डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की भारतात लोकशाही टिकणार नाही - एक्सक्लुझिव्ह मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्फोटक मुलाखत

"इथे (भारतात) लोकशाही काम करणार नाही, कारण इथली समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे."

हा विचार कुणा अराजकवाद्याचा नसून भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

'India's Challenge: Will The Democratic Experiment Succeed?' या विशेष मालिकेत बीबीसीने भारताच्या या नवजात लोकशाहीचा आढावा घेतला. यात डॉ. आंबेडकरांशीही बातचीत करण्यात आली. बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार एडन क्रॉली यांनी ही मुलाखत घेतली होती.

बाबासाहेब आंबेडकर
फोटो कॅप्शन, बाबासाहेब आंबेडकर

भारतीय लोकशाहीचा आत्मा असणारी घटना लिहिण्यात आंबेडकरांचा मोठा वाटा होताच, शिवाय ते नेहरूंच्या हंगामी सरकारमध्ये कायदा मंत्रीही होते. 1951 साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देताना नेहरू सरकारवर उपेक्षित समाजांसाठी पुरेसे प्रयत्न न केल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर 1952 साली स्वतंत्र भारतातल्या पहिल्या लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तर आंबेडकरांच्या 'शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' पक्षाचा दारुण पराभव झाला होता.

संसद प्रांगणात डॉ. आंबेडकर.

फोटो स्रोत, Coffee Table Book/BMC

फोटो कॅप्शन, संसद प्रांगणात डॉ. आंबेडकर.

1953 मध्ये बीबीसीशी बोलताना डॉ. आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते सविस्तर मुलाखतीत ऐकता येईल. या मुलाखतीचं हे शब्दांकन -

'भारतात लोकशाही काम करणार नाही'

प्रश्न: डॉ. आंबेडकर, भारतात लोकशाही काम करेल असं वाटतं का?

नाही, ती फक्त नावापुरती असेल. म्हणजे लोकशाहीचा लवाजमा... पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान, इत्यादी.

प्रश्न: तुम्हाला निवडणुका महत्त्वाच्या वाटतात का?

नाही. त्यातून चांगले लोक तयार होत नसले, तर त्या महत्त्वाच्या नाहीत.

प्रश्न: पण सत्ताबदलाच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या नाहीत का?

पण बदल घडवण्यासाठी मतदान करायचं हा विचार रुजलाय का? लोकांना अजून ती समज आलेली नाही. आपली निवडणूक पद्धती लोकांना उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य देते का? उदाहरणार्थ, काँग्रेसने बैलाला मत द्या असं आवाहन केलं. आता तो बैल कुणाचं प्रतिनिधित्व करतोय याचा लोक विचार करतात का? त्या बैलाच्या चिन्हावर एखादं गाढव उभं आहे की, कोणी सुशिक्षित व्यक्ती उभी आहे हा विचार कोणीच करत नाही.

डॉ. आंबेडकर.

फोटो स्रोत, Coffee Table Book/BMC

फोटो कॅप्शन, डॉ. आंबेडकर.

प्रश्न: मी पक्षपद्धतीवर बोलणार नाही, पण तुम्ही 'नावापुरती' म्हणता तेव्हा तुम्हाला काय अभिप्रेत आहे?

इथे लोकशाही काम करणार नाही, कारण इथली समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे.

प्रश्न: ही व्यवस्था विषमतेवर आधारित आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का?

हो. ही व्यवस्था विषमतेवर आधारित आहे.

प्रश्न: आणि जोवर जातिव्यवस्था...

ही समाजव्यवस्था बदलत नाही... शांततामय मार्गाने व्यवस्था बदलायला वेळ लागेल, हे मलाही मान्य आहे. पण कुणीतरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ना?

इतर नेत्यांसह डॉ. आंबेडकर.

फोटो स्रोत, Coffee Table Book/BMC

फोटो कॅप्शन, इतर नेत्यांसह डॉ. आंबेडकर.

प्रश्न: तुमचे पंतप्रधान याबद्दल अनेक भाषणं करतात...

ती न संपणारी भाषणं... कार्लाईलने जेव्हा स्पेन्सरला कागदपत्रांचा गठ्ठा दिला तेव्हा तो काय म्हणाला, 'Oh, this endless speaking Ass in Christiandom…' मला भाषणांचा कंटाळा आलाय. आता कृती हवी.

प्रश्न:तुम्हाला कशा प्रकारची कृती अपेक्षित आहे?

एखादी योजना, एखादी संस्था जी ही व्यवस्था बदलू शकेल.

बाबासाहेब आंबेडकर
फोटो कॅप्शन, बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न: याला पर्यायी व्यवस्था काय असू शकते?

एखादी साम्यवादी व्यवस्था याला पर्याय असू शकते.

प्रश्न: त्याचा देशाला फायदा होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? लोकांचं जीवनमान सुधारेल असं वाटतं?

होय, सुधारू शकेल. लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मूलभूत गरजांची जास्त काळजी असते. अमेरिकेत लोकशाही काम करते आहे, तिथे साम्यवाद येईल, असं मला वाटत नाही. याचं कारण प्रत्येक अमेरिकन माणसाचं उत्पन्न खूप जास्त आहे.

प्रश्न: ते इथे करता येईल, असं नाही का वाटत तुम्हाला?

कसं करता येईल? लोकांकडे पुरेशी जमीन नाही, पाऊस पुरेसा नाही, जंगलतोड प्रचंड आहे. करायचं काय? या समस्या जोवर सोडवल्या जात नाहीत... या सरकारला हे प्रश्न सोडवता येतील, असं मला वाटत नाही.

डॉ. आंबेडकर.

फोटो स्रोत, Coffee Table Book/BMC

फोटो कॅप्शन, डॉ. आंबेडकर

प्रश्न: या देशातही?

हो अर्थात, युद्धात तुम्ही कत्तल करता, बरोबर. तुम्हाला त्याचं दुःख नाही. स्वतःच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ते करणं तुम्हाला गरजेचं वाटतं.

प्रश्न: ही व्यवस्था कोसळेल, असं तुम्हाला वाटतं का?

हो, ही व्यवस्था कोसळेल. मी माझ्या लोकांचा विचार करत आहे. ते अत्यंत उतावीळ झाले आहेत. आणि ते समाजातल्या सगळ्यांत खालच्या स्तरात आहेत. जर एखाद्या इमारतीचा पाया कोसळत असेल, तर सगळ्यांत खालचा स्तर आधी कोसळतो.

प्रश्न:'माझ्या लोकांचा' असं म्हणताना तुम्ही अस्पृश्यांबद्दल बोलत आहात ना?

होय.... आणि कम्युनिस्ट काम करत आहेत का? नाही! कारण त्यांचा माझ्यावर भरवसा आहे आणि माझा त्यांच्यावर. ते मला विचारत असतात. मला त्यांना काहीतरी उत्तर द्यायला हवं ना!

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)