उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वाक्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नजर अजित पवारांकडे वळली...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन 25 मार्चला संपलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं असतं. ही परंपरा आहे. पण मुख्यमंत्री बोलतील की नाही, इथपासून शंका अनेकांच्या मनात होती. पण मुख्यमंत्री बोलले.
25 मार्चला दुपारी तीन वाजून गेले होते. सभागृहात अजितदादा अंतिम आठवड्यावरची आमदारांची चर्चा लवकर संपवण्यासाठी घाई करत होते. मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री बोलायचे आहेत. इतर कामकाजही बाकी आहे.
सव्वा तीनच्या सुमारास सभागृहातली आमदारांची संख्या वाढू लागली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सभागृहात येऊन बसले.
3.31 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत आले. लगेच दुसर्या मिनिटाला बोलायला उभे राहिले.
उपाध्यक्ष म्हणाले 'तुम्हाला त्रास होत असेल आणि बसून बोलायचं असेल तर बसून बोला.' त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "नाही ठीक आहे, उभं राहून बोलल्याशिवाय जोर पण येत नाही. पण बसून बोललो तरी जोर गेलाय असं कोणी समजू नये. जितकं शक्य आहे तितकं उभं राहून बोलतो. वाटलं तर बसतो." असं म्हणत भाषणाला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Facebook
मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, मागच्या बाकावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, बाजूला पहील्या रांगेत जयंत पाटील, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील सगळेच महत्वाचे मंत्री भाषण मन लावून ऐकत होते.
विरोधी पक्षाच्या आमदारांमध्येही देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हे सगळे महत्वाचे नेते बसले होते. सभागृहात शांतता होती. आवाज होता तो फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा....
सुधीरभाऊ म्हणाले, 'आपला काय संबंध?'
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या गोंधळाचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात झाली. पुढे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, हिंदुत्व याचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

फोटो स्रोत, Facebook
भ्रष्टाचाराच्या मुद्याला हात घालताना ते म्हणाले, "काही लोकांचं आरशात बघितलं तरी भ्रष्टाचार झाला... भ्रष्टाचार झाला.. म्हणायचे. अरे, कशात झाला भ्रष्टाचार? तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झाला भ्रष्टाचार. पण तो झाला हे बघण्यासाठी तोंड तरी आरशात बघावं लागेल."
या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना हसू आवरलं नाही. एकमेकांकडे बघून आमदार आणि मंत्री हसू लागले. बाकं वाजवून मुख्यमंत्र्यांना दाद देऊ लागले. विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये शांतता होती.
पुढे मद्यावरून सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री बोलू लागले.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला मद्यराष्ट्र म्हणता? महाराष्ट्राची बदनामी करता? कर्नाटक, मध्यप्रदेशात दारूची दुकानं महाराष्ट्रापेक्षा जास्त आहेत. मध्यप्रदेश 5.07 % मद्यविक्रीची दुकानं आहेत. सुधीरभाऊ मग काय मध्यप्रदेशला 'मद्यप्रदेश' म्हणायचं का?"
त्यावर सुधीर मुनगंटीवार खाली बसून म्हणाले, "त्याच्याशी आपला काय संबंध?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
काही आमदार गालातल्या हसत होते. आदित्य ठाकरेसह काही आमदार न चुकता बाकं वाजवून दाद होते, तर काही एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. अजितदादा मात्र मास्क लावून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे नजर टाकत भाषण ऐकत होते.
आणि फडणवीसांची नजर अजितदादांकडे सरकली
"अनिल देशमुख जेलमध्ये जाणार... गेले जेलमध्ये. नवाब मलिक जेलमध्ये जाणार, गेले जेलमध्ये...आता काय तर अनिल परब जेलमध्ये जाणार..." या वाक्याला अनिल परब यांचा चेहरा पडला. त्यांच्या चेहर्यावर अस्वस्थता दिसत होती.
"तुमचा सकाळचा कार्यक्रम यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक बसले असते ना सत्तेत तुमच्या मांडीला मांडी लावून.... " सकाळच्या शपथविधीचा विषय निघाला अन् फडणवीसांची नजर मुख्यमंत्र्यांवरून थोडी बाजूला सरकत अजित दादांकडे गेली. अजितदादा मात्र समोरच्या फाईलमध्ये पाहत होते.
"सत्तेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करता, तुम्हाला सत्ता पाहिजे ना... मी येतो तुमच्यासोबत..." उद्धव ठाकरेंनी हे वाक्य उच्चारताच सगळे आमदार श्वास रोखल्यासारखे त्यांच्याकडे बघू लागले. भाजपचे आमदार स्तब्ध झाले. पहिल्या रांगेतल्या काही मंत्र्यांच्या माना मुख्यमंत्र्यांकडे वळल्या.

फोटो स्रोत, Getty Images
ठाकरेंनी 'त्या' वाक्यानंतर काही सेकंदांचा 'पॉझ' घेतला होता. त्या काही सेकंदात आता पुढे काय बोलतात? या प्रश्नार्थक चेहर्याने पत्रकार गॅलरीतल्या पत्रकारही कानाला लावलेल्या हेडफोन्सचा आवाज वाढवून पुढचं ऐकू लागले. फडणवीसांची नजर मुख्यमंत्र्यांवर खिळली.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, "मी येतो तुमच्यासोबत... टाका मला तुरुंगात..."
काहींना रोखलेले श्वास सोडले आणि सभागृह पूर्ववत झालं.
हे 'मिसलेनिअस' होतं...
संध्याकाळी 4.21 ला मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं. अधिवेशनातल्या 88 तास 37 मिनिटांच्या कामकाजातला उद्धव ठाकरेंचा एक तास चर्चेचा ठरला होता. ते खाली न बसता थेट सभागृहाबाहेर निघून गेले.
अजितदादा बोलायला उठले. तितक्यात फडणवीस म्हणाले, "दादा आता तुम्ही कशावर बोलणार आहात? तुम्हीही अंतिम आठवड्यावर बोलणार?" त्यावर हसत अजित दादा म्हणाले, "तुमचं याच्यावर (मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर) भागणार असेल तर बसतो खाली...!"
मग पुन्हा एकदा फडणवीस उठले आणि म्हणाले, "हे जे काही होतं ते 'मिसलेनिअस' (miscellaneous) होतं. दादा तुम्ही सर्व मुद्यांवर अंतिम आठवड्याला उत्तर द्या."

फोटो स्रोत, Facebook
अजितदादा बोलायला उठले. एरव्ही गंभीर चेहर्याने सभागृहात बसलले अजितदादा हसत खेळत अंतिम आठवड्याला उत्तर देऊ लागले. सुरुवात कवितेने केली. त्यावर हसत हसत फडणवीस म्हणाले, "आमच्यामुळे दादा कविता म्हणायला लागले याचं तरी 'क्रेडिट' आम्हाला द्या."
अजितदादांच्या कविता आणि भाषणातल्या फटकेबाजीने फडणवीसांचा गंभीर झालेला चेहरा खुलला होता. सुधीरभाऊ, गिरीश महाजनांना मारत असलेल्या टोमण्यांवर फडणवीस हसत होते.
भाषणं संपली. मुख्यमंत्री पुन्हा सभागृहात आले. विधानसभेची बैठक स्थगित करण्यात आली. राष्ट्रगीत पार पडलं.
त्यानंतर निघताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार सगळे एकमेकांशी बोलू लागले. विचारपूस करू लागले. काही विनोदांवर एकत्र हसू लागले.
ते चित्र बघून, 'राजकारणातलं हे खरं शाश्वत सत्य आहे. कितीही टीका केली काहीही झालं तरी पडद्यामागून हे सगळे एक आहेत.' ही चर्चा करत पत्रकार गॅलरीतून बाहेर पडले.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








