IPL 2022: विराट कोहलीपेक्षा जास्त कमाई करणारे खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Andy Kearns
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा पंधरावा हंगाम शनिवारी (25 मार्च) सुरू झाला. आयपीएल स्पर्धा म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणे चर्चेत असतात. यंदाच्या हंगामात कोणते खेळाडू सर्वाधिक रक्कम मिळणार ते पाहूया.
1. के.एल.राहुल-17 कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
नेतृत्व, यष्टीरक्षण आणि सलामी अशा तिन्ही भूमिका सांभाळणारा के.एल.राहुल भारतीय क्रिकेटमधला 'हॉट प्रॉपर्टी' मानला जातो. भारतीय संघाचं नेतृत्वही त्याने केलं आहे. राहुलने 2020मध्ये 'ऑरेंज कॅप' पटकावली होती.
राहुलने आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व सांभाळलं आहे. म्हणूनच नवा संघ लखनऊ सुपरजायंट्स संघ व्यवस्थापनाने राहुलकडे कर्णधारपद सोपवलं. यंदाच्या हंगामात राहुल तब्बल 17 कोटी रुपयांची कमाई करणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली तसंच सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यापेक्षाही राहुलचं मानधन जास्त असणार आहे.
2. रोहित शर्मा-16 कोटी (मुंबई इंडियन्स)
मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्याने रोहित शर्माने तब्बल पाचवेळा संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएल स्पर्धेत सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितला मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलं.

फोटो स्रोत, Robert Cianflone
भारतीय संघाचा टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात तो कर्णधार आहे. फलंदाज म्हणून आयपीएल स्पर्धेत रोहितची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने रोहितसाठी 16 कोटी रुपये खर्च केले आहेत.
3. रवींद्र जडेजा-16 कोटी (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नईने पहिल्या लढतीआधी काही तास आधी यंदाच्या हंगामासाठी रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. चेन्नई संघाचा प्रमुख फिरकीपटू, अव्वल फिनिशर आणि अफलातून क्षेत्ररक्षक अशी जडेजाची ओळख आहे.

फोटो स्रोत, Robert Cianflone
गेल्या काही वर्षात जडेजाने फलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. महेंद्रसिंग धोनी चाळिशीत आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून धोनीचा वारसा पुढे चालवण्याची धुरा जडेजाकडे देण्यात आली आहे.
4. ऋषभ पंत-16 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
दिल्ली कॅपिटल्स संघाने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवलं. श्रेयस फिट झाल्यानंतरही पंतकडेच कर्णधारपद ठेवण्यात आलं. पंत, दिल्लीच्या भविष्यकालीन योजनांचा भाग आहे.

फोटो स्रोत, The India Today Group
तडाखेबंद फलंदाजी, उत्तम यष्टीरक्षण करणाऱ्या ऋषभचं वय लहान आहे पण त्याच्या नेतृत्वगुणांवर प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांना विश्वास वाटतो.
5. इशान किशन- 15.25 कोटी (मुंबई इंडियन्स)
यंदाच्या लिलावात सर्वाधिक रकमेची बोली इशान किशनसाठी लागली. मुंबईला इशानला पुन्हा ताफ्यात समाविष्ट करायचं होतं. त्यासाठी त्यांनी प्रचंड रक्कम खर्च केली.

फोटो स्रोत, Robert Cianflone
आक्रमक फलंदाज आणि दर्जेदार यष्टीरक्षक अशा दोन्ही आघाड्या सांभाळत असल्याने इशानकडून मुंबईला खूप अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक संघात नसल्याने इशानवरची जबाबदारी वाढली आहे. ं
6. विराट कोहली-15 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
संघाला चांगले खेळाडू घेता यावेत यासाठी विराट कोहलीने स्वत:च्या मानधनात कपात केली. आयपीएलमध्ये दरवर्षी धावांच्या राशी ओतणाऱ्या विराटने बंगळुरू संघाचं नेतृत्व सोडलं आहे.
निव्वळ फलंदाज म्हणून खेळणार असलेला कोहली प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट अव्वल स्थानी आहे.
7. रशीद खान-15 कोटी (गुजरात टायटन्स)
जगभरातल्या ट्वेन्टी20 स्पर्धांमध्ये आपल्या फिरकीने छाप उमटवणारा रशीद खान आता सनरायझर्स हैदराबादऐवजी गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. या नव्या संघाने रशीदच्या फिरकीवर विश्वास ठेवत त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये खर्च केले आहेत. धावा रोखणं आणि विकेट्स काढणं या दोन्ही आघाड्यांवर रशीद खानने स्वत:ला सिद्ध केलं आहे. रशीद उपयुक्त फलंदाजीही करतो आणि त्याच्याकडे नेतृत्वाचाही अनुभव आहे.
8. हार्दिक पंड्या-15 कोटी (मुंबई इंडियन्स)
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सऐवजी गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. हार्दिक या नव्या संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतीमुळे हार्दिक गोलंदाजी करणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. संघाची मोट बांधण्याची अवघड जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर आहे.
9. दीपक चहर- 14 कोटी (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नईने पहिल्यांदाच लिलावात एखाद्या खेळाडूसाठी 10 कोटींपेक्षा जास्त बोली लावली. पॉवरप्ले आणि हाणामारीच्या षटकात गोलंदाजी, फलंदाजीत चांगल्या खेळी करण्याची हातोटी आणि उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे चेन्नईला दीपक संघात हवाच होता. तब्बल 14 कोटी रुपये खर्चून चेन्नईला दीपकला ताफ्यात पुन्हा समाविष्ट केलं पण दुखापतीमुळे निम्मा हंगाम तरी खेळू शकणार नसल्याने चिंता वाढली आहे.
10. संजू सॅमसन-14 कोटी (राजस्थान रॉयल्स)
स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध आणि सक्षम यष्टीरक्षक यामुळे संजू सॅमसनकडे राजस्थानने नेतृत्वाची धुरा सोपवली. यासाठी त्यांनी 14 कोटी रुपये खर्चून संजूला रिटेन केलं. अनेक वर्ष आयपीएल स्पर्धेचा भाग असलेल्या संजूकडे यंदाच्या हंगामात दर्जेदार संघ आहे. त्यामुळे राजस्थानचं नशीब बदलण्याची संधी संजूकडे आहे.
11. केन विल्यमसन- 14 कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
हैदराबादने संघात घाऊक बदल केले पण नेतृत्व मात्र केनकडेच ठेवलं. सार्वकालीन फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या केनसाठी हैदराबादने मोठी तिजोरी रिती केली आहे. नव्या खेळाडूंना हाताशी घेऊन खेळण्याचं आव्हान केनकडे आहे.
12. श्रेयस अय्यर- 12.25 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
कर्णधाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कोलकाताला श्रेयस अय्यरच्या रुपात नवा नेता मिळाला आहे. लिलावात अन्य संघांनाही कर्णधार हवा असल्याने श्रेयसचं नाव येताच झुंबड उडाली. पण कोलकाता श्रेयसला घेण्यावर ठाम होतं. श्रेयस आयपीएलमध्ये दिल्लीसाठी खेळला आहे. कोलकाता संघांचा चेहरामोहराही बदलला आहे.
13. महेंद्रसिंग धोनी-12 कोटी (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएल स्पर्धेचा चेहरा म्हणून प्रसिद्ध चेन्नईचा थाला अर्थात महेंद्रसिंग धोनीने स्वत:च्या मानधनात घट केली जेणेकरून संघाला लिलावात चांगले खेळाडू घेता यावेत. चाळिशीत असलेल्या धोनीने चेन्नईचं नेतृत्व सोडलं आहे. फिनिशर धोनी यंदाच्या स्पर्धेत दिसू शकतो. यंदाच्या हंगामातील पहिल्याच लढतीत धोनीने अर्धशतकी खेळी केली होती.
14. मयांक अगरवाल- 12 कोटी (पंजाब किंग्ज)
12 कोटी- आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
12 कोटी- जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
11 कोटी-ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
10.75 कोटी-हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
10.75 कोटी-शार्दूल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स)
10 कोटी-जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
10 कोटी- प्रसिध कृष्णा (राजस्थान रॉयल्स)
10 कोटी- अवेश खान (लखनऊ सुपरजायंट्स)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








