'राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत बोलल्यावर मुस्लिमांनी मला विचारलं, तुमच्या साहेबांनी असं का केलं?'

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मनसेची स्थापना झाली तेव्हा ती मराठीच्या मुद्द्यावर झाली आणि मनसेचा झेंडा देखील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचं सांगितलं जात होतं पण आता मनसेनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर मिश्रवस्तीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर एक आव्हान निर्माण झालं होतं.
या आव्हानाला स्थानिक पातळीवर कार्यकर्ते कसं सामोरं जात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
पुण्यातील जनता वसाहतीमध्ये नाज इनामदार या मनसेच्या महिला सेनेच्या पर्वती उपविभाग अध्यक्ष म्हणून काम करतात. सुमारे 40-45 हजार लोकवस्ती असलेल्या जनता वासाहतीमध्ये मिश्रवस्ती आहे. हिंदू, मुस्लीम, बौद्ध असे सर्वधर्मीय वर्षानुवर्षं इथं सोबत राहत आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये नाज यांनी जेव्हा मनसेचं सदस्यत्व स्वीकारलं, तेव्हा भविष्यात पक्षाची भूमिका कशी बदलेल याचा अंदाज त्यांना नव्हता, असं देखील
ठाण्यातल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाची घोषणा केली. मनसे कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी त्याच सभेमधून मशिदीवरच्या भोंग्याबाबत राज्य सरकारलाही अल्टिमेटम दिला.
अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये मिश्र लोकवस्तीत काम करणाऱ्या अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर पेच निर्माण झालाय. नाज इनामदार त्याला अपवाद नव्हत्या.

"मला अडचणी आल्या. जवळच्या मशिदीमधले लोक माझ्याकडे आले. म्हणाले की काय तुमच्या साहेबांनी असं का केलं? मी त्यांना समजावून सांगितलं. तुम्हाला नमाज पढण्यापासून कुणी रोखलं नाही. भोंगा नाही तर नाही. तुम्ही पण थोडं समजून घ्या. त्यांना माझ्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न केला.
"ज्या दिवशी आदेश आले त्या दिवशी त्यांनी भोंगे काढले. त्यांनी डेसिबल कमी केला. त्यांना मी सांगतलं की, या भागात मी राहतेय. जर माझं काम तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं तर तुम्ही मला बोला. मी त्यांना माझ्या पद्धतीने समजावलं. त्यांनीही मला समजून घेतलं. ते म्हणाले की ठीक आहे तुझं आणि हमीद सरांचं काम बघता आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं ते म्हणाले," असं नाज इनामदार यांनी सांगतिलं.

सामाजिक कार्यात सर्वधर्म समभावाचा मंत्र नाज यांनी त्यांच्या दिवंगत पतीकडून घेतला. लग्नानंतर त्यांनी दोन्ही धर्मांचा समन्वय साधला, असं त्या सांगतात.
त्यांचे पती हमीद इनामदार हे जनता वसाहतीमध्ये सामाजिक कार्यकर्ते होते. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांचंच काम पुढे नेणं हे माझं ध्येय असल्याचं नाज यांनी सांगितलं. कोरोना काळात मनसेच्या नेत्यांनी केललं काम पाहता त्यांनी मनसेमध्ये येऊन काम करण्याचं ठरवलं.
"पक्षात काही टप्पा गाठायचा असं धोरण माझं कधीच नव्हतं. जे काही हमीदसरांनी पेरुन ठेवलं ते जिवंत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी राजकारण हा माझ्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. मी एकटी महिला आहे. एकटी महिला मी कुठे कुठे पळू शकते. माझे उपक्रम घेताना मनसैनिक माझ्या सोबत असतात आणि मी बिनधास्त काम करू शकते," असं नाज इनामदार सांगतात.

पतीच्या निधनाचा धक्का पचवून नाज कुटुंबासाठी ऊभ्या राहिल्या. घरातलं काम, मुलांच्या गरजा आणि कुटुंबातल्या बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या पक्षाचं काम करतायेत.
महिलांचा बचत गट, लहान मुलांचं शिक्षण यासाठी त्या काम करतात.
मिश्रवस्तीत काम करताना, घरात दोन्ही धर्माचं पालन करताना आता त्यांच्या पक्षाच्या हिंदुत्ववादी धोरणाची अंमलबजावणीही त्यांना करावी लागणार आहे.
पक्षाच्या बदललेल्या धोरणामुळे त्यांना काही बदल जाणवत आहेत का? याचं उत्तर देताना नाज म्हणतात की, "मला काही बदल जाणवला नाही. मी औरंगाबादच्या सभेला गेले होते. राजसाहेब म्हणाले की आम्ही मंदिरावरचे पण आवाज कमी करणार. समानतेने मार्ग त्यांनी दाखवला.

"मी मनात खंत नाही ठेवली. काही शंका नाही ठेवली. राज ठाकरे एका मीटिंगमध्ये म्हणाले होते की मी कुणाकडे जाताना माणूस पाहतो त्या व्यक्तीचा धर्म नाही आणि त्याच्यातील माणुसकी पाहतो. मी देखील याच गोष्टीचं पालन करते," नाज सांगतात.
नाज यांनी सर्वांसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. पक्षाच्या धोरणात राहून सर्व घटकांसाठी कसं काम करता येईल हेच त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.
"मी पक्षाच्या धोरणानुसार चालणार. शिवाजी महाराजांनी काम करताना प्रत्येक माणसाचा विचार केला. ते रयतेमधलेच एक झाले. तसंच काम करताना मी ग्राऊंडवर राहून जे प्रश्न येतील ते त्या पातळीनुसारच हॅंडल करणार. सर्व वर्गातल्या महिला असो की कोणत्याही क्षेत्रातले लोक असो त्यांच्यासाठी मी काम करायला तयार आहे," असं नाज यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








