भगतसिंह कोश्यारींना उद्धव ठाकरे सरकार हटवू शकतं का?

भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडचे शरद पवार आहेत का?

फोटो स्रोत, TWITTER/ @BSKoshyari

फोटो कॅप्शन, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने परत बोलावावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गरज वाटल्यास कोश्यारी यांच्याविरोधात विधिमंडळात प्रस्ताव ठेऊन त्यांना काढता येईल का, याबाबतही विचार केला जाईल, असं पटोले यांनी म्हणाले.

गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाषण करतानादेखील कोश्यारींवरून गदारोळ झाल्यामुळे त्यांना आपलं भाषण अर्धवट सोडून सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांची महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची क्लिप आता व्हायरल होत आहे.

यावरून काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते, तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असतं? असं वादग्रस्त विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला आहे. हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, त्यांनी आपलं विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी," अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणार्‍या कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावं, अशी मागणी करतानाच, शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजप नेते गप्प कसे? असा सवालही त्यांनी केला.

कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपाल पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावं, अशी मागणी पटोले यांनी केली.

समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता सारवासारव केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपलं विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होतं. आता त्यासंबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचं आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारींनी वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचं लग्न झाले तेव्हा ते 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा मुलगी काय करतात. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यांरीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"महात्मा फुले व सावित्रीबाई लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? हा प्रश्न आहे.

"उत्तर - ज्योतिबांना अभ्यास करताना पाहून सावित्रीबाईंनी मला शिकवा असं सांगितलं. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ देशात रोवली. केवळ 8 वर्षांच्या संवादातून 17 वर्षांच्या सावित्रीबाईंनी पहिली कन्या शाळा काढली."

असे सावंत यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना परत पाठवता येतं का?

राज्यपालांच्या विरोधात ठराव आणण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, राज्यपालांना परत पाठवण्याचे अधिकार सरकारला असतात का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, @bsKoshyari

फोटो कॅप्शन, भगतसिंह कोश्यारी

याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट सांगतात, "राज्यपालांना परत पाठवण्याचा किंवा त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना आहे, राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही.

"राजकीय पक्ष किंवा सरकारला ठराव करायचा असेल तर, त्यांना ठराव करता येईल. ठराव करणं हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. पण राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात. त्यांनाच त्यांना पदावरून पायऊतार करण्याचे अधिकार असतात," असं बापट यांनी सांगितलं.

"74 व्या कलमांतर्गत राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कारभार करत असतात. त्यामुळं राज्यपालांना नेमणं आणि राज्यपालांना काढणं हे दोन्ही राष्ट्रपतींच्या हातात असतं. त्यामुळे इतर कोणी कितीही ठराव केला तरी त्याला अर्थ नसतो."

राष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया असते का? असा प्रश्नदेखील बीबीसीनं उल्हास बापट यांना केला.

"साध्या पोलिस कॉन्सटेबल किंवा पोस्टमनला काढण्यासाठी प्रक्रिया आहे, पण राज्यपालांना हटवायचं असेल, तर फोन करूनही हटवता येतं," असं उत्तर बापट यांनी दिलं.

भाषण अर्धवटच सोडावं लागलं

गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, राज्यपाल बोलायला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली.

जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुवातीला दिल्या गेल्या. नंतर गोंधळ, घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच आपलं भाषण सुरू ठेवण्याचा राज्यपालांनी प्रयत्न केला. मात्र, नंतर ते निघून गेले. अभिभाषणाची प्रत त्यांनी पटलावर ठेवली.

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण बंद करण्यात आलं. काही वेळानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. थोडावेळाच्या कामकाजानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)