राज ठाकरेंचा अयोध्या दौरा 'या' आजारामुळे स्थगित

राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा तुर्तास रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः ट्वीटरवर याची माहिती दिली आहे.

पण त्याचवेळी रविवारची पुण्यातली सभा मात्र होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सभेत दौरा का रद्द केला याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

राज यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या पायावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या पायावर या आधीही काही महिन्यापूर्वी शस्रक्रिया झाली होती.

राज ठाकरे गेल्यावर्षी मार्चमध्ये टेनिस खेळताना पडले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पायाचं दुखणं सुरू झालं. एप्रिल महिन्यात त्यांनी ऑपरेशन केलं होतं.

पण त्यानंतरही दुखणं बरं झालेलं नाही. आता पुन्हा त्यांचा पाय दुखणं सुरू झालंय. डॅाक्टरांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे दौरा रद्द झालाय, अशी चर्चा सुरू झालीये.

अयोध्या दौऱ्याला विरोध

राज्यातले मशिदीवरचे भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला आहे.

"उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही. 5 जूनसाठी आमची तयारी सुरू आहे. यात संतांचाही सहभाग आहे. संत जे सांगतील ते इथे होईल," असं बृजभूषण यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शनसुद्धा केलं होतं.

राज ठाकरे येत्या रविवारी पुण्यात सभाही घेणार असून याआधी त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद येथे सभा घेतली आहे.

संजय राऊतांचा टोला

राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना टोला हाणला आहे.

"इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते पण त्यांनी ते रद्द केले हे माध्यमांकडून मला समजलं. आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग अयोध्येत आहे. असं कळलं की ते जात नाहीत," असं राऊत म्हणाले

तसंच "भारतीय जनता पक्षाने असं त्यांच्या बाबतीत का करावं. भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं," असासुद्धा टोला राऊत यांनी हाणला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)