WWE : वीर महान कोण आहे? WWE मध्ये त्याच्या एंट्रीमुळे खळबळ का माजली?

वीर महान

फोटो स्रोत, Twitter/veer mahan

फोटो कॅप्शन, वीर महान
    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

एक काळ होता. भारतात त्यावेळी क्रिकेटसोबतच WWE किंवा प्रचलित भाषेत WWF हा शो प्रचंड लोकप्रिय होता.

अंडरटेकर, केन, जॉन सिना, द रॉक यांच्यासारखे मोठमोठे सुपरस्टार त्यावेळी WWE मध्ये होते. पुढे भारताचा पहिला पैलवान म्हणून 'द ग्रेट खली' याने WWE मध्ये लोकांचं लक्ष वेधून घेतलं. या यादीत आता 'वीर महान' या नव्या दमाच्या पैलवानाचाही समावेश झाला आहे.

या निमित्ताने वीर महानची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसून येतं. WWE मध्ये प्रवेश केल्यापासून वीर महानचा अस्सल भारतीय लूक, त्याची स्टाईल यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्यामुळे वीर महान नेमका कोण आहे, त्याच्या एंट्रीमुळे WWE मध्ये खळबळ का माजली, याची आपण माहिती घेऊ -

वीर महान कोण आहे?

उत्तरप्रदेशातील एका लहानशा गावापासून ते WWE पर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत रंजक आणि तितकाच संघर्षपूर्णही राहिला आहे.

वीर महानचं खरं नाव रिंकू सिंग राजपूत. उत्तर प्रदेशच्या रविदास नगर जिल्ह्यातील गोपीगंज येथे 8 ऑगस्ट 1988 रोजी त्याचा जन्म झाला.

वीर महान

फोटो स्रोत, Twitter/veer mahan

रिंकू सिंगचे वडील ट्रक चालक म्हणून काम करायचे. त्यांना एकूण नऊ अपत्ये होती. त्यांच्यापैकी एक अपत्य म्हणजे रिंकू होय. सिंग कुटुंब गोपीगंजमध्ये एका छोट्याशा खोलीत राहत असे.

रिंकू सिंगला लहानपणापासूनच खेळामध्ये प्रचंड रस होता.

भालाफेक, बेसबॉल ते WWE

सुरुवातीच्या काळात शालेय जीवनात रिंकू सिंग भालाफेक या खेळात सहभाग नोंदवायचा. रिंकूने भालाफेकीत ज्युनियर नॅशनल पदकही पटकावलं. त्यानंतर त्याने लखनऊच्या गुरु गोबिंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

2008 मध्ये रिंकूने 'द मिलियन डॉलर' आर्म या भारतीय रिअलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला. बेसबॉलमध्ये वेगाने बॉल फेकणाऱ्या खेळाडूचा शोध घेण्यासाठी हा शो आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत रिंकूला आपल्या भालाफेकीच्या अनुभवाचा मोठा फायदा झाला. खरं तर रिंकूने पूर्वी कधीही बेसबॉल हा खेळ खेळलेला नव्हता. पण आपली मजबूत शरीरयष्टी आणि वेगवान फेकीच्या बळावर त्याने या स्पर्धेत विजय मिळवला. रिंकूने या स्पर्धेत प्रतितास 87 मैल (140किमी) वेगाने बॉल फेकून प्रथम क्रमांक पटकावला होता. या कहाणीवर एक चित्रपटही बनवण्यात आला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

यानंतर मात्र रिंकूचा बेसबॉल या खेळात रस वाढला. बेसबॉलमध्ये करिअर करण्यासाठी त्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी विविध बेसबॉल टीम्समध्ये सहभागी होण्यासाठी त्याने मेहनत घेतली. अखेर पिट्सबर्ग पायरेट्स संघासोबत करार करण्यात तो यशस्वी ठरला. यामुळे अमेरिकेत प्रोफेशनल बेसबॉलमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणूनही रिंकू सिंगच्या नावाची नोंद झाली.

पुढे रिंकू सिंगने बेसबॉल फेकीचा आपला वेग 87 मैल प्रतितासवरून 92 मैल प्रतितासपर्यंत (148 किमी) वाढवला. रिंकूने 2009 ते 2016 पर्यंत जगभरातील अनेक लीगमध्ये सहभाग नोंदवला. त्याने आपल्या कामगिरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं.

2018 मध्ये मात्र रिंकू सिंगने बेसबॉल खेळाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. त्याने व्यावसायिक रेसलिंग खेळाकडे आपला मोर्चा वळवला. 2018 मध्ये त्याने WWE सोबत पहिल्यांदा करार केला.

सौरव गुर्जर या भारतीय साथादारासोबत मिळून दोघांनी 'द इंडस शेर' म्हणून एक टीम स्थापन केली होती. दोघांनी सुरुवातीला WWE NXT मध्ये सहभाग नोंदवला. सुरुवीच्या काळात रिंकू सिंग आपल्या रिंकू या नावानेच WWE मध्ये दिसायचा.

पुढे, त्यांच्या टीममध्ये जिंदर महाल नामक आणखी एका सदस्य जोडला गेला. यावेळी मात्र रिंकूने वीर हे नवं नाव धारण केलं. अनेक दिवस या नावाने लढतीत सहभाग नोंदवला.

वीर, शँकी आणि जिंदर यांच्या टीमने सलग 12 सामने जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला. अखेर, 2021 मध्ये वीर काही कारणामुळे या पथकापासून वेगळा झाला. त्याने स्वतंत्र पैलवान म्हणून WWE - रॉ सोबत करार केला. यावेळी त्याने आपलं नाव वीर महान असं ठेवलं.

वीर महानचं 'ट्रंप कार्ड' काय सांगतं?

पूर्वीच्या काळी स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांचा मागमूसही नसताना WWE चे ट्रंप कार्ड लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. या ट्रंप कार्डमध्ये WWE पैलवानांची उंची, वजन आदी माहिती दिलेली असायची.

तर मग, वीर महानचं ट्रंप कार्ड काय सांगतं? वीर महानच्या मजबूत शरीरयष्टीचा उल्लेख बातमीत वर झालेलाच आहे. अगदीच नेमकं सांगायचं तर वीर महानची उंची 6 फूट 4 इंच इतकी आहे. तर वजन आहे 125 किलो.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

WWE च्या आखाड्यात वीर महानने एका अस्सल भारतीय लूकमध्ये दिसून येतो. खांद्यांपर्यंत रुळणारे लांब काळेभोर केस, लांबलचक दाढी यांच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं.

याशिवाय, या लूकचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे वीर महानच्या कपाळावर दिसणारं त्रिपुंड होय. त्याचा माजी साथीदार सौरव गुर्जरप्रमाणेच कपाळावर भलं-मोठं त्रिपुंड लावून तो कुस्तीत सहभागी होतो. याशिवाय, वीर महानच्या छातीवर मोठ्या अक्षरात गोंदलेलं 'माँ' तसंच उजव्या खांद्यावर गोंदलेला 'राम' सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि काळे कपडे या हटके लूकसह तो सामन्यात सहभागी होतो. याच लक्षवेधी लूकसह 4 एप्रिल रोजी वीर महानने WWE - रॉ मध्ये पदार्पण केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून वीरच्या WWE रॉ पदार्पणाची चर्चा होती. त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली. अखेर, 4 एप्रिल रोजी हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वीर महानने रे आणि डॉमिनिक मिस्ट्रियो या पितापुत्रांच्या जोडीला अस्मान दाखवल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजवल्याचं दिसून आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)