ज्ञानवापी मशिदीचा वाद असलेल्या वाराणसीत शिवलिंग बनवणारी मुस्लीम महिला

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, वाराणसीहून
"ना हिंदू ना मुसलमान... कोणी वेगळे नाहीत, आपण सगळे एक आहोत. आम्ही अल्लाला मानतो तुम्ही देवाला मानता. आपले फक्त शब्द बदलले आहेत, आपण सगळे मानतो एकालाच."
वाराणसी शहराच्या बाहेरच्या भागात, सारनाथ रस्त्यावरचा एक मुस्लीम मोहल्ला. तिथेच आम्हाला भेटल्या आलम आरा उर्फ नंदिनी आणि त्यांचेच हे शब्द.
वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीवरून सध्या कोर्टात खटला सुरू आहे. हिंदू-मुस्लीम पक्षकारांचे वेगवेगळे दावे आहेत. पण याच वाराणसीतल्या मुस्लीम महिला हिंदू-मुस्लीम सलोख्याचा आर्दश ठरल्या आहेत.
मुस्लीम असूनही त्यांचं एक नाव नंदिनी आहे. बरेच जण त्यांना आता याच नावाने ओळखतात.
"नंदिनी...नंदिनी या नावाची इतकी सवय झालीये की मला कधी कधी माझं स्वतःचं खरं नाव विसरायला होतं," त्या हसतात.
आलम आरा गेल्या वीस वर्षांपासून पाऱ्याची शिवलिंग बनवतात. त्यात त्यांचा हातखंडा आहे म्हणा ना. फक्त शिवलिंगच नाही तर अनेक हिंदू देवी-देवतांच्या पाऱ्याच्या मुर्ती त्या बनवतात.
त्या मुर्ती बनवून होलसेलमध्ये व्यापाऱ्यांना विकतात आणि ते व्यापारी काशी विश्वनाथ मंदिराच्या आसपासच्या दुकानांमध्ये या मुर्ती भाविकांना आणि पर्यटकांना विकतात.
"याच व्यापाऱ्यांनी मला नंदिनी हे नाव गिफ्ट दिलंय," आलम म्हणतात. "जेव्हापासून मी हे काम करायला लागले तेव्हापासून नंदिनी म्हणून ओळखली जाते. व्यापारी म्हणाले आम्ही तुम्हाला याच नावाने हाक मारणार. मी म्हटलं काही हरकत नाही. शेवटी कामाशी निष्ठा महत्त्वाची."

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
आलम आरांचे पती अतहर शेख हे काम करायचे. त्यांना जडीबुटी शोधून आणणं, त्यांची युनानी औषधं बनवणं असे छंद होते. ते स्वतः पाऱ्यापासून वेगवेगळ्या मुर्ती बनवायचे.
पण 21 वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
"माझ्या पदरात पाच मुलं होती. चार मुली, एक मुलगा. सगळी लहान लहान होती. घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला यातलं काहीच येत नव्हतं, कुणी शिकवणारं नव्हतं. पण घर तर चालवायचं होतं, शेवटी एक दिवस मी शेगडी पेटवली आणि धातू वितळवायला घेतला. त्यानंतर आजतागायत मी हे काम करतेय," उतरत्या संध्याकाळी आपल्या तीन खणी घरात त्या जुन्या दिवसांची आठवण सांगत असतात.
"वरती बेलाचं एक मोठं झाडं आहे, आता अंधारात तुम्हाला दिसणार नाही. महादेव शंकरांना बेल आवडतो ना, म्हणून मीही बेल लावलाय गच्चीत. मोठं झालंय ते झाडं आता," वरच्या दिशेला हात करत त्या उत्तरतात.
आम्ही गेलो तेव्हा त्या नुकत्याच थकून घरी आल्या होत्या. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. मुर्ती साच्यातून काढायच्या, घासून गुळगुळीत करायच्या, पॉलिश करायच्या, वरून त्याला चंदेरी कागद लावायचा अशी अनेक कामं दिवसभरात त्यांच्यापुढे वाढून ठेवलेली असतात. तयार मुर्त्या घेऊन व्यापाऱ्यांकडे जाणं, नव्या मुर्त्यांची ऑर्डर घेऊन येणं या कामात त्यांची संध्याकाळ जाते.

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
हिंदू देवी देवतांच्या मुर्ती बनवणं, शिवलिंग बनवणं या व्यवसायावरच त्यांनी आयुष्यभर आपली गुजराण केली. या बळावरच त्यांनी आपलं घर चालवलं, मुलांचं शिक्षण केलं, मुलींची लग्न लावून दिली, आपलं स्वतःचं तीन खोल्याचं घर बांधलं.
या व्यवसायाचा त्यांना अभिमान आहे. हे काम कधीच सोडवंस वाटलं नाही असं त्या म्हणतात.
"या कामाने मला रोजीरोटी दिली. सन्मानाने जगायची संधी दिली. माझा नवरा गेला तेव्हा पाच मुलं माझ्या पदरात होती. त्यांना मोठं करू शकले ते शिवलिंग बनवल्यामुळेच. कोणी नव्हतं मला. ना माहेरी, ना सासरी. नवरा गेला, दोन तरूण भाऊ होते तेही गेले. या कामामुळे मला कधी कोणापुढे हात पसरायची वेळ आली नाही. मग हिंदू देवी देवतांच्या मुर्ती बनवण्याच्या या कामाबद्दल मनात कधीच वाईट वाटलं नाही. कधीही वाटलं नाही की हे काम सोडवं. आता तर रोजीरोटीपेक्षाही हे काम माझ्यासाठी मोठं बनलंय, साधना बनलंय."

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
मुस्लीम असूनही त्यांना हिंदू देवी देवतांच्या मुर्त्या बनवण्याचं शास्त्र, कोणती मुर्ती कशी बनवयची, कशी नाही याचे सगळे नियम अवगत आहेत. त्यांनी बनवलेल्या दुर्गा, अन्नपूर्णा, नंदी, काली, शिवलिंग अशा मुर्त्या मला दाखवताना त्या हेही आवर्जून सांगतात की 'शनी भगवान की मुर्ती' कधीच पाऱ्यात बनत नाही.
पाऱ्यापासून शिवलिंग बनवण्याचे काय नियम पारद संहितेत दिलेत. पाऱ्याला कसं 'शिवाचं सर्वात शुद्ध रूप' मानतात. पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करणं म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांची पूजा एकत्र करण्यासारखं आहे अशा अनेक गोष्टी त्या मला सांगत असतात.
मुस्लीम असूनही हिंदू देवतांच्या मुर्ती बनवतात म्हणून त्यांना कधी विरोध झाला का, असंही मी त्यांना विचारलं.
"नाही, कधीच नाही, आजवर नाही," त्या उत्तरतात.

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
"अगदी आमच्या एरियातून त्या भागात जायला बंदी असते तेव्हाही पोलिसांनी अडवलं तर मी म्हणते हे पाहा मुर्त्या घेऊन जातेय. ते लगेच सोडतात. कधीच कुठल्या हिंदू व्यक्तीने मला म्हटलं नाही की हे काम का करतेस किंवा माझ्याकडून या मुर्त्या खरेदी करायला नकार दिला नाही."
"माझ्या मुस्लीम समाजाचं, माझ्या नातेवाईकांचं म्हणाल तर ते म्हणतात की तुझ्यासारख्या धीराची बाई पाहिली नाही. अशा आणखी बायका जन्माव्यात. तू जेवढी हिंमत दाखवलीस, पोरांना एकटीने वाढवलंस, असं क्वचितच कोणी बाई करू शकते. चांगलं काम करते आहेस तू, आणि आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे."
सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहे आणि याला धार्मिक रंग दिला जातोय. अनेकदा हिंदू-मुस्लीम समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्यं केली जात आहेत.

फोटो स्रोत, Anagha Pathak/BBC
या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर आलम आरा म्हणतात, "हिंदू मुसलमान कोणी वेगळे नाही. त्यांच्या तेढ निर्माण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जे कुराणमध्ये लिहिलंय, तेच गीतेत. आणि जर तुम्हाला कोणी भडकवत असेल, तर तुम्हीच शांत डोक्याने विचार केला पाहिजे."
आलम आरा हिंदू-मुस्लीम सलोख्याचं, भारतातल्या गंगा-जमनी तहजीबचं एक चालतं बोलतं उदाहरण आहेत असंच म्हणायला हवं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








