You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण यांचा पवारांसोबतचा जुना फोटो व्हायरल, चर्चेला उधाण
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येत जाऊन प्रभू रामांचं दर्शन घेणार होते. मात्र त्यांच्या या अयोध्या यात्रेचा रथ भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदाराने अडवून धरला. ते खासदार बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो मनसेनी ट्वीट केला आहे.
यावरून, ब्रृजभूषण यांच्या भूमिकेपाठीमागे शरद पवार तर खरे सूत्रधार नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेशात पाय ठेवायचा असेल तर उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल, मारहाणीबद्दल माफी मागावी लागेल असं त्यांनी सांगितलं.
बृजभूषण दररोज टीव्हीवर येऊन, पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडू लागले. मनसेच्या आंदोलनात जखमी झालेल्या उत्तर भारतीय लोकांनाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलवून त्यांची व्यथा सर्वांसमोर मांडली.
भाजपा खासदारांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन हा एक 'ट्रॅप' असल्याचं राज ठाकरे यांच्या लक्षात आलं. अयोध्या दौरा 'तूर्तास' स्थगित असं ट्वीट करुन त्यांनी पुण्यातल्या सभेत त्याचं कारणही स्पष्ट केलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आपल्या पुण्यातील भाषणात राज ठाकरे म्हणाले, "ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यादिवशीच अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. ही तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच मला अयोध्येला येऊ देणार नाही, असं तिकडे सुरू झालं. हे प्रकरण वाढत असल्याचं मी पाहत होतो.
"मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातूनही याबाबत माहिती मिळत होती. पण एक वेळ अशी आली की माझ्या लक्षात आलं की हा एक सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकता कामा नये. कारण या सगळ्याची रसद पुरवण्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा, असे त्यांचे प्रयत्न होते."
"ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी एकत्रितपणे हा आराखडा आखला होता. पण तिथं हट्टाने जायचं असं मी ठरवलं असतं आणि तिथे जर काही झालं असतं तर आपली त्यांच्या पोरं अंगावर गेली असती. पण त्यानंतर त्यांच्यावर केसेस लावल्या गेल्या असत्या."
"एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. त्यापैकी काही गोष्टी मला तुम्हाला सांगता पण येणार नाहीत. पण महाराष्ट्रातील माझी ताकद हकनाक सापडली असती. ती मला तिथे सापडू द्यायची नाही. मी टीका सहन करायला तयार आहे. पण पोरांना अडकू देणार नाही."
राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
"राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलेल्या 'अयोध्या द ट्रॅप' चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता दुसरं तिसरं कोणी नसून भाजपा आहे," असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.
या प्रकरणावर भाजपची भूमिका जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संवाद साधला.
"राज ठाकरेंच्या येण्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला असून त्यांना रोखण्यासाठी तेच अशा प्रकारची कृत्ये करू शकतात," असं केशव उपाध्ये म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी भूमिका स्पष्ट करताना उपाध्ये म्हणाले, "जे रामाला मानतात, अशा जगभरातील प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. त्याला भाजपने विरोध करण्याचं काहीच कारण नाही. पण राज यांच्या येण्यामुळे महाराष्ट्रात कुणाची अडचण होत आहे, हे आपण सर्व जण पाहत आहोत. राज यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली. त्यामुळे ज्यांची अडचण झाली, तेच असं काही कृत्य करू शकतात."
"असं असेल तर ब्रृजभूषण सिंह यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले, "ब्रृजभूषण सिंह यांच्याविषयी महाराष्ट्र भाजपने स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या टीकेचा रोख कुणाकडे आहे, आहे आपण सर्व जाणतो," असं केशव उपाध्ये म्हणाले.
मनसेचा आरोप
सध्या त्यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला असला तरी त्यावरुन सुरू झालेलं रामायण अजून थांबलेलं नाही. त्यांनी अचानक आपली भूमिका का बदलली, त्याला कोण कारणीभूत आहे याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेला भाजपा जबाबदार आहे असा आरोप शिवेसेनेने, काँग्रसने त्याच दिवशी केला. पण याबद्दलच्या चर्चा अजूनही सुरू आहेत.
बृजभूषण शरण सिंह हे अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या दोघांचा एक फोटो प्रसिद्ध केला असून बृजभूषण यांना शरद पवारांनी मदत केल्याचे सूचित केले आहे.
मनसेचे नेते सचिन मारुती मोरे यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. कुस्ती सामन्यांच्या वेळेस आणि पारितोषिक वितरणावेळेस हे तिघे एकत्र दिसत आहेत. त्यावरुन बृजभूषण यांना पवारांची मदत असल्याच्या चर्चा केल्या जात आहेत.
या फोटोबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी हा फोटो जुना असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असं मत व्यक्त केलं.
ते म्हणाले, "मा. पवारसाहेब हे कुस्तीच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. बृजभूषण सिंहही त्यांच्या राज्यातल्या कुस्तीच्या संघटनेत पदाधिकारी आहेत. जुन्या काळात महाराष्ट्रात एका कुस्तीच्या कार्यक्रमातला हा फोटो दिसतोय. त्याचा आणि याचा राजकीय संबंध लावण्याचं कारण नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)