बालगंधर्व: अस्वच्छता, दुर्गंध आणि जागोजागी मारलेलं फिनेल: नाट्यगृहाबद्दल काय बोलत आहेत कलाकार?

फोटो स्रोत, FACEBOOK/VISHAKHA SUBHEDAR
"बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरिन इन्फेकशन घरी घेऊन जाते. प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते…तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची. काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत...!"
हे विधान आहे अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं.
गेले काही दिवस पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर हे चर्चेत आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दाखवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्विकासावरून पुण्यातील नागरिक, कलाकार यांच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. या चर्चेतच विशाखा सुभेदार यांनी या नव्या-जुन्याच्या वादापलीकडे जात बालगंधर्ववरील मुलभूत सुविधांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विशाखा सुभेदार यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठेला 'कुर्रर्रर्रर्र'चा प्रयोग झाला.
सातत्याने गंधर्वबद्दल बातम्या कानावर येत आहेत. बांधकाम करायचं आहे. पण म्हणून आता जे नाटकासाठी वापरात येत आहे त्याची काळजी घ्यायला नको का?
बालगंधर्व…जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूममध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो.
मेकअपरूमची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो…आरसे डागळलेले… Makeup box ठेवायला त्याखालचा कट्टा जेमतेम, बसायला 'खुर्च्या' नुसत्या म्हणायला…चारपाय आणि बूड टेकायला एक फळी प्लास्टिकची इतकीच तिची खुर्ची म्हणून ओळख. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही..
आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूमची...अतिशय घाण. अस्वच्छ...वास...कधी कधी नुसतंच मरणाचं फिनेल मारून ठेवतात...पण बाकी अस्वछच. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत?

बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते. प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची. काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत...!
आणि ac ची सोय. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं...इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बरं ह्याबद्दल तक्रार करावी, तर तिथले कर्मचारी म्हणतात की तो स्लोच आहे. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय.
श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ, timing साधायचं, कपडे बदल ही तारेवरची कसरत असते..
घामामुळे कपडे चिकटलेले असतात. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंगची वेळ बदलते...अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही.
वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा.
भाडे मात्र नीट आकारलं जातं.
आपली परंपरा टिकविण्यासाठी. रंगभूमी टिकून राहावी, थोडेच पैसे मिळवावे म्हणून आम्ही सगळे कलाकार जीवाचं रान करतो. मग तिथले व्यवस्थापक, जे आहे त्याची डागडुजी करून का घेत नाहीत? आहे ते जपत का नाही? जाऊ दे,आत्ता काय मोडायचं आहे. म्हणून दुर्लक्ष करणारी कर्मचारीं मंडळी...ह्या सगळ्याचं काय करायचं?
विशाखा सुभेदार यांच्याप्रमाणेच अनेक नाट्यकलावंतांनी बालगंधर्वच्या दुरावस्थेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. बालगंधर्वमधील गैरसोयींचा मुद्दा उपस्थित करताना या चालू स्थितीतील नाट्यगृह पाडून त्याचा पुनर्विकास करताना नाटकांचे प्रयोग कुठे आणि कसे करायचे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
...तर प्रयोग कुठे करणार?
अभिनेता सुयश टिळक याने बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "स्पष्ट सांगायचं झालं तर केवळ बालगंधर्वच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक नाट्यगृहांची दुरवस्था आहे. बालगंधर्वबद्दल बोलायचं झाल्यास इथले वॉश रुम खरंच खराब आहेत. एसी फंक्शनल नाहीयेत. काही प्रयोगांना पाहिलं की, डासांचा पण त्रास आहे. असे अनेक प्रॉब्लेम आहेत."

फोटो स्रोत, Facebook/Suyash Tilak
"आता बालगंधर्वाच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू आहे. यासंबंधी जो काही निर्णय आहे, तो लवकरात लवकर घेतला जावा असं मला वाटतंय. कारण जिथे प्रयोग सुरू आहे, असं नाट्यगृह बऱ्याच काळासाठी बंद राहिलं तर नाटकांचे प्रयोग करणार कुठे?" असा प्रश्न सुयश टिळकने उपस्थित केला.
जर बालगंधर्वचा पुनर्विकास झालाच तर प्रयोगांसाठी पर्यायी सोय उपलब्ध करून द्यायला हवीत. जी नवीन नाट्यगृहं बांधली आहेत, ती तातडीनं खुली करण्यात यावीत असंही सुयशनं म्हटलं.
नवीन नाट्यगृह बांधून काय मिळणार आहे?
ज्येष्ठ अभिनेते विजय पटवर्धन यांनीही फेसबुकवर बालगंधर्व नाट्यमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टमधले काही महत्त्वाचे मुद्दे इथे देत आहोत.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'व्यावसायिक नाटक असो, हौशी नाटक असो, बालनाट्य असो किंवा प्रायोगिक नाटक असो किंवा स्पर्धेचं नाटक असो, बालगंधर्वमध्ये प्रयोग करणं म्हणजे आम्हा कलाकारांसाठी एक पर्वणीच असते.कलाकारांना जसं इथे प्रयोग करणं आनंद देणारं आहे, तसंच रसिकांनाही इथे प्रयोग बघणं आनंद देणारं आहे. म्हणूनच सर्व सोयींनी उपयुक्त असं हे रंगमंदिर पाडून त्याजागी नवीन वास्तू उभारणे आम्हा कलाकारांना योग्य वाटत नाही. उलट कुठेही नवे नाट्यगृह बांधायचे ठरते तेव्हा बालगंधर्व रंगमंदिरासारखे नाट्यगृह बांधण्याचा आग्रह केला जातो. तेच नाट्यगृह पाडून नवीन बांधून काय मिळणार आहे?'
"यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी जे नाट्यगृह बांधण्याचं काम चालू आहे, ते गेली कित्येक वर्षं चालूच आहे. उत्तम चाललेल्या नाट्यगृहाची दुरावस्था झालेली बघवत नाहीये. तशीच दुरावस्था करण्याची कल्पना का आली आहे आणि कोणाच्या डोक्यात आली आहे कळत नाहीये. पुण्यात अनेक मॉल आहेत की, इथेच कशाला मॉल चालू करायचे आहेत? एक उत्तम नाट्यगृह असताना ते पाडून तिथेच तीन नाट्यगृह बांधून कोणाचा काय फायदा होणार आहे?" असं विजय पटवर्धनांनी म्हटलं.

फोटो स्रोत, vijay patwardhan/Facebook
"जर बालगंधर्व नूतनीकरणासाठी पाडलं, तर नाट्य निर्मात्यांनी प्रयोग लावायचे कुठे? (नवीन नाट्यगृह सुरू होण्यास, दोन पेक्षा अधिक वर्षं तरी लागतीलच.) पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी भरत नाट्य मंदिर आहे, तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणून रसिक येत नाहीत. टिळक स्मारक मंदिर मध्ये पहिल्या रांगेतलं तिकीट काढलं तरी दोन जिने चढून जावं लागतं. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची दुरावस्था आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एकमेव नाट्यगृह उरेल. एका नाट्यगृहात महिन्यातून किती संस्थांना प्रयोग करायला मिळतील?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
बालगंधर्वच्या दुरवस्थेबद्दल बोलताना विजय पटवर्धनांनी म्हटलं, "कलाकारांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची सध्या दुरावस्था आहे. टॉयलेट मध्ये फ्लश टँक चालू नाही. त्यात पाणी नाही. त्यामुळे मलविसर्जन होत नाही. जागोजागी माव्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे स्वच्छतागृहात जायला किळस वाटते आणि जरी नाईलाजाने गेलो तरी, स्वच्छतागृहाचे दार लागत नाही किंवा कडी तरी लागत नाही. कलाकारांना पिण्याचे पाणी मिळावे ह्यासाठी पूर्वी पाण्याची उत्तम सोय केली होती. त्यासाठी थंड पाण्याची टाकी आणि दोन ग्लास होते. पण, आता ती टाकी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे, कलाकारांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी लांब जावे लागते. मेकअप रूममध्ये कचरा टाकण्यासाठी डस्टबिन नाहीत. त्यामुळे, कचरा इतस्ततः टाकला जातो आणि मेकअपरूम घाण होतात. "
अर्थात, या गोष्टींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
"अजूनही काही बारीक सारीक गोष्टींकडे जर नीट लक्ष दिले तर, बालगंधर्व सारखे रंगमंदिर कुठेच बघायला मिळणार नाही. हे रंगमंदिर बांधले गेले तेव्हापासून पुण्याचे वैभव, पुण्याचा मानबिंदू. पुण्याची शान मानले गेले आहे. म्हणूनच रंगमंदिरात थोडी सुधारणा करून, ते पूर्वी होते तसेच ठेवावे आणि पुण्याची शान अबाधित ठेवावी ही विनंती," असं विजय पटवर्धनांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बालगंधर्वचा इतिहास
बालगंधर्व नाट्यगृहाच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे. तेव्हाचं पुणे हे 1961 साली पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या आपत्तीमधून सावरत होतं. अशातच मुठा नदीच्या काठावर विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असं एक नाट्यगृह बांधावे अशी संकल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा त्याला विरोध झाला.
काहींनी शहरापासून दूर असल्याचं कारण सांगितलं. तर काहींनी त्या भागातले झोपडपट्टीवासी कुठे जातील असा प्रश्न उपस्थित केला. अखेर 8 ऑक्टोबर 1962 झाली खुद्द बालगंधर्व यांच्याच उपस्थितीमध्ये या इमारतीचं भूमिपूजन झालं.
या रंगमंदिराला स्वतःचं नाव देण्याची परवानगी बालगंधर्व यांनी दिली.
"पुलंच्या संकल्पनेमधून बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी झाली. भुजंगराव कुलकर्णी तेव्हा पुण्याचे कमिशनर होते. तेव्हा याला थोडा विरोध झाला. हे पालिकेचे काम नाही असं सूर आला. रस्ते बांधणे, दवाखाने बांधणे, शाळा बांधणे, बगीचे तयार करणे, एवढंच काम पालिकेनं करावं असं काहींनी म्हटलं. पण पुलंनी सांगितलं की, ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्या बालगंधर्वांचं स्मारक व्हायलाच हवं.

ते पुण्यातच व्हायला हवं कारण त्यांचा जन्म पुण्याचा. त्यांना लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही उपाधी ही पुण्यातच दिली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना पुण्यातच झाली. ते अखेर अनंतात विलीन झाले ते पुण्यातच. त्यामुळे पुणे शहरात त्यांचं स्मारक व्हावं अशी फार इच्छा होती," ज्येष्ठ निवेदिका, अभिनेत्री आणि बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस यांनी सांगितलं.
अनुराधा राजहंस यांनी बालगंधर्वाच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, "कलाकारांचा पुनर्विकासासाठी विरोध यासाठी आहे की, जर रंगमंदिर पाडलं आणि परत लवकर ऊभारणी झाली नाही तर काय करायचं? या कोरोनामुळे दोन वर्ष सगळंच बंद होतं. बालगंधर्व पाडलं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं काम अजूनही सुरुच आहे. मग प्रयोग करायचे कुठे. त्यामुळे तशी आधी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी आहे. नवीन व्हायला पाहीजे याचा मला पाठींबा आहे. नवीन झालं तर बरेच प्रश्न सुटतील. मॉल करुन कुठेतरी छोटंसं थिएटर करावं असं व्हायला नको. दुकानं, खाण्याची ठिकाणं फक्त होतील असं नको. हे एक बालगंधर्वांचंच स्मृतीस्थळ राहायला हवं."
ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना पुनर्विकासासंबंधी भूमिका मांडताना म्हटलं होतं, "आता तो पाडण्याचा विचार सुरू आहे. मला वाटतं की हा नगरसेवकांचा पैश्यांसाठीचा ऊद्योग आहे. रिनोव्हेट करा. पाडायची काय गरज आहे? मला भीती वाटते की, मॉलसारखी रचना इथे होईल आणि तिथे नाटक काही होईल की नाही अशी भीती आहे. थोडी ऐसपैस जागा राहू द्या तेवढ्या जागेमुळे अख्या पुण्याचं काही अडत नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








