शिवसेना : युवासेनेचे नेते राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

फोटो स्रोत, Facebook/Rrahul Narain Kanal
युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर आयकर विभागानं छापा मारला आहे.
राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
राहुल कनाल हे सध्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी असून, मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचेही ते सदस्य आहेत.
'टीम आदित्य'चा चेहरा म्हणून राहुल कनाल यांच्याकडे पाहिलं जातं.
या कारवाईवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल कनालवरील कारवाई चुकीची, हे दिल्लीचं आक्रमण आहे, यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत. महाराष्ट्राच निवडणुका होत आहेत हे समजल्यावर तसेच महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटू लागल्यावर ही करण्यात आली. याआधी उत्तप प्रदेश, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्ये अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांचंही नाव असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी आयकर विभागाने छापे मारले. त्यांच्या सोबत CISF ची टीमही उपस्थित होती.
कोव्हिड काळातला भ्रष्टाचार, शेल कंपन्यांद्वारे केलेली गुंतवणूक यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केल्याचं कळतंय.

फोटो स्रोत, @iYashwantJadhav
15 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे.
काय आहे प्रकरण?
आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवसेना आमदार यामिनी जाधव, त्यांचे पती यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा आयकर विभागाचा आहे.
यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी आहे असे स्पष्ट झाले.
ही कंपनी कोलकात्यात असलेला एंट्री ऑपरेटर उदय महावर हे चालवत होते. उदय महावर यांचे नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही होते. चौकशीत 15 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
यामिनी जाधव 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. महावर यांनी सन 2011-12 मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केल्याचे महावर यांनी चौकशीत सांगितलंय. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली.
2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याडकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यात 2.74 कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यात 1.72 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.
कोण आहेत यशवंत जाधव?
यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. 1997 साली मुंबई महापालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2008 साली बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

फोटो स्रोत, @iYashwantJadhav
2011 मध्ये ते शिवसेनेचे उपनेते झाले. 2017 मध्ये पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2017 साले मुंबई महापालिकेच्या सभागृहात नेतेपदी त्यांची नियुक्ती झाली.
त्यानंतर 2018 मध्ये मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि एप्रिल 2018 पासून स्थायी समिती अध्यक्षपदी काम करत आहेत.
किरीट सोमय्यांनी केला होता आरोप?
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांचा नंबर लागणार असल्याचे विधान किरीट सोमय्या यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांनी काही शिवसेनेच्या नेत्यांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध केली होती.
त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेही नाव होतं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








