भारत पारेख यांच्यासारखे LIC एजंट लाखो रुपयांची कमाई कशी करतात?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत पारेख गेल्या काही दशकांपासून LIC पॉलिसी विकण्यासाठी नागपूरमधील वृत्तपत्रात छापल्या जाणाऱ्या मृत्यूंच्या बातम्या शोधत असतात आणि स्मशानघाटांवर फेऱ्या मारतात.

पारेख म्हणतात की, "भारतात तुम्हाला अंत्यसंस्काराला जाण्यासाठी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नसते. पार्थिव घेऊन जाणाऱ्या लोकांकडे पाहूनच तुम्ही शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाला ओळखू शकता. तुम्ही मृताच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भेटता आणि त्यांना तुच्याबद्दल सांगता. तुम्ही त्यांना सांगा की, मृत्युमुखी पडलेल्याच्या विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवण्यासाठी मी मदत करेन आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमचं व्हिजिटिंग कार्ड सोडून जा."

तेरावं झाल्यावर कुटुंबातील काही सदस्य त्यांना फोन करतात. मात्र, बऱ्याच लोकांना ते घरात जाऊनच भेटतात. पारेख नेहमी ही खबरदारी घेतात की, डेथ क्लेम वेळेवर सेटल झाला पाहिजे.

पारेख लोकांना विचारतात की, एखाद्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर काय आर्थिक आघात झाला, त्यांच्यावर कुणाची उधारी आहे का, त्यांनी कुठला विमा घेतलाय का आणि त्यांच्याकडे बचत किंव गुंतवणूक केलेली आहे का?

पारेख म्हणतात की, "कुणाही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यांचं दु:ख मला कळतं. मी लहान असतानाच, माझ्या वडिलंना मी गमावलं आहे."

वय वर्षे 55 असलेले भारत पारेख देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC च्या 13 लाख 6 हजार एजंट्सपैकी एक आहेत.

नुकतेच शेअर बाजाराचे दार ठोठावणाऱ्या LIC ने 28.6 कोटी पॉलिसी विकल्या आहेत आणि त्यात एक लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

66 वर्षे जुनी कंपनी असलेल्या LIC बद्दल भारतातील जवळपास सर्व कुटुंब जाणतात. या कंपनीच्या 90 टक्के पॉलिसी भारत पारेख यांच्यासारख्या एजंट्सनीच विकल्या आहेत.

32.4 कोटी डॉलरच्या पॉलिसी विकल्या

भारत पारेख LIC च्या स्टार एजंट्सपैकी एक आहेत. ते इतर उत्साही सेल्समनसारखेच पॉलिसीच्या फायद्यांबद्दल लोकांना सांगत असतात. आतापर्यंत त्यांनी 32.4 कोटी डॉलरच्या पॉलिसी विकल्या आहेत. यातील सर्वाधिक पॉलिसीधारक महाराष्ट्रातील नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत.

पारेख सांगतात की, "आतापर्यंत 40 हजार पॉलिसी विकल्या आहेत आणि यातील एक तृतीयांश कमिशन मिळतं. यासोबत प्रीमियम जमा करण्याची आणि क्लेम सेटल करण्याची सेवा मोफत देतो."

हा असा व्यवसाय आहे, ज्यात कुणी सेलिब्रिटी नाही, तरी त्यात भारत पारेख हे एखाद्या स्टारसारखेच आहेत.

माध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटलं जातं की, भारत पारेख यांची कमाई LIC च्या चेअरमनपेक्षाही जास्त आहे. जवळपास तीन दशकांपासून भारत पारेख मिलियन डॉलर राऊंड टेबलचे सदस्य आहेत.

मिलियन डॉलर राऊंड टेबल हा जगभरातील लाईफ इन्श्योरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचा गट आहे. तिथं पारेख यांना प्रेरणादायी भाषणांसाठी बोलावलं जातं. पारेख यांनी एकदा तर या आपल्या भाषणांची ऑडिओ कॅसेट बनवूनही विकली आणि या कॅसेटचा मथळा होता - 'मीट द नंबर वन, बी द नंबर वन'.

पारेख यांच्या कायम बिझी असणाऱ्या ऑफिसमध्ये 35 लोक काम करतात. या ऑफिसमधून ते त्यांच्या ग्राहकांना विविध सुविदा पुरवतात. मात्र, त्यांच्या व्यवयासायाचा मोठा भाग विमाच आहे.

भारत पारेख हे एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये त्यांची पत्नी बबिता यांच्यासोबत राहतात. बबिता यासुद्धा विमा एजंट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पारेख यांनी नवी कोरी इंलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी केली.

त्यांनी माझ्याशी बोलताना मोठ्या उत्साहात म्हटलं की, पाहा ही किती वेगवान धावते.

खडतर बालपण

भारत पारेख यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्यातील एका भागात बचतीबाबत सल्ले दिलेत आणि दुसऱ्या भागात त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलंय. त्यात वॉल्ट डिस्नेचं वाक्य लिहिलंय - 'जर तुम्ही एखादं स्वप्न पाहत असाल, तर ते पूर्णही करू शकाल.'

पारेख यांच्या यशामागे हाच विचार आहे. मिल वर्कर आणि गृहणी आईचा मुलगा असलेल्या भारत पारेख यांच्या खऱ्या आयुष्यात खरंतर स्वप्न पाहण्याचीकी कुवत नव्हती.

ते 200 स्केअर फुटांच्या घरात आई-वडिलांसोबत राहत होते. शेजारीच त्यांचे आठ आणखी नातेवाईक राहत होते. आयुष्य अत्यंत खडतर होतं. सर्व भावंडं मिळून अगरबत्त्या बॉक्समध्ये पॅक करण्याचं काम करत असत. जेणेकरून गरजा पूर्ण व्हाव्यात.

जेव्हा भारत पारेख 18 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी कॉलेज करता करता इन्श्योरन्स विक्रीस सुरुवात केली. सायकलवरून फिरून ते संभाव्य क्लायंट्सना शोधत असत. यावेळी त्यांची बहीण कागदपत्रांचं काम सांभाळत असे.

पॉलिसी विकण्यासाठी ते क्लायंटसमोर घरोघरी बोलणाऱ्या भाषेचा वापर करत असत.

"विमा त्या अतिरिक्त टायरसारखा आहे, ज्याची आवश्यकता गाडी पंक्चर किंवा ब्रेकडाऊन झाल्यानंतरच पडते."

भारत पारेख यांनी हेच वाक्य त्यांच्या ग्राहकांना सांगितलं होतं. ग्राहकाने पॉलिसी खरेदी केली आणि पारेख यांना यासाठी 100 रूपये कमिशन मिळालं.

पहिले सहा महिने पारेख यांनी पॉलिसी विकल्या. या कामाचं वर्षाकाठी त्यांना 15 हजार रूपये मिळाले. हे सर्व पैसे त्यांनी घरात दिले.

हे सरलेले दिवस आठवत पारेख म्हणतात की, "विमा विकणं कठीण होतं. अनेकदा घरी परतल्यावर रडत असे."

विमा एजंट्सची प्रतिमा कायमच वाईट रंगवली जाते. त्यांना एखाद्या शिकाऱ्यासारखं समजलं जातं, जो ग्राहकांच्या अडचणींचा फायदा घेतो.

मात्र, पारेख या अडचणींना घाबरले नाहीत. वर्षागणिक ते चांगलं काम करण्याच्या प्रयत्नात राहिले.

त्यांना लक्षात आलं की, मृत लोकांचा माग काढणं हे जिवंत लोकांशी संपर्क करण्यापेक्षा अधिक बरं आहे. आता रस्त्याकडेला स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकापर्यंत, सर्व त्यांचे ग्राहक आहेत.

पारेख यांचे एक क्लायंट आहेत बसंत मोहता. मोहता हे टेक्स्टाईल मिलचे मालिक आहेत आणि नागपूरपासून 90 किलोमीटर दूर ते राहतात. ते सांगतात की, त्यांच्या कुटुंबातील 16 लोकांनी पारेख यांच्याकडून विमा खरेदी केला आहे. कुटुंबातील 88 वर्षीय आई आणि एका वर्षाचा नातूही पारेख यांचा क्लायंट आहे. मोहता आणि पारेख एका फ्लाईटमध्ये एकमेकांना भेटले होते.

तंत्रज्ञानाच्या वापरात सर्वात पुढे

पारेख यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या यशात तंत्रज्ञानाचाही वाटा आहे. त्यांनी 1995 मध्ये सिंगापूरहून तोशिबाचा लॅपटॉप मागवला आणि आपले सर्व रेकॉर्ड त्यावर ठेवण्यास सुरुवात केली.

ते आपल्या कमाईतील काही भाग परदेशात जाऊन आर्थिक गोष्टींशी संबंधित प्रशिक्षण घेण्यास खर्ची करतात. भारतात सर्वात पहिला मोबाईल खरेदी करणाऱ्यांमधील भारत पारेख हे एक होते. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेजर दिलं होतं.

त्यांनी क्लाऊडवर आधारित तंत्रज्ञानात गुंतवणूक केलंय आणि त्यांचं स्वत:चं एक अॅपही आहे. ते रोज स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देतात.

भारतात विमा बऱ्याचदा कमी वयात मृत्यू आणि टॅक्समध्ये सूट मिळावी या उद्देशाने घेतात. मात्र, आता काळ बदलत चाललाय. LIC स्वत: असं मानते की, म्युच्युअल फंड, लघू बचत योजना आणि इतर योजनांच्या आगमनामुळे आव्हानाची स्थिती निर्माण झालीय.

विमा कंपन्या आता अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून ग्राहक ऑनलाईन पॉलिसी खरेदी करू शकतील. मग यामुळे पारेख यांच्यासारख्या एजंट्सचं महत्त्वं कमी होईल?

लाईफ इन्श्योरन्स एजंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिंगरापु श्रीनिवास यांना असं वाटत नाही. ते म्हणतात की, "एजंट कायम राहतील. विमा विकण्यासाठी क्लायंट्सला थेट जाऊन भेटण्याची आवश्यकता असते. कारण क्लायंट्सच्या मनात अनेक प्रश्न असतात."

विमा कंपन्यांच्या आधुनिकीकरणासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचं भारत पारेख स्वागत करतात. ते म्हणतात की, यामुळे व्यवसाय वाढेल आणि आमच्याकडे जास्त काम येईल.

भारत पारेख आणि त्यांची टीम रात्रंदिवस काम करते. आपल्या ग्राहकांना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचंही ते काम करतात. ग्राहकांशी सातत्यानं सपर्क ठेवणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे.

ते म्हणतात की, सर्वांना संदेश पाठवतोच, काहीजणांना भेटवस्तूही पाठवतो.

मी त्यांना विचारलं की, 40 हजार विमाधारकांच्या जीवन-मृत्यूच्या नोंदी कशा ठेवता, तर त्यावर थोडं हसून ते म्हणाले, "हे सिक्रेट आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)