त्यांना 1 - 2 - 3 असे प्राधान्यक्रम द्यायचेत. असं का?

समजा 6 जागांसाठी 6 उमेदवारांना आवश्यक ती 42 मतं मिळाली तर ते थेट निवडून जातील आणि पुढे काही करायची गरजच पडणार नाही. राज्यसभा निवडणुका बिनविरोध झाल्या असं आपण ऐकतो तेव्हा त्याचा अर्थ काय? की जितक्या जागा तितकेच उमेदवार होते त्यामुळे प्रत्येकाला आवश्यक तितकी मतं पडणारच होती.

महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन
फोटो कॅप्शन, महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन

पण जेव्हा निवडणूक होते तेव्हा सगळ्यांना पहिल्या पसंतीची आवश्यक तितकी मतं मिळतीलच असं नाही ना. काहींना गरजेपेक्षा जास्तही मिळतील आणि काहींना कमीही मिळतील.

अशाप्रकारे जोपर्यंत सहाच्या सहा जागा किंवा त्या त्या निवडणुकीत जितक्या जागा असतील तितक्या पूर्णपणे निवडून येत नाहीत तोपर्यंत ही आकडेमोड सुरू असते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)