वेस्ट इंडीजच्या बॉलर्सनी भारतीय खेळाडूंना जखमी केलं तेव्हा....

मायकल होल्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मायकल होल्डिंग
    • Author, रेहान फझल,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सत्तरीच्या दशकात सबिना पार्क किंगस्टन इथली खेळपट्टी वेस्ट इंडीजमधील सर्वांत वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक होती. 1976 साली पोर्ट ऑफ स्पेनमधील कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर वेस्ट इंडीजने त्यांच्या संघातील तिघांपैकी दोन फिरकी गोलंदाजांना काढून टाकलं आणि त्यांच्या जागी व्हॅन डॅनिएल व वेनबर्न होल्डर या वेगवान गोलंदाजांना संघात समाविष्ट केलं.

त्यामुळे अंतिम सामन्यात यजमान संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला.

लॉइड यांनी नाणेफेक जिंकून वेगवान गोलंदाजांना पहिल्यांदा खेळपट्टी वापरायची संधी दिली.

परंतु, सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड या भारताच्या सलामीवीरांवर याचा फारसा फरक पडला नाही. होल्डिंग प्रत्येक चेंडूवर फलंदाजांना उडी मारायला भाग पाडत होते.

बऱ्याच वेळांनी त्यांनी एक फूल लेन्थ बॉल टाकला, तेव्हा गावस्करांनी मिड विकेट सीमेच्या दिशेने चौकार फटकावला.

त्यानंतर होल्डिंग यांनी एक बाउन्सर टाकला, त्याने मात्र गावस्कर यांचं डोकं जवळपास गारद व्हायची वेळ आली होती.

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

कसंबसं गावस्करांनी चेंडू चुकवला. परंतु, या गडबडीत त्यांची टोपी खाली पडली. सुदैवाने ती स्टम्पवर पडली नाही, अन्यथा ते बाद झाले असते.

बॉडीलाइन कसोटी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या

त्या दिवशी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी इतकी धोकादायक गोलंदाजी केली की, त्यामुळे 1933 सालच्या बॉडीलाइन कसोटी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.

त्या वेळी इंग्लंडचे कर्णधार डग्लस जार्डिन यांनी डॉन ब्रॅडमन यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेरॉल्ड लारवूड यांच्या साथीने एक विशेष रणनीती आखली.

जारडीन यांच्याप्रमाणे लॉइड यांनासुद्धा काहीही करून भारताविरोधातील सामन्यात विजय मिळवायचा होता.

1932 साली इंग्लंडच्या संघाचं मुख्य लक्ष्य ब्रॅडमन होते, त्याप्रमाणे 1976 साली वेस्ट इंडीजचा मुख्य शत्रू सुनील गावस्कर होते.

दुपारी जेवणासाठी घेतलेल्या एका तासाच्या विरामानंतरसुद्धा वेस्ट इंडीजला काही यश मिळालं नाही, तेव्हा लॉइड यांनी हुकमी एक्का म्हणून मायकल होल्डिंग यांना गोलंदाजीसाठी पुन्हा बोलावलं.

त्यांनी गावस्करसाठी 'अंब्रेला' पद्धतीची फिल्डिंग लावली आणि ज्युलियन व फ्रेडरिक्स या दोघांना लेग स्लीपमध्ये उभं केलं.

आपण 'राउंड द विकेट' गोलंदाजी करणार असल्याचं होल्डिंग यांनी पंचाला सांगितलं.

बाउन्सर आणि बीमर

सुनील गावस्कर व अंशुमन गायकवाड यांनी बाउन्सरांना तोंड द्यायची तयारी ठेवली होती.

पण होल्डिंग आणि डॅनिअल यांनी त्यापुढचं पाऊल टाकलं.

सनी डेज

फोटो स्रोत, AMAZON.IN

त्यांनी बाउन्सरांसोबतच बीमर टाकायला सुरुवात केली. अशी अति वेगवान गोलंदाजी प्राणघातक ठरू शकते.

बीमर पद्धतीने चेंडू फेकल्यानंतर तो चुकून आपल्या हातून निसटल्याचं नाटक दोन्ही गोलंदाज करत होते. पण ते जाणीवपूर्वक हे करत असल्याचं स्पष्ट होतं.

होल्डिंग व डॅनिअल यांनी केवळ त्यांच्या कर्णधाराचाच नव्हे, तर सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचाही उघड पाठिंबा मिळत होता.

गावस्कर 'सनी डेज्' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "जमैकातील प्रेक्षकांना प्रेक्षक म्हणणं चुकीचं होईल. त्यांना 'झुंड' म्हणावं लागेल. होल्डिंग आमच्यावर बाउन्सरांचा मारा करत होते, तेव्हा स्टँडमधून आरोळ्या उठत होत्या- 'किल हिम मान! हिट हिम मॅन! नॉक हिज हेड ऑफ माइक!' प्रेक्षक इतके पक्षपाती होते की आम्ही मारलेल्या फटक्यांवर तिथे एकही टाळी वाजली नाही. एकदा मी डॅनिअलच्या चेंडूवर चौकार लगावला, तेव्हा सरळ लोकांना टाळी वाजवायचं आवाहन केलं. यावर मला तुच्छतेने हसल्याचे आवाज तेवढे ऐकू आले."

सर्व फिल्डर विकेटच्या मागे

नंतर अंशुमन गायकवाड यांनी त्या सामन्याविषयी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं, "खेळपट्टी इतकी टणक होती की आमच्या बुटांचे स्पाइक्स त्यात धड रुतत नव्हते. वेस्ट इंडीजचे गोलंदाज सातत्याने शॉर्ट पीचवर गोलंदाजी करत होते. पण तरीही त्यांना आम्हाला बाद करण्यात यश मिळत नव्हतं. त्यांनी विकेटच्या समोर एकही फिल्डर ठेवला नव्हता."

सबीना पार्क मैदान

फोटो स्रोत, Getty Images

"डॅनिअल गोलंदाजी करायला आला तेव्हा लॉयडने स्लीपमध्ये चार जण, गलीत दोन जण, डीप फाइन लेगमध्ये एक जण आणि एक जण पॉइंटमध्ये अशी फिल्डिंग लावली होती. होल्डिंगसारखाच डॅनिअलसुद्धा जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये एक बीमर फेकत होता. शिवाय, धक्कातंत्र म्हणून मधेच यॉर्करसुद्धा टाकत होता."

"प्रत्येक ओव्हरमध्ये तीन ते चार बाउन्सर टाकण्यात येत असल्यामुळे शेवटी गावस्कर इतके त्रस्त झाले की त्यांनी ड्रिंक्सच्या ब्रेकवेळी अम्पायरकडे तक्रार केली. यावर अम्पायर हसत म्हणाले, 'तुम्हाला बहुतेक अशा प्रकारच्या गोलंदाजीची सवय नाहीये.' हे ऐकल्यावर गावस्करला राग आला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केल्यावर तो म्हणाला, 'मला माझ्या मुलाला भेटायचं आहे, मरायचं नाहीये.'"

पहिल्या जोडीची शतकी भागीदारी

उसळी घेणारा चेंडू खेळायला गावस्कर यांची हरकत नव्हती, एका ओव्हरमध्ये अर्ध्याहून अधिक बाउन्सर टाकले जात असतील तर मात्र त्यावर काही उपायच चालणं शक्य नव्हतं.

गावस्करांनी 13 ऑगस्ट 1995 रोजीच्या 'स्पोर्ट्स्टार'च्या अंकात लिहिलं होतं, "होल्डिंगच्या एका चेंडूने माझ्या डाव्या हाताचं बोट बॅटच्या मुठीपाशी चिरडलं. त्यानंतर त्या हाताने बॅट पकडणं अवघड झालं. शॉर्ट पीचवरून येणारे चेंडू खेळताना माझा खालचा हात बॅटवरून निसटायला लागला, कारण मला बॅट घट्ट पकडता येत नव्हती."

सुनीव गावस्कर

फोटो स्रोत, Getty Images

तरीही गावस्कर टिकून राहिले. होल्डरचा चेंडू फटकावून त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं. थोड्या वेळाने होल्डिंगच्या यॉर्कवर गावस्कर बाद झाले. त्यांच्या बॅटला लागूनच चेंडू स्टम्पवर आदळला आणि 136 धावा झालेल्या असताना भारताची पहिली विकेट पडली. पहिल्या दिवशी केवळ 67 ओव्हर टाकल्या गेल्या आणि दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक विकेट गमावून 178 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजमधील वर्तमानपत्रांचे मथळे 'भारताची निराशाजनक फलंदाजी' कशी झाली ते सांगणारे होते.

गायकवाड यांच्या कानामागे चेंडू लागला

दुसऱ्या दिवशी भारताच्या धावा 199पर्यंत पोचल्या तेव्हा लॉइड यांनी नवीन चेंडू घेतला.

त्या वेळी होल्डिंग यांनी एक चेंडू इतका वेगाने फेकला की मोहिंदर यांना त्यांचा चेहरा वाचवण्यासाठी अगदी तोंडासमोरून बॅटने चेंडू अडवावा लागला. यात त्यांच्या बॅटला लागून चेंडू सहजपणे ज्युलिअनच्या हातात विसावला आणि मोहिंदर बाद झाले.

नवीन फलंदाज विश्वनाथ यांच्या स्वागतासाठीही उसळणारे चेंडू फेकले जात होते. सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. पण गायवाकड यांचं नशीब मात्र इतकं बलवत्तर नव्हतं.

नो होल्डिंग बॅक

फोटो स्रोत, AMAZON.IN

होल्डिंग यांनी त्यांना इतक्या वेगाने बाउन्सर टाकला की तो त्यांच्या कानाच्या मागे लागला आणि त्यांचा चष्मा उडून खाली पडला. गायकवाडसुद्धा खाली पडले. त्यांच्या कानातून रक्त यायला लागलं.

या प्रसंगाने सबिना पार्कमधील प्रेक्षक अस्वस्थ झाले नाहीत, तर उत्साहाने उड्या मारायला लागले आणि टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करू लागले. गायकवाड पॅव्हेलियनमध्ये पोचले, तेव्हा कोणीही त्यांना रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हतं.

बऱ्याच वेळाने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्यांच्या सोबत संघाचे व्यवस्थापक पॉली उम्रीगर होते.

कालांतराने उम्रीगर यांनी लिहिलं, "मी मैदानात येण्यासाठी कारमध्ये बसत होतो इतक्यात मला फोन आला आणि तिथेच थांबायला सांगण्यात आलं. आणखी एक खेळाडू रुग्णालयाकडे येत असल्याचं मला कळलं. सुरुवातीला विश्वनाथ रुग्णालयात आलं, त्यापाठोपाठ ब्रजेश पटेलसुद्धा आले. त्या सामन्यातील गोलंदाजी अर्थातच भयंकर पातळीवर सुरू होती, त्यातून 46 व्या नियमाचं उल्लंघन होत असूनही पंचांनी ते थांबवण्यासाठी काही पाऊल उचललं नाही.'

विश्वनाथ आणि पटेल जखमी

वेगवान बॉल आणि बॅटची मूठ यांच्या मधे चिरडल्यामुळे विश्वनाथ यांचं मधलं बोट मोडलं.

त्यांच्या बॅटला चाटून बॉल स्लीपच्या दिशेने गेला आणि तिथे ते झेलबाद झाले.

दुसरा एक उसळता चेंडू ब्रजेश पटेल यांच्या चेहऱ्याला लागला आणि त्यांच्या ओठांवर तीन टाके घालावे लागले. बऱ्याच कष्टाने वाढवलेली मिशी त्यांना काढून टाकावी लागली.

भारताने सहा खेळाडू बाद 306 धावा केल्या, तेव्हा बेदींनी डाव घोषित केला.

बिशनसिंह बेदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिशनसिंह बेदी

कालांतराने लॉईड म्हणाले, "त्या खेळपट्टीवर एका ठिकाणी बॉल पडल्यावर भयंकर उसळी घेत होता. त्यात गोलंदांजीची काही चूक नव्हती. याच खेळपट्टीवर धावासुद्धा निघाल्या."

वेंगसरकर-गावस्कर यांनी दुसऱ्या डावाची सुरुवात केली

वेस्ट इंडीजचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा रॉय फ्रेडरिक्स यांच्या पॅडवर बॉल लागूनसुद्धा अम्पायर गोन्साई यांनी त्यांना बाद केलं नाही.

वेस्ट इंडीजच्या संघाने 391 धावा केल्या. अशा रितीने त्यांना पहिल्या डावात 85 धावांची बढत मिळाली.

चंद्रशेखर यांनी तुटलेल्या अंगठ्याने गोलंदाजी करताना पाच खेळाडू बाद केले.

स्वतःच टाकलेल्या बॉलवर लॉयड यांचा झेल घेण्याच्या प्रयत्नात चंद्रशेखर यांच्या डाव्या हाताचा अंगठा मोडला.

बिशन बेदी यांनीसुद्धा जखम झालेल्या बोटाची फिकीर न करता गोलंदाजी करत दोन खेळाडू बाद केले. दुसऱ्या डावात गायकवाड यांना फलंदाजीसाठी उतरणं शक्यच नव्हतं. त्यांच्या डाव्या कानाची नस दुखावली होती आणि भारतात परतल्यानंतर अनेक दिवस त्यांना कानामध्ये शिटी वाजवल्यासारखा आवाज ऐकू येत असे.

विश्वनाथ आणि पटेलसुद्धा जखमी झाले होते, त्यामुळे पराभव टाळण्यासाठी उर्वरित भारतीय फलंदाजांना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार होती.

कालांतराने बीबीसीशी बोलताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, "पहिल्या डावामध्ये मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो होतो. दुसऱ्या डावात सुनील गावस्करसोबत सलामीला आलो. मला पहिल्यांदा स्ट्राइकला जाऊ द्यावं, अशी विनंती मी गावस्करला केली. पण सिनियर खेळाडू म्हणून पहिला चेंडू खेळणं हे आपलं कर्तव्य आहे, असं सांगत गावस्करने ही विनंती नाकरली. होल्डिंगने टाकलेला पहिला बॉल गावस्करच्याच नव्हे तर विकेटकिपरच्याही डोक्यावरून निघून गेला, हे आज सांगितलं तर विश्वास बसणार नाही. तो चेंडू सीमापार जाऊन आम्हाला चार धोवा मिळाल्या. मी तो चेंडू खेळायला उभा असतो तर निश्चितपणे तो माझ्या तोंडावर आदळला असता, कारण मी गावस्करपेक्षा बराच उंच आहे."

'97/5'वर बेदी यांनी डाव घोषित केला

सुनील गावस्करांना या डावात केवळ दोन धावा काढता आल्या.

कालांतराने बेदी म्हणाले, "भारताची पहिला खेळाडू पाच धावांवर बाद झाला, तेव्हा वास्तविक चार खेळाडू बाद झालेले होते, कारण गायकवाड, विश्वनाथ आणि ब्रजेश पटेल जखमी होते."

शिवाय, चंद्रशेखर यांच्या दोन्ही बोटांना जखमा झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांना बॅट पकडताही येत नव्हती. त्यामुळे पाच धावा आणि सहा खेळाडू बाद, अशी भारतीय संघाची स्थिती होती.

मायकल होल्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

वेंगसरकर यांनी 21 धावा केल्या.

सर्वाधिक चांगली फलंदाजी मोहिंदर अमरनाथ यांनी केली. त्यांनी सहा षटकारांसह 60 धावा केल्या. होल्डिंग यांनी टाकलेला एक बॉल मदनलाल यांच्या डोक्यावर लागला.

दुसऱ्या बॉलवर ते त्रिफळाचीत झाले. लगेचच वेंकटराघवनसुद्धा बाद झाले. त्या वेळी भारताचा स्कोअर होता 5 बाद 97 धावा.

त्याच दिवशी सुरेंद्र अमरनाथ यांना यांना अपेंडिक्सच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

या कसोटी सामन्यात भारताचे सर्व 17 खेळाडू कधी ना कधी फिल्डिंगसाठी मैदानात उतरून गेले. वेंकटराघवन यांच्यासोबत नाबाद अवस्थेत किरमानीसुद्धा पॅव्हेलियनमध्ये गेले, तेव्हा हा डाव घोषित करण्याचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत अद्भुत प्रसंग ठरला.

आपल्याकडे डाव घोषित करण्याव्यतिरिक्त काही मार्ग नव्हता, असं बेदी यांनी नंतर स्पष्ट केलं. स्वतः बेदी आणि चंद्रशेखर फलंदाजी करण्याच्या अवस्थेत नव्हते. त्या वेळी वेस्ट इंडीजला जिंगण्यासाठी दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करायच्या होत्या. त्यांनी सहजच हे लक्ष्य गाठलं.

मायकल होल्डिंग यांनी जाहीरपणे खेद व्यक्त केला

वेस्ट इंडीजने हा सामना दहा गडी राखून जिंकला आणि तेव्हापासून त्यांनी चार गोलंदाजांसह खेळायची रणनीती पुढेही अंमलात आणायला सुरुवात केली.

मायकल होल्डिंग

फोटो स्रोत, Getty Images

राजन बाला यांनी 'द कव्हर्स आर ऑफ' या पुस्तकात लिहिल्यानुसार, या कसोटी सामन्याबद्दल आपल्याला खेद वाटत असल्याचं मायकल होल्डिंग यांनी त्यांना सांगितलं होतं. मायकल होल्डिंग यांनी 'नो होल्डिंग बॅक' या त्यांच्या आत्मचरित्रातही याबद्दल लिहिलं आहे. ते म्हणतात, "आम्हाला ज्या तऱ्हेने गोलंदाजी करायला सांगण्यात आलं होतं, ते मला कधीच पटलं नव्हतं. पण हा दोन देशांमधील कसोटी सामना होता. माझ्या संघाला आणि कर्णधाराला योग्य वाटेल तसं करणंच मला भाग होतं. नंतर आमचा संघ बळकट स्थितीत आल्यावर आणि लॉयड कर्णधार म्हणून अधिक अनुभवी झाल्यावर आम्हाला अशा प्रकारची रणनीती वापरावी लागली नाही."

गावस्कर 'सनी डेज्'मध्ये लिहितात, "सहज चौकार मारता येतील असे 'हाफ वॉलीज्' चेंडू खेळायला मिळतील, अशी बहुधा भारतीय खेळाडूंची अपेक्षा असावी, असं सामन्यानंतर लॉइडनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. भारतीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजीला सामोरं कसं जायचं ते शिकावं लागेल, असं क्लाइड वॉलकॉट म्हणाले होते. धोकादायक गोलंदाजीविषयीची तक्रार रास्त नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्या याच वॉलकॉट यांनी 1948 साली भारताच्या दौऱ्यावर आल्यावर विकेटकिपर असताना सीमापार गेलेला चेंडू उचलला होता आणि भारतीय खेळाडूंना जिंकण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये अशी खटपट केली होती."

तर अशा रितीने भारताच्या हातात आलेला हा सामना अनिर्णित राहिला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)