मोहन भागवत म्हणतात, 'तुम्ही मान्य करा अथवा करू नका, भारत हे हिंदू राष्ट्र' #5मोठ्या बातम्या

मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...

1. तुम्ही मान्य करा अथवा करू नका, भारत हे हिंदू राष्ट्र-भागवत

"हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत, हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. देशामध्ये बंधुभाव, विविधतेतील एकता आज सुद्धा टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच येत नाही, तुम्ही मान्य करा अथवा नका मान्य करून पण भारत हिंदू राष्ट्रच आहे", असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.

दैनिक लोकमतने नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या मुद्यावर मोहन भागवत यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. 'दैनिक जागरण'ने यासंदर्भात बातमी केली.

मोहन भागवत

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

"देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. धारण करणारा नियम म्हणजे धर्म आहे. हिंदू हा धर्म नाही, तो सनातन काळापासून चाललेली परंपरा आहे. आचरण केलेली पद्धत आहे. हिंदू हे इझम नाही. सनातन काळापासून सुरू असलेला सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो", असं मोहन भागवत म्हणाले.

2.केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद, सोमवारपासून पूर्ण उपस्थिती

केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झालेली घट आणि ओमिक्रॉन प्रकाराचा कमी धोका लक्षात घेऊन सोमवारपासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात पूर्ण उपस्थिती पूर्ववत केली आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी सांगितले की, कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

विभाग प्रमुख हे सुनिश्चित करतील की कर्मचारी नेहमी मास्क घालतील आणि कोविड नियमांचे पालन करतील. सोमवारपासून कोणताही कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

कार्मिक मंत्रालयाने 3 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, सचिव स्तरावरील 50 टक्के कर्मचाऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने हे करण्यात आले होते.

3.हत्ती घेऊन चिरडायचे कशाला, तुम्ही उडी मारली तरी मी चिरडून जाईन- शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

"हत्ती घेऊन चिरडायचे कशाला, तुम्ही उडी मारली तरी मी चिरडून जाईन", असा प्रतिहल्ला शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर केला आहे.

साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर खरेदी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे यांनी केला होता. याबाबत शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदे घेत उदयनराजेंवर गंभीर आरोप केले आहेत. साताऱ्यातील एमआयडीसीची दैनावस्था ही उदयनराजेंच्या धमक्या आणि खंडण्यांमुळे झाल्याचा गंभीर आरोप केला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले

फोटो स्रोत, FACEBOOK/SAI SAWANT

फोटो कॅप्शन, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले

हत्ती आणून चिरडून टाकेन असे उदयनराजेंनी धमकी दिल्यानंतर याला प्रतिउत्तर देताना आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्ही हत्ती शोधणार, वन विभागाची परवनागी घेणार नंतर चिरडणार. हे करत बसण्यापेक्षा तुम्ही नुसती माझ्या आंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन. मी त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर राहात असल्याचे सांगित हिम्मत असेल, तर या असे खुले आवाहन शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना दिले.

4.नितेश राणेंचा कोठडीतला मुक्काम वाढला

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपचे आमदार नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आणखी एक दिवस कोठडीत मुक्काम वाढला आहे. 'लोकमतन्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

नितेश राणे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, नितेश राणे

रविवारची सुट्टी आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती पण सोमवारी सुट्टी देण्यात आल्याने नितेश राणेंचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे.

5.हजाराव्या वनडेत भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या वनडेत भारताने वेस्ट इंडीजवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. भारतीय संघाचा हा हजारावा वनडे सामना होता. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

क्रिकेट

फोटो स्रोत, Cameron Spencer

फोटो कॅप्शन, युझवेंद्र चहल

नवीन कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेस्ट इंडिजचा डाव 176 धावातच आटोपला. जेसन होल्डरने 57 धावांची खेळी केली. युझवेंद्र चहलने 4 तर वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्माच्या 60 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने 6 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवने नाबाद 34 तर पदार्पणवीर दीपक हुड्डाने नाबाद 26 धावांची खेळी केली. चहलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)