LIC च्या IPO मध्ये अशी गुंतवणूक करता येईल, जाणून घ्या 3 महत्त्वाचे मुद्दे

एलआयसी, अर्थव्यवस्था, पैसा, अर्थकारण, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एलआयसी
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

देशातली सगळ्यांत मोठी आणि जगातही पाचव्या क्रमांकाची मोठी कंपनी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा एलआयसीचा आयपीओ येत्या चार तारखेपासून बाजारात येतोय.

'जिंदगी के साथ भि, और जिंदगीके बाद भी', असं म्हणत एलआयसीने या घडीला सुमारे 29 कोटी भारतीयांचा विमा उतरवून त्यांचं भविष्य सुरक्षित केलंय. आणि आता विमाधारकांबरोबरच इतरांनाही ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून आपल्याशी जोडू पाहत आहे.

एलआयसीची शेअर बाजारात नोंदणी होतेय. आणि तुम्हालाही कंपनीची हिस्सेदारी मिळू शकणार आहे. पण, त्यासाठी नेमकं काय करायचं आणि मुळात एलआयसीत गुंतवणूक करायची की नाही हे समजून घेऊया…

1. LICच्या IPOची वैशिष्ट्यं

एसआयसीचा विमा ही सुरक्षित गुंतवणूक आहे. तसंच देशाची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांनाही कंपनीचा मोठा आधार आहे. शेअर बाजारातली जवळ जवळ निम्मी गुंतवणूक कंपनी आपल्या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करत असते.

आणि निर्देशांकाची मोठी पडझड रोखण्याचं कामही करते. त्यामुळे शेअर बाजाराशी कंपनीची नाळ पूर्वीच जोडली गेली आहे. आता तर खुद्द कंपनीच बाजारात एक खेळाडू म्हणून उतरतेय. तेव्हा आधी कंपनीचा आयपीओ नेमका कसा आहे हे थोडक्यात बघूया.

एलआयसीचा आयपीओ 4 ते 9 जून पर्यंत गुंतवणुकदारांसाठी खुला राहणार आहे. म्हणजे या काळात तुम्ही शेअरसाठी नोंदणी करू शकता.

सध्या पूर्ण सरकारी मालकीच्या असलेल्या या कंपनीतून सरकार साडेतीन (3.5%) टक्के हिस्सेदारी विकणार आहे.

सरकार 22,13,74,920 शेअर विकून जवळ जवळ 20,557 कोटी रुपये त्यातून उभे करणार आहे.

म्हणजेच सरकारच्या निर्गुंतवणुकीकरण योजनेतली ही सगळ्यांत मोठी उडी आहे.

एलआयसी, अर्थव्यवस्था, पैसा, अर्थकारण, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एलआयसी

आयपीओ गुंतवणुकदारांसाठी शेअरची किमान आणि कमाल किंमत 902 रुपये ते 949 रुपये ठरवण्यात आली आहे.

एलआयसी विमाधारकांसाठी 60 रु. तर कंपनीचे कर्मचारी आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 45 रुपयांची विशेष सूट आहे

गुंतवणुकीसाठी लॉट आहे 15 शेअरचा.

तुम्हाला शेअर मिळाले की नाही, किंवा किती मिळाले हे तुम्हाला 12 मेला कळेल.

तर एलआयसीच्या शेअरची बाजारात प्रत्यक्ष नोंदणी 17 मेला होईल असा अंदाज आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना परिस्थिती यामुळे सध्या शेअर बाजारातलं वातावरण सकारात्मक नाही. त्यामुळे अर्थमंत्रालयाने जपून पावलं टाकत आधी ठरलेल्या पेक्षा कमी आकाराचा आयपीओ बाजारात आणला आहे.

पण, लोकांचा एलआयसी कंपनीवरचा विश्वास आणि कंपनीचं शेअर बाजारातलं स्थान आणि महत्त्व यामुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात या आयपीओची चर्चा आहे. मग या आयपीओमध्ये गुंतवणूक कशी कराल?

2. LIC IPOमध्ये गुंतवणूक कशी कराल?

अर्थात, त्यासाठी तु्म्हाला डीमॅट खात्याची गरज आहे. आणि सरकारची अशीही इच्छा आहे की, एलआयसी आयपीओच्या निमित्ताने देशात या खात्यांची संख्या आणि पर्यायाने शेअर बाजारातले गुंतवणूकदार वाढावेत.

व्हीडिओ कॅप्शन, IPO म्हणजे नेमकं काय? यात गुंतवणूक करावी की नाही? । सोपी गोष्ट 465

त्यानंतर इतर आयपीओ प्रमाणे तुमची जी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेत हे डिमॅट खातं असेल तिथे लॉग-इन करून आयपीओसाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला किती किमतीला शेअरचे किती लॉट विकत घ्यायचे आहेत, हे अर्जात नमूद करावं लागेल.

तुमच्याकडे एलआयसीची विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला अर्जात तसं नमूद करावं लागेल. आणि त्यासाठी तुमची पॉलिसी पॅन कार्डला जोडलेली असणं आवश्यक असेल. अशा जोडणीसाठी एलआयसीने फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिलेली होती. पॅन जोडलेलं असेल तर अर्जातल्या पॅन क्रमांकावर तशी पडताळणी करणं कंपनीला सोपं जाईल.

एलआयसी, अर्थव्यवस्था, पैसा, अर्थकारण, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एलआयसी

यावेळी पहिल्यांदा एकाच व्यक्तीला आयपीओचे दोन अर्ज भरता येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे पॉलिसी असेल तर तुम्ही एक अर्ज करू शकता आणि दुसरा स्वतंत्र अर्ज सामान्य गुंतवणूकदार म्हणून करू शकता.

दोन्ही अर्जांमध्ये तुम्हाला हव्या तितक्या लॉटची मागणी तुम्ही करू शकता. सध्याच्या अस्थिर शेअर बाजारात आयपोओला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ही तरतूद विशेष कायदा वापरून कंपनीने केली आहे. पण, त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संधी वाढणार आहेत.

आता महत्त्वाचा प्रश्न. या आयपीओत गुंतवणूक करावी का?

3. या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी का?

सरकारी कंपन्यांमधली सरकारची गुंतवणूक कमी करून खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने हा आयपीओ सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा यशस्वी झाला तर इतर निर्गुंतवणुकीच्या योजना पुढे रेटता येतील. पण, तुमच्या आमच्यासारख्या गुंतवणुकदारांसाठी हा आयपीओ किती महत्त्वाचा आहे? आपण यात गुंतवणूक करावी का?

एलआयसी कंपनीची संपत्ती जवळ जवळ साडेपाच लाख कोटी इतकी प्रचंड आहे. देशभरात कंपनीची मालमत्ताही मोठी आहे. आयुर्विमा क्षेत्रात आजही कंपनीचा क्रमांक पहिला आहे.

पण, कंपनी आपल्या पॉलिसी विकते ती देशभर पसरलेल्या एजंटच्या माध्यमातून. आणि त्यांच्याकडूनच कंपनीत विम्याची रक्कम जमा केली जाते. तसंच विमा पॉलिसीची कागदपत्रंही ऑफलाईन असल्यामुळे कंपनी चालवण्याचा खर्च तेवढाच मोठा आहे. ऑनलाईन व्यवहार वाढले तर हा खर्च आटोक्यात आणता येईल. आणि कार्यालयांची संख्याही सिमित ठेवता येईल.

एलआयसी, अर्थव्यवस्था, पैसा, अर्थकारण, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एलआयसी

या वाढत्या खर्चाचा परिणाम शेअर बाजारातल्या शेअरच्या मूल्यांकनावर भविष्यात होऊ शकतो. तसंच सध्याची शेअर बाजारातली घसरणही गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय असेल. पण, या गोष्टींचा कितीसा परिणाम एलआयसी शेअरवर पडेल असा प्रश्न बीबीसी मराठीने शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांना विचारला.

त्यांच्या मते, "आताच्या परिस्थितीत कुठलाही आयपीओ हा सोन्याचं अंडं देणारी कोंबडी नव्हे. पण, दीर्घकालीन संपत्ती जमा करण्याची ही चांगली संधी आहे."

"एलआयसीचा विमा क्षेत्रातला बाजार हिस्सा जगभरात 65% हून जास्त आहे. कंपनी बराच काळ नफ्यात आहे. आणि आताची शेअरची निर्धारित किंमत ही किफायतशीर आहे. या तीन गोष्टी खूपच सकारात्मक आहेत. आणि म्हणूनच ब्रोकरेज संस्थांनी आयपीओमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे," असं सोमण यांना वाटतं.

पण, म्हणून गुंतवणूकदारांनी कंपनीची नोंदणी होते त्याच दिवशी नफा कमावून शेअरमधून बाहेर पडण्याचा विचार करू नये, असंही त्यांना वाटतं.

"या गुंतवणुकीकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे. सरकारने यापूर्वीच आयपीओ काढण्याची तयारी केली होती. पण, रशिया-युक्रेन युद्ध आणि अस्थिर परिस्थिती यामुळे हा विचार पुढे ढकलला. याआधी सरकारने 2000च्या आसपास या शेअरची किंमत ठरवली होती.

पण, शेअर बाजारातलं नकारात्मक वातावरण आणि कंपनीच्या ठोस मूल्यांकनाचा अंदाज आल्यावर ही किंमत कमी करून 900च्या घरात आणण्यात आली. यावरून या आयपीओबद्दल सरकारही किती सावध आहे, हे लक्षात येतं. म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आयपीओत नक्की गुंतवणूक करावी. पण, एका दिवसात नफा कमावण्याची धोका पत्करण्यापूर्वी विचार करावा." असा सल्ला सोमण यांनी दिला आहे.

निखिलेश सोमण यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रोकरेज हाऊसेसनी या आयपीओला पसंती दिली आहे, गुंतवणुकीचा सल्लाही दिलाय. पण, गुंतवणुकीचा निर्णय आणि ती किती काळासाठी करायची हे प्रत्येकाने आपली आर्थिक गरज, परिस्थिती आणि मिळकत बघून ठरवायचं असतं. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ आणि सल्लागारांशी अवश्य चर्चा करा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)