अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यास ते 4 दिवसांत महाराष्ट्र विकतील - गोपीचंद पडळकर, #5मोठ्या बातम्या

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. अजित पवार चार दिवसांत राज्य विकतील - गोपीचंद पडळकर
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. विविध मुद्द्यांवरून पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी समोरा-समोर आले. यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचाही मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
चंद्रकांत पाटील यांनी सुरुवात केल्यानंतर या मुद्द्यावरून प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सरकारला सुनावले. यावेळी पडळकरांनी अजित पवारांवरही टीका केली.
अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांतच राज्य विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
प्रकृतीच्या कारणामुळं मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून भाजपनं सरकावर हल्ला करण्याची संधी सोडली नाही.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा पक्षातल्या कोणावर विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना जबाबदारी देऊन त्यांना मुख्यमंत्री करावं, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत टीका केली होती.
2. मुंबईत कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येतील वाढीनं पुन्हा चिंता वाढवल्या आहेत. त्यात मुंबईतून आणखी चिंतेची बातमी समोर आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एका दिवसांत जवळपास 490 कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळं अचानक आकडा हा जवळपास दुप्पट झाल्याचं मुंबईत दिसतंय. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.
मुंबईत गेल्या काही महिन्यात सातत्यानं कोरोनाचे आकडे कमी होत होते. ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं याठिकाणी समोर आलं आहे.
मुंबईबरोबरच राज्यातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, नगर आणि नाशिकमधील बाधितांचे प्रमाणही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे.
3.दलित महिलेनं तयार केलेलं अन्न खाण्यास विद्यार्थ्यांचा नकार
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातून आजही जातीपातीचा समाजावर प्रभाव आहे हे दाखवून देणारा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित हे प्रकरण आहे.
चंपारण येथील ढौलमधील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क दलित महिलेनं तयार केलेलं असल्यामुळं शाळेतील मध्यान्ह भोजन खाण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. सकाळनं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, CYRUS MCCRIMMON/GETTYIMAGES
या माध्यमिक शाळेत सुनिता देवी यांची भोजनमाता म्हणून नियुक्ती केली आहे. त्या सहावी ते आठवीच्या मुलांसाठी भोजन तयार करतात. पण त्यांनी तयार केलेले अन्न खाण्यास मुलं आणि पालक विरोध करत आहेत.
शाळा व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक उच्च जातीतील महिलेची भोजन तयार करण्याच्या कामासाठी निवड केली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेत उच्च जातीतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळं अशा जातीतील महिलेची निवड करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तर शाळा व्यवस्थापनानं निवड योग्य असून, पालक विनाकारण वाद निर्माण करत असल्याचा दावा केला आहे.
4.आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंना दिलासा?
शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी झालेल्या अटकेनंतर त्याच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपांनंतर खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी एक तपास समिती स्थापन केली होती. मात्र या समितीच्या तपासात काहीही पुरावे मिळाले नसल्याचं समोर आलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत अद्याप पुरावे सापडले नसून, कोणताही गुन्हादेखील नोंदवण्यात आलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
प्रभाकर साईल नावाच्या पंचानं 25 कोटीच्या खंडणीचे आरोप केले होते. त्याच्या चौकशीसाठी 20 जणांचे जबाब मुंबई पोलिसांनी घेतले मात्र त्यात काहीही पुरावे आढळले नसल्याचं म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांच्यावरही काही आरोप या प्रकरणात करण्यात आले होते. मात्र चौकशीत काहीही आढळलं नसल्यानं त्यांना दिलासा मिळालेला आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
5. कोरोना लस : फायझरच्या टॅब्लेटच्या आपत्कालीन वापरला मान्यता
कोरोनापासून संरक्षण व्हावं म्हणून लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र अनेक लोक इंजेक्शनच्या भीतीपोटी लस घेण्याचं टाळत असल्याचं समोर आलं आहे.
अशा लोकांसाठी आता गोळीच्या रुपानं पर्याय समोर आला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं Pfizer च्या Paxlovid टॅब्लेटच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. टीव्ही 9 मराठीनं याबाबचं वृत्त दिलं आहे.
फायझरची कोव्हिड टॅबलेट ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी आहे. या टॅबलेटचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
कोरोनाचे निदान झाल्यानंतर आणि लक्षणे दिसल्यानंतर 5 दिवसांच्या आत पॅक्सलोविडचा वापर शक्य तितक्या लवकर करावा, असं सांगण्यात आलं आहे.
या गोळीचा वापर केल्यास कोरोनापासून संरक्षणात्मक कवच प्रदान करण्यासाठी ती महत्त्वाची ठरेल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








