Statue Of Equality: भारतातले अतिभव्य पुतळे चीनमध्ये का बनवले जातात?

चीन, भारत, पुतळे

फोटो स्रोत, @KTRTRS

फोटो कॅप्शन, हैदराबाद इथली रामानुजाचार्य यांचा पुतळा चीनमध्ये तयार करण्यात आला.
    • Author, रामकृष्ण वारीकुटी
    • Role, बीबीसी तेलुगू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 11-12 व्या शतकातले महान हिंदू संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं.

या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी' असं नाव दिलं आहे.

216 फूट उंच असलेल्या पुतळ्याचं डिझाईन भले भारतात तयार झालं असेल पण हा पुतळा एका चीनी कंपनीने बनवला आहे. या पुतळ्यात 7 हजार टन पंचधातूंचा वापर केला आहे.

तीन वर्षांपूर्वी गुजरातच्या केवाडियात उभारलेला जगातला सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' बनवण्यातही एका चीनी कंपनीचं योगदान आहे. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा 597 फूट उंच आहे.

सन 2017 मध्ये तेलंगण सरकारने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच काशाचा पुतळा स्थापन करण्याचा नि्र्णय घेतला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री कदियाम श्रीहरी यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा एक शिष्टमंडळ चीनला गेलं होतं.

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडातही डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी चीनमधल्या कंपन्यांशी संपर्क केला होता.

आता प्रश्न असा आहे की भारतात अतिभव्य पुतळे उभे करण्यासाठी चीनची मदत का घ्यावी लागते? भारतात हे पुतळे का बनवता येत नाहीत?

चीनच्या कंपन्या सगळ्यांत पुढे

तज्ज्ञांचं मत आहे की चीनच्या कंपन्या अतिभव्य पुतळे बनवण्यात निष्णात आहेत. काशाचे प्रचंड मोठे पुतळे बनवण्यासाठी त्यांना जगभरात नावाजलं जातं.

चीनच्या कंपन्या धातुच्या ओतकामच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम करून मोठ्या प्रमाणावर पुतळे बनवत आहे. एखादा अतिभव्य पुतळा बनवायचा असेल त्याच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या साचांमध्ये बनवलं जातं.

चीन, भारत, पुतळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेलंगणात बसवण्यात येणारा डॉ. आंबेडकरांचा पुतळा चीनमधून येणार आहे.

चीनमध्ये धातूंच्या ओतकामाचे मोठमोठे कारखाने आहेत त्यामुळे पुतळ्यांचे वेगवेगळे भाग, भले ते कितीही मोठे असो, वेगवेगळ्या साचात ओतकाम करून पटकन बनवता येतात आणि त्यांची डिलीव्हरीही लगेच होते.

तिथल्या कंपन्या फार पुर्वीपासून अतिभव्य पुतळे बनवत आहेत. चीनमध्ये 'स्प्रिंग टेंपल बुद्धा' सारखे विशाल पुतळे याचं उदाहरण आहेत. त्यामुळेच असे पुतळे बनवायचे असतील तर सगळे चीनकडे जातात.

डिझाईन भारतात आणि पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये

रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं डिझाईन भारतातच तयार केलं गेलं पण हा पुतळा घडवण्याचं कंत्राट चीनी कंपनीला दिलं.

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचं डिझाईन प्रसिद्ध मुर्तीकार राम वी सुतार यांनी तयार केलं होतं. त्या पुतळ्याचं मुख्य कंत्राट L&T कंपनीला दिलं होतं आणि या कंपनीने पुतळा घडवण्याचं कंत्राट चिनी कंपनीला दिलं.

चीन, भारत, पुतळे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, केवाडिया इथली स्टॅच्यू ऑफ युनिटी

भारतीय कंपन्यांचे पुतळे घडवताना, त्याचं ओतकाम करताना चीनी कंपन्यांना सतत सुचना द्याव्या लागतात.

त्यामुळे कोणत्याही चिनी कंपनीला जेव्हा एखाद्या अतिभव्य पुतळा घडवण्याचं कंत्राट मिळतं तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथले मूर्तीकार चीनमध्ये पाठवले जातात. या मुर्तीकारांच्या देखरेखीखाली पुतळ्यांचे भाग तयार होतात, ते जोडले जातात.

भारतात बनू शकतात असे भव्य पुतळे?

वेगवेगळ्या धातूंपासून मूर्ती घडवण्याची कला भारतात फार जुनी आहे. इथे सिंधू संस्कृतीच्या काळात बनलेल्या अनेक काशाच्या मुर्ती सापडल्या आहेत.

भारतात देवी-देवतांच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. या मूर्ती परदेशातही निर्यात केल्या जातात. पण या आकाराने फारशा मोठ्या नसतात आणि शक्यतो घरात ठेवल्या जातात.

चीन, भारत, पुतळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांचा पुतळा

तर शेकडो फुट उंच असलेले पुतळे बनवण्यासाठी एक खास तंत्रज्ञान आणि पायभूत संरचनेची आवश्यका असते. राजकुमार वोडेयार हे मूर्तिकार आहेत. त्यांच्यामते भारतात अशा पायभूत संरचना, पुतळ्या आधार देणाऱ्या रचना बनवणाऱ्या मुर्तीकारांची कमतरता आहे.

त्यांनी म्हटलं की इथेही भव्य मूर्ती बनवल्या जाऊ शकतात, पण सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. ऑर्डर देणारे हेही बघतात की भारतातल्या मूर्तिकारांकडे कोट्यवधींच्या योजना सुरू करण्यासाठी आर्थिक स्रोत आहेत की नाही. त्यामुळे लहान लहान फर्म पुढे जाऊ शकत नाहीत.

कसे तयार होतात अतिभव्य पुतळे?

धातुपासून बनलेले अतिभव्य पुतळे एकाच वेळेस साच्यात ओतून तयार करणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांचे वेगवेगळे भाग ओतकामाव्दारे बनवले जातात. जिथे हा पुतळा उभारायचा असतो तिथे हे तुकडे एकत्र जोडून पुतळा पूर्ण केला जातो.

भव्य पुतळ्यांचे वेगवेगळे भाग जरी बनवले तरी त्या भागांचा आकार खूप मोठा असतो.

कोणत्याही पुतळ्याचं डिझाईन आधी तयार केलं जातं. त्यानंतर एक प्रतिकृती तयार केली जाते. या प्रतिकृतीचं 3D स्कॅनिंग आणि कॉप्युटर डिझाईनव्दारे त्याचा आकार मोठा केला जातो.

पायाच्या बोटांपासून डोळ्यातल्या बाहुल्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचं अचूक माप घेतलं जातं आणि त्या मापांनुसार वेगवेगळे अवयव घडवले जातात.

चीनमध्ये हे भाग घडवल्यानंतर ते सगळे भाग भारतात पाठवले जातात आणि शेवटी पुतळ्याचे सगळे भाग जोडले जातात आणि त्यांच्यावर पॉलिश केलं जातं.

कोणत्याही पुतळ्याला किती खर्च येईल ते त्याचा आकार, त्याच्यात वापरलेले धातू, आणि तो उभारण्याचं स्थान किती लांब आहे यावर ठरतं. तेलंगणातल्या संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याला 130 कोटी रुपये खर्च आला.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)