ओमिक्रॉन कोव्हिड: या माणसाने 8 वेळा घेतली कोरोना लस

आपण कोव्हिड लशीचा 11 वेळा डोस घेतल्याचा दावा ब्रम्हदेव मंडल यांनी केलाय.
फोटो कॅप्शन, आपण कोव्हिड लशीचा 11 वेळा डोस घेतल्याचा दावा ब्रह्मदेव मंडल यांनी केलाय.
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, इंडिया करस्पाँडंट

भारतातल्या एका व्यक्तीने कोव्हिड -19 विरोधी लशीचे गेल्या वर्षभरात किमान 8 डोस घेतल्याचं आरोग्य सेवा अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

आपल्याला 11 वेळा लशीचा डोस देण्यात आल्याचा दावा बिहार राज्यातल्या 65 वर्षांच्या ब्रह्मदेव मंडल यांनी केला आहे.

या लशीमुळे आपल्या सगळ्या वेदना नाहीशा झाल्या आणि आपल्याला 'निरोगी रहायला' मदत झाल्याचं हे निवृत्त पोस्टमन सांगतात.

इतक्या वेळा लस घेण्याचा आपल्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

आपण बाराव्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला रोखण्यात आल्याचं मंडल यांचं म्हणणं आहे.

पण मधेपुरा जिल्ह्यातल्या मंडल यांना मुळात इतक्या वेळ लस कशी टोचून घेता आली, याची आता चौकशी करण्यात येतेय.

"त्यांनी चार ठिकाणांहून आठ वेळा लशीचा डोस घेतल्याचे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत," मधेपुराचे सिव्हिल सर्जन अमरेंद्र प्रताप शाही यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

2020 च्या 16 जानेवारीपासून भारतामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात तयार होणाऱ्या लशींच्या मदतीने लसीकरण सुरू झालं.

यापैकी कोव्हिशील्डच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर ठेवावं लागतं. तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांनी दुसरा डोस घेता येतो.

भारतामध्ये लसीकरण सक्तीचं नाही. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे चालवण्यात येणा 90 हजारांपेक्षा अधिक केंद्रामार्फत कोव्हिड-19 विरोधी लस देण्यात येतेय.

यामध्ये ऑनलाईन नोंदणी न करताही थेट जाऊन लस घेता येणाऱ्या केंद्रांचाही समावेश आहे. इथे जाणाऱ्या व्यक्तीला ओळखपत्र सादर करावं लागतं. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्ससह 10 ओळखपत्रं वापरून नोंदणी करता येते.

या केंद्रावर गोळा करण्यात आलेली माहिती CoWin या केंद्राच्या लसीकरणासाठीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येते.

मंडल यांनी एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने लस घेतली आणि या दोन्ही डोसची पोर्टलवरही नोंदणी झाल्याचं सुरुवातीच्या तपासात आढळलंय.

"असं घडलं याने आम्ही चकित झालोय. ही पोर्टलमधली गफलत दिसतेय. लसीकरण केंद्रावरच्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं का, याचाही शोध आम्ही घेतोय," शाही सांगतात.

भारतात अनेक ठिकाणी दारोदार जाऊनही लस देण्यात येतेय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात अनेक ठिकाणी दारोदार जाऊनही लस देण्यात येतेय.

लसीकरणाची आकडेवारी जर बऱ्या मोठ्या कालावधीनंतर साईटवर अपलोड केली जात असेल तरच असं घडू शकतं अशी एकमेव शक्यता असल्याचं सामाजिक आरोग्यतज्ज्ञ चंद्रकांत लहरिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"पण तरीही मला नवल वाटतं की त्यांनी इतकेवेळा डोस घेतल्याचं इतका दीर्घकाळ उघडकीला आलं नाही," ते सांगतात.

मंडल यांनी आपण कोणत्या तारखेला, किती वाजता, कुठल्या आरोग्य शिबीरात लस घेतली याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी ते डिसेंबर या महिन्यांच्या काळात आपण लशीचे 11 डोस घेतल्याचा त्यांचा दावा आहे.

आपण मधेपुरातल्या विविध शिबिरांना गेल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी 100 किलोमीटरवरच्या दोन शेजारी जिल्ह्यांमध्ये जाऊनही लस घेतल्याचं सांगितलं. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ओळखपत्रांचा वापर नोंदणीसाठी केला.

मंडल हे पोस्टमनची नोकरी करण्याआधी त्यांच्याच गावात भोंदू डॉक्टर म्हणून काम करत होते आणि 'आपल्याला विकारांमधलं थोडंफार समजत असल्याचं' त्यांनी सांगितलं.

बिहारमध्ये 36% सज्ञान लोकसंख्येने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिहारमध्ये 36% सज्ञान लोकसंख्येने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

"लशीचे डोस घेतल्यानंतर माझी अंगदुखी आणि वेदना नाहीशा झाल्या. माझे गुडघे दुखत असल्याने मी काठीच्या आधारे चालायचो. आता मला काठी लागत नाही. मी ठीक आहे."

कोव्हिड 19 साठीची लस घेतल्यावर त्याचे ताप, डोकेदुखी, थकवा आणि अंगदुखी असे दुष्परिणाम सहसा दिसून येतात. अॅलर्जी होऊन रिअॅक्शन येण्याचं प्रमाण दुर्मिळ आहे.

"पहिल्या आणि दुसऱ्या डोस नंतर त्याचे परिणाम दिसतात. या लशींचे अनेक डोस घेणं तसं फारसं अपायकारक ठरू नये. कारण शरीरात अँटीबॉडीज आधीच तयार झालेल्या असतील आणि लस ही अपाय न करणाऱ्या घटकांनी तयार करण्यात आलेली असते," डॉ. लहरिया सांगतात.

भारतातल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येपैकी 65% जणांचं लसीकरण पूर्ण झालंय तर 91% जणांनी लशीचा किमान एक डोस घेतलेला आहे.

बिहारमधल्या लशीकरणाचं प्रमाण कमी आहे. इथल्या सज्ञान जनतेपैकी 36 टक्के जणांचं लसीकरण पूर्ण झालंय तर 49 टक्के जणांनी लशीचा एक डोस घेतलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)