नथुराम गोडसे सिनेमा वाद : शरद पवार म्हणतात, 'सिनेमात भूमिका केल्यानं कुणी गोडसे बनत नाही'

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.

"अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. भूमिकेमुळं ते लगेच गांधीविरोधी ठरत नाहीत," असं शरद पवार म्हणाले.

भाजपकडून याविषयी टीका होत असेल तर भाजपनं ते गांधीवादी कधीपासून झाले हे आधी सांगावं, असंही पवार यावेळी म्हणाले.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अमोल कोल्हे यांची पाठराखण केलीय. जयंत पाटील म्हणाले की, "अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे. तीही 2017 ची आहे, त्यामुळं त्याच दृष्टीनं त्याकडं पाहावं."

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत असलेल्या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हे यांनी केलेली भूमिका कलावंत म्हणून केली असल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली जात आहे.

भूमिका केल्याने गोडसे बनत नाही - पवार

शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत, कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केल्याचं म्हटलं आहे.

"गांधी सिनेमाच्या माध्यमातून महात्मा गांधी जगभरात पोहोचले होते. त्या सिनेमातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका करणारा कलाकार होता. तो नथुराम गोडसे नव्हता," असं पवार म्हणाले.

WHY I KILLED GANDHI

फोटो स्रोत, WHY I KILLED GANDHI

फोटो कॅप्शन, WHY I KILLED GANDHI सिनेमातील एक दृश्यं

एखादा व्यक्ती कलाकार म्हणून भूमिका घेत असेल, तर त्याकडे कलाकार म्हणूनच पाहायला हवं, असंही शरद पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं.

शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भूमिकाही काही लोकांनी केली. पण त्यामुळं औरंगजेबाची भूमिका घेणारा व्यक्ती तसा नसतो, तो कलाकार असतो, असं पवारांनी स्पष्ट केलं.

'भाजप कधी गांधीवादी झाले?'

"अमोल कोल्हेंनी केलेली भूमिका कलावंत म्हणून केली आहे. अमोल कोल्हेंनी ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. पण कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली म्हणून ते गांधीजींचे विरोधक आहेत असं होत नाही," असं पवार म्हणाले.

"गोडसेंचं महत्त्वं वाढवायचं म्हणूनही त्यांनी भूमिका केलेली नाही. तर, कलावंत आणि देशाचा इतिहास याला समोर ठेवून आपण विचार करायला हवा."

शरद पवार

फोटो स्रोत, @PAWARSPEAKS

यावर भाजपने केलेल्या टीकेबाबत बोलताना पवारांनी, भाजप गांधीवादी कधीपासून झाले असा प्रश्न उपस्थित केला. संघ आणि त्यांच्या इतिहासावर मला भाष्य करायचं नाही. पण एकेकाळी गांधीविरोधी भूमिका घेणाऱ्या शक्ती कुठे आहेत, हेही आता पाहायला हवं. नंतर भाजपनं यावर बोलावं, असं ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेली टीका हे त्यांचं मत आहे, त्यांनी ते मांडलं आहे. कलावंत म्हणून कोणत्याही कलावंताचा मी सन्मान करतो, असं शरद पवार म्हणाले.

कोल्हे शाहू, फुले आंबेडकरी विचारांचेच - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही कोल्हे यांची पाठराख केली.

"अमोल कोल्हे राष्ट्रवादीत येण्याआधी 2017 मध्ये त्यांनी ही भूमिका केली होती. त्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जीवनपट घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे.

जयंत पाटील

त्यांनी एक कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे. 2019 मध्ये आम्ही त्यांना पक्षात घेतलं. लोकांनी उत्साह दाखवत त्यांना जिंकवलं. लोकसभेतही त्यांनी चांगलं काम केलं आहे," असं पाटील म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी अनेक विषयांवर शाहू, फुले, आंबेडकरांचेच विचार मांडले आहेत. त्यामुळं कलाकार म्हणून पूर्वी केलेल्या भूमिकेमुळं त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही.

नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा कोणताही चित्रपट येणार असेल, तर जितेंद्र आव्हाड यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकांच्या ज्या भावना व्यक्त होत आहेत, त्या चुकीच्या नाहीत. पण त्यांनी कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे. तीही 2017 ची आहे. तो आता का प्रदर्शित होत आहे, हेही कळत नाही, असं पाटील म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचा यू टर्न

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यू-टर्न घेतला आहे.

आधी सिनेमावर आक्षेप घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी आता म्हटलंय की, "2017 साली अमोल कोल्हेंनी सिनेमा केला आहे. तेव्हा ते आमच्या पक्षात नव्हते. माझं अमोल कोल्हेंशी काहीही वैयक्तिक वैर नाही. जर ते आमच्या पक्षात असताना त्यांनी हा सिनेमा केला असता तर पक्षाने त्याला विरोध केला असता. ते यापुढे काही असं करणारच नाहीत. माझा सिनेमाला विरोध असणारच आहे. पण आता काय टीव्ही फोडायचा का? माझा त्या विचारधारेला विरोध आहे."

2017 मध्ये 45 मिनिटांचं केलेली फिल्म आता का रिलीज होतेय? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)