प्रताप सरनाईकांची 11.35 कोटी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

उद्धव ठकारे

फोटो स्रोत, Twitter

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यांच्याशी संबंधित ईडीने 2 फ्लॅट आणि एक जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 3254 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलंय.

NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक काय म्हणाले?

या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी त्यांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता जप्तीची नोटीस दिल्याचं मान्य केलंय.

"ईडीनं माझं ठाण्यातील राहातं हिरानंदनी इथलं घर आणि मिरा रोड मधील 250 मीटरची एक जमीन जप्त केल्याची नोटीस मला ईडीनं पाठवली आहे. ही नोटीस आल्यावर मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कारवाईच्याविरोधात मी 30 दिवसांच्या आत कोर्टात अपील करेन आणि कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. केंद्र आणि राज्याच्या संघर्षातून माझ्यावर कारवाई होत आहे. माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे," असं सरनाईक यांनी म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी काही ठिकाणी गनिमी कावा आणि काही ठिकाणी तह केला होता, असं सूचक वक्तव्यसुद्धा सरनाईक यांनी यावेळी केलं आहे.

तसंच उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख आहेत ते मार्गदर्शन करतात, त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या आहेत, आमच्या पाठीशी मुख्यमंत्री आहेत, असंसुद्धा ते म्हणालेत.

शिवसेना प्रवक्ता असल्याने अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता त्यामुऴे कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज्य सरकारने क्लिन चिट द्यावी - प्रताप सरनाईक

एमएमआरडीए घोटाळा प्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गृह मंत्रालयाला आरोप सादर करावा आणि खरंच घोटाळा झाला किंवा नाही हे अहवालावरून स्पष्ट करावं अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली होती.

"मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळं हे आरोप अप्रत्यक्षपणे राज्यसरकारवर आरोप आहेत. त्यामुळं या प्रकरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून घ्यावी," अशी मागणी सरनाईक यांनी केली होती.

"घोटाळा झाला नाही, असं जर समोर आलं असेल तर अहवाल लोकांसमोर सादर करून क्लीनचीट द्या अन्यथा दोषी असेल तर कारवाई करा," असं सरनाईक म्हणाले होते.

उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत - प्रताप सरनाईक

अडचणीच्या काळात पक्षप्रमुख पाठिशी उभे राहिले नाहीत, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते.

ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू असताना शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार पाठिशी उभं राहिलं नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होते.

काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राची बरीच चर्चा झाली होती. ते पत्र लिहिण्याचं कारण सांगताना सरनाईक यांनी ही नाराजी मांडली होती.

'नीरव मोदी, मल्ल्यासारखा पळून जाणार नाही'

आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं.

"माझ्या विरोधात कुठंही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. कुणीही माझ्यावर कोणताही आरोप केलेला नाही, कुणीही तक्रारदेखील दिलेली नाही," असं प्रताप सरनाईक म्हणाले होते.

व्हीडिओ कॅप्शन, प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील विधानावरुन का केलं घुमजाव?

"एमएमआरडीए प्रकरणी माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. पण या प्रकरणी एमएमआरडीएनंही आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीसमोर जबाब दिला आहे," असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. "देश किंवा महाराष्ट्र सोडून पळून जायला मी काही नीरव मोदी नाही, मेहूल चोक्सी नाही किंवा विजय मल्ल्यादेखील नाही," असं सरनाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)