किरण कोरे असा झाला सोशल मीडियाचा लावणी 'सम्राट'

लावणी

फोटो स्रोत, kiran Kore

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत यश मिळवणाऱ्या, स्वतःचं विश्व समृद्ध करणाऱ्यांचा प्रवास सांगणारी बीबीसी मराठीची ही मालिका

"मी चौथीत होतो...शाळेचं गॅदरिंग होतं. तेव्हा मी साडी नेसून, विग लावून 'दिसला गं बाई दिसला' या गाण्यावर पहिल्यांदा लावणी सादर केली. त्यादिवशी मी खूप खुश होतो. मला इतके पैसे बक्षिसात मिळाले की ते वर्षभर खर्च करूनही संपले नाहीत..."

'लावणी सम्राट' म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला किरण कोरे लावणीची आणि त्याची नेमकी ओळख कधी झाली याबद्दल सांगत असतो.

किरणने बीएससी, बीएड, एअरपोर्ट मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. तो एक लावणी कलावंत आहे.

नांदेडजवळच्या गावात राहणाऱ्या किरणला 5 बहिणी. गावात येणाऱ्या जत्रा आणि तमाशांतून त्याची लावणीशी ओळख झाली. घरी बहिणींसोबत लावणारा किरण दरवर्षी शाळेच्या गॅदरिंगला लावणीवर परफॉर्म करत असे.

स्त्री वेशाशी पहिली ओळखही तेव्हाच झाल्याचं किरण सांगतो.

"स्वतःला मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला मी खूप गोड वाटायचो...असं वाटायचं की मी असा पण दिसू शकतो...गेटअपमधला किरण मुलीसारखा दिसतो, याचं मला खूप कौतुक वाटायचं."

11-12वीपासून त्याने वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. पण त्यावेळी घरच्यांचा तितकासा पाठिंबा नव्हता.

या स्पर्धांना इतर मुलांचे आईवडील येत पण आपण बक्षीस घ्यायलाही एकटे जात असल्याची खंत किरण बोलू दाखवतो. त्यावेळी घरच्यांचा पाठिंबा मिळाला असता तर तो आनंद द्विगुणित झाला असता, असंही तो म्हणतो.

किरण कोरे

फोटो स्रोत, Kiran Kore

"माझ्या घरचे, भावकीतले, जवळपासचे लोक मला खूप वाईट बोलायचे. कशाला असं बायकांसारखं साड्या घालून कशाला नाचतो. पण आज तेच लोक सांगतात की किरण कोरे आहेत ना लावणी सम्राट, ते आमचे पाहुणे आहेत, तो माझा मेहुणा आहे..." किरण सांगतो.

लॉकडाऊन दरम्यान टिकटॉकवर किरणचे सुमारे 5 लाख फॉलोअर्स झाले होते. टिकटॉक भारतात बंद झाल्यानंतर आता इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर किरणचे लाखो फॉलोअर्स आहेत.

किरण कोरे

फोटो स्रोत, kiran kore

स्त्री वेशात सादरीकरण ही आता किरणची खासियत आहे. तो सांगतो, "मी तसं खूप डान्स फॉर्म परफॉर्म करतो. फक्त स्त्री वेशात करतो. कारण सध्या तीच माझी ओळख झालेली आहे. आणि लोकांना शोजमध्ये ते जास्त आवडतं. मी सेमी क्लासिकल, बॉलिवुड परफॉर्म करतो. कधीकधी वेस्टर्न ड्रॅग शोजही करतो."

"लावणी सादर करताना बरेच जण पुरुष वेषामध्येपण लावणी खूप छान सादर करतात. पण लावणी अजून सुंदरपणे सादर करण्यासाठी मी लेडीज गेटअप ट्राय केला होता. ते सगळ्यांना खूप आवडलं, बक्षीसं मिळाली. मग असं वाटलं की सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं काहीतरी नक्कीच करू शकतो जे लोकांना आवडेल. त्यामुळे मी पुरुष असूनही स्त्रीवेशात लावणी सादर करायला लागलो. आणि ते लोकांना आवडायला लागलं."

साडी नेसून, दागिने घालून आणि मेकअपमध्ये नाचणं चॅलेंजिंग असल्याचं किरण सांगतो.

"परिस्थितीने मला मेकअप शिकवला. मेकअप करणार कोण हा प्रश्न होता. स्पर्धेला वा शोला गेलयावर लोकांच्या वस्तू मी पहायचो. ती वस्तू लक्षात ठेवून दुकानात जाऊन मी मागायचो. लावून पहायचो. असं करत करत मला मेकअप जमायला लागला. युट्यूबवर वेगवेगळ्या मेकअप आर्टिस्टचे व्हिडिओ पहायचो. त्यानुसार मी स्वतःवर वेळ मिळेल तशी प्रॅक्टिस करायचो."

लावणी

फोटो स्रोत, kiran Kore

पण एका मुलाने लावणी सादर करण्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात?

"लोकांना अजूनही असंच वाटतं की लावणी ही मुलींनीच परफॉर्म केली पाहिजे. मुलांनी नाही केली पाहिजे. त्यामुळे बरेच लोक पुरुष कलावंताना शोजना बोलवत नाहीत. ही वाईट गोष्ट आहे. नेहमी खटकते. तुम्ही लावणीचं लावण्य बघा. जेंडर बघू नका. सध्या पुरुष कलावंत खूप सुंदर लावणी सादर करत आहेत. तुम्ही नक्की बघा. त्यांनासुद्धा शोज द्या.

"बऱ्याच शो'ला असं होतं की ऑडियन्समध्ये बसलेल्या बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की पुरुष कलावंत लावणी सादर करतोय. डान्स झाल्यावर ते भेटायला येतात. ते आतमध्ये येऊन शोधतात, की ती मुलगी गेली कुठे? तोपर्यंत मी कपडे बदललेले असतात आणि नेहमीच्या मुलाच्या वेशात असतो. ती मुलगी मीच हे मी जेव्हा सांगतो, त्यांना एवढं आश्चर्य वाटतं."

सोशल मीडियावर किरणच्या व्हिडिओंना प्रचंड व्ह्यूज मिळतात. त्यावर अनेक कॉमेंट्स येतात. यातल्या अनेक कॉमेंट्स त्याच्या परफॉर्मन्सला दाद देणाऱ्या असल्या तरी काही नकारात्मक वा टोमणे मारणाऱ्या असतात.

याविषयी बोलताना किरण सांगतो, "नकळत कोणाची तरी घाणेरडी कॉमेंट येऊन जातेच. सकाळी उठल्यावर आधी सोशल मीडिया पाहिला जातो. बघून कधी कधी वाईट वाटतं. लोक बायल्या म्हणतात, छक्का म्हणतात, मला लोकांना हेच सांगायचंय, कुणी काहीही असो. प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून तुम्ही बघा.

किरण कोरे

फोटो स्रोत, Kiran Kore

"एखाद्याच्या कलेने, एखाद्याच्या वागण्याने त्याचं जेंडर तुम्ही ठरवू शकत नाही. प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये राहण्याचा हक्क आहे. तुम्ही कोण लागून गेलात त्या लोकांना वाईट बोलणारे? अशी बरीच लोकं आहेत जे चोऱ्यामाऱ्या करतात, बलात्कार करतात. त्यांना तुम्ही काहीच म्हणत नाही. मग आम्हा कलावंताना वाईट कमेंट का देता?"

सोशल मीडियावरून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर आता किरणला अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी बोलवलं जातं. अनेक स्पर्धांमध्ये त्याने बक्षीसं मिळवली आहेत.

आपण आपल्या कलेसाठी मेहनत घेतली, प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं तर यश मिळू शकतं, असं किरण सांगतो.

सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या, स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना तो सांगतो, "स्वतःच्या फोनचा चांगला वापर करून तुम्ही लोकप्रिय होऊ शकता.

"स्ट्रगल टू सक्सेस हा तुमचा काळ आहे, त्यामध्ये खूप लोकं तुम्हाला नावं ठेवतील, खूप लोकं तुम्हाला वाईट बोलतील, तुम्ही स्ट्रगल करत असता, तेव्हा लोकांना तुमची किंमत नसते. पण जेव्हा त्याचं यशात रूपांतर होतं तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा बोलण्याचा दृष्टीकोन आपोआप बदलतो. त्यामुळे स्वतःवर, गोल्सवर लश्र द्या. नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल."

---------------------

तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?

आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा [email protected]या ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.

तुमचं पूर्ण नाव

वय

तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती

या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?

तुमची (स्वतःचे नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात

संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)