महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाचं लोकल ट्रान्समिशन झालंय?

फोटो स्रोत, ANI
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासाची हिस्ट्री असलेल्या लोकांमध्येच ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून येत होता पण आता देशाबाहेर न गेलेल्या लोकांतही ओमिक्रॉन आढळून आला आहे. डॉक्टरांनी या गोष्टीला लोकल ट्रान्समिशन म्हटलं आहे.
महाराष्ट्रात बुधवारी (29 डिसेंबरला) 85 ओमिक्रॉन व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आलीये. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यातील 38 ओमिक्रॉनग्रस्त रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. कम्युनिटी सर्व्हेक्षणात हे रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे.
महाराष्ट्राचे सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "या रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला नव्हता. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग लोकल कम्युनिटीत असल्याचं दिसतंय."
आत्तापर्यंत परदेशातून येणाऱ्या आणि त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांमध्ये ओमिक्रॉनचं संक्रमण दिसून आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "कोरोना रुग्णांची वाढती संख्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते."
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधित रुग्ण
भारतात दिवसेंदिवस ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित लोकांची संख्या वाढू लागलीये. सद्यस्थितीत देशात 781 रुग्ण ओमिक्रॉनबाधित आढळून आलेत.
यापैकी 252 ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
- मुंबई -137
- पिंपरी-चिंचवड - 25
- पुणे ग्रामीण -18
- पुणे शहर- 11
- ठाणे - 8
- नवी मुंबई, कल्याण आणि पनवेल - 8
- नागपूर - 6
- सातारा आणि उस्मानाबाद - 5
- वसई-विरार - 3
बुधवारी (29 डिसेंबर) राज्यात 84 रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने ग्रस्त आढळले. यातील 44 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता.
ओमिक्रॉनचं लोकल ट्रान्समिशन झालं आहे का?
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांपैकी 38 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
डॉ. आवटे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ओमिक्रॉनबाधित हे रुग्ण कम्युनिटी सर्व्हेक्षणात हे संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे."
कम्युनिटी सर्व्हेक्षणात मुंबईत ओमिक्रॉनची बाधा झालेले 19, कल्याण-डोंबिवली 5, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 3 रुग्ण सापडले आहेत.
तर वसई-विरार आणि पुण्यात 2 रुग्ण आढळले आहेत. ठाणे, पुणे ग्रामीण, भिवंडी आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय.
राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांना आम्ही ओमिक्रॉनचं लोकल ट्रान्समिशन झालंय का? याबाबत विचारलं. ते म्हणाले, "या रुग्णांची कोणतीही प्रवासाची हिस्ट्री नसल्याने, हा व्हेरियंट कम्युनिटीत आहे असं दिसतंय."
आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात, हे नमुने रॅन्डम घेण्यात आले होते.
लोकल ट्रान्समिशनबाबत बोलताना कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित सांगतात, "आपल्याला गेल्या 3 ते 5 दिवसात जिनोम सिक्वेंसिंगसाठी किती नमुने पाठवले याची माहिती घ्यावी लागेल."
मुंबईत 683 पासून कोरोनारुग्ण 1377 रुग्ण फक्त चार दिवसात वाढले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images /MENAHEM KAHANA
टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, "हे आकडे पाहाता आपण असं म्हणू शकतो की मुंबईतील डेल्टा व्हेरियंटची 80 टक्के जागा आता ओमिक्रॉनने घेतली आहे," यात काही दुमत असण्याचं कारण नाहीये.
किती नमुन्याचं होतं जिनोम सिक्वेंसिंग?
दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला होता. त्यानंतर भारतात खबरदारी घेण्यास सुरुवात झाली होती.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये किती प्रसार झालाय. हे शोधण्यासाठी सरकारने कम्युनिटी सर्व्हेक्षण सुरू केलं होतं.
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर हे सर्व्हेक्षण केलं जाणार आहे.
"मुंबईतून 300 आणि पुण्यातून 100 नमुने गोळा केले जाणार आहेत. हे नमुने रॅन्डम घेण्यात येतील," असं डॉ. आवटे पुढे सांगतात.
नोव्हेंबर महिन्यात राज्यभरातून 1800 नमुने कम्युनिटी सर्व्हेक्षणाअंतर्गत जिनोम सिक्वेसिंगसाठी घेण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
मे महिन्यापासून 22000 नमुन्यांचं जिनोम करण्यात आलंय.
राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली?
महाराष्ट्रात बुधवारी 3900 नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली.
तज्ज्ञांच्या मते, झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात आहे.
मुंबईतही एका दिवसात कोरोनारुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढलीये.
मंगळवारी मुंबंईत 1377 रुग्ण आढळले होते. ही संख्या 2510 पर्यंत पोहोचली.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तिसर्या लाटेची सुरुवात असू शकते."
मुंबईचा टेस्ट पॅाझिटिव्हीटी रेट 4.84 पर्यंत पोहोचलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, "हा रेट अजिबात चांगला नाही. याची किंमत चुकवावी लागू शकते." येत्या 2-3 दिवसात कोरोना निर्बंधांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.
ओमिक्रॉन सौम्य स्ट्रेन आहे?
जगभरात ओमिक्रॉन झपाट्याने पसरत असला तरी होणारा आजार सौम्य असल्याचं दिसून आलंय.
डॉ. जोशी पुढे सांगतात, "ओमिक्रॉन स्ट्रेन सौम्य आहे. केसेस वाढल्या तरी रुग्णालयात दाखल होणार्यांची संख्या जास्त नाहीये," लोकांना गंभीर आजार होत नाहीये आणि मृत्यूची संख्या कमी आहे.
तज्ज्ञ सांगतात ओमिक्रॅानमुळे लोकांना सौम्य संसर्ग होतोय.
व्हॅाकार्ट रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसीन विभागाच्या डॉ. हनी सावला म्हणाल्या, "ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे ICU केसेस वाढल्या नाहीयेत," ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत नाहीये आणि न्यूनोनियादेखील होत नाहीये.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








