नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी पोटनिवडणुकांचे निकाल धोक्याची घंटा आहे का?

नरेंद्र मोदी अमित शाह

फोटो स्रोत, Twitter

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तीन लोकसभा आणि 29 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी (2 नोव्हेंबर) जाहीर झाले. यामध्ये भाजपने सात ठिकाणी विजय मिळवला. आठ ठिकाणी भाजपच्या मित्रपक्षांनी विजय मिळवला. तर काँग्रेसच्या खात्यातही आठ जागा आल्या आहेत.

या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त तृणमूल काँग्रेसलाही पश्चिम बंगालमध्ये 4 जागांवर विजय मिळाला आहे, तर बाकीच्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची कामगिरी चांगली राहिली.

या निकालांनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तर भाजप थोडाफार चिंताग्रस्त झाल्याचं दिसून येतं.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी हाच मुद्दा 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांशी जोडत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली.

या निकालानंतर सर्वात जास्त चर्चा हिमाचल प्रदेशची होत आहे. याठिकाणी तीन विधानसभा तर एक लोकसभा जागेवर काँग्रेसने विजय प्राप्त केला.

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला असा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्याठिकाणी मुख्यमंत्री बदल पाहायला मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे.

भाजपने नुकतेच गुजरात आणि उत्तराखंडमध्ये आपला मुख्यमंत्री बदलला होता. याठिकाणी पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत.

हिमाचल प्रदेशात पुढच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील. त्यामुळेच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना बळ मिळताना आढळून येतं.

हिमाचल प्रदेशातील पराभवाचा अर्थ

हिमाचल प्रदेश हे राज्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मूळ राज्य आहे.

त्यामुळेच येथील पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या निकालांनंतर आसाम, बिहार, तेलंगण आणि मध्य प्रदेशात मिळवलेल्या विजयाबाबत नड्डा यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.

जे. पी. नड्डा

फोटो स्रोत, Getty Images

पण हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील पराभवाबाबत त्यांनी मौन बाळगल्याचं दिसून आलं.

पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवाला जे. पी. नड्डा यांच्याशी जोडणं अतिशयोक्ती असल्याचं मत हिमाचल प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार अश्विनी शर्मा यांनी व्यक्त केलं.

ते म्हणतात, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा प्रचारासाठी हिमाचल प्रदेशला आलेही नव्हते. शिवाय निवडणुका त्यांच्या जिल्ह्यातही नव्हत्या. निकालांमध्ये फक्त एक फॅक्टर चालला - ते म्हणजे वीरभद्र सिंह.

ते हयात नसतानाही त्यांनी जनतेला प्रभावित केलं. त्यामुळे सध्या चर्चा मुख्यमंत्रिपदाबाबत होत आहे. जयराम ठाकूर मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील का?"

मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी जयराम ठाकूर यांच्या बाजूने अनेक गोष्टी आहेत.

अमित शाह यांच्यासोबत जयराम ठाकूर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, अमित शाह यांच्यासोबत जयराम ठाकूर

त्या सर्व कारणांचा उल्लेख करताना अश्विनी शर्मा म्हणतात, "जयराम ठाकूर यांची प्रतिमा प्रामाणिक नेत्याची आहे. अतिशय मेहनतीने त्यांनी ही प्रतिमा मिळवली आहे. ते जे. पी. नड्डा यांचे निकटवर्तीयही आहेत. एकेकाळी जे. पी. नड्डा यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. केंद्रातील इतर नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहे."

पण तसं असलं तरी कोणते मुख्यमंत्री विजय मिळवून देण्याची क्षमता राखतात, ही गोष्ट केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची असेल.

मंडी हा जयराम ठाकूर यांचा मूळ जिल्हा आहे. तिथंच भाजपला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

अश्विनी शर्मा पुढे म्हणतात, "जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं अवघड आहे, अशी जराशीही शंका आली, तर भाजप त्यांना बाजूला करू शकतो."

इतर अनेक राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही दर पाच वर्षांनी सत्ताधारी पक्ष बदलण्याचं प्रचलन गेल्या काही काळात दिसून आलं होतं. त्यामुळे भाजपच्या चिंता जास्त वाढल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसंदर्भात वार्तांकन करणाऱ्या 'द हिंदू'च्या पत्रकार निस्तुला हेब्बार सांगतात, "भाजपला या पोटनिवडणुकीत धक्का जरूर बसला आहे. विशेषतः हिमाचल आणि कर्नाटकमध्ये हा धक्का जोरात बसला."

त्या सांगतात, "वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर हिमाचल प्रदेशात काँग्रेसची स्थिती चांगली नसेल, असं भाजपला वाटतं. पण दुबळ्या काँग्रेससमोरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लोकांच्या मनातली नाराजी यातून दिसू शकते. पण ही नाराजी राज्य सरकारविरुद्ध आहे की केंद्र सरकारविरुद्ध, याची पडताळणी पक्षाला करावी लागेल."

पराभवानंतर प्रतिक्रिया देताना जयराम ठाकूर म्हणाले, "काँग्रेसने महागाईचा वापर शस्त्रासारखा केला आहे."

याचाच अर्थ ते पराभवाचं खापर केंद्र सरकारवर फोडत होते, हे स्पष्ट आहे.

पण निवडणुकीत स्थानिक मुद्देही होते. भाजपने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचंही एक कारण आहे. राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण हेसुद्धा एक त्यातलं कारण आहे."

केंद्रात हिमाचल प्रदेशचे दोन मोठे चेहरे आहेत. एक राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि दुसरे म्हणजे अनुराग ठाकूर, जे केंद्र सरकारमध्ये मंत्रीही आहेत.

भाजपसाठी अर्थ काय?

हिमाचल प्रदेशप्रमाणेच कर्नाटकमध्येही भाजपच्या पदरी निराशा आली.

कर्नाटकात एका ठिकाणी पक्षाला विजय मिळाला. तर एका ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.

ही जागा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची होती.

येदीयुरप्पा

फोटो स्रोत, Getty Images

नुकतेच येडियुरप्पा यांना हटवून भाजपने बोम्मई यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पहिली परीक्षा होती. हे त्यांनी त्यांच्या प्रतिष्टेशी जोडलं होतं.

निस्तुला म्हणतात, "बी. एस. येदीयुरप्पा भाजपचे जुनेजाणते धुरंधर नेते आहेत. त्यांची राज्याच्या जनतेवर चांगली पकड होती. येदीयुरप्पा यांना हटवून पक्षाने योग्य निर्णय घेतला किंवा नाही, यावर यामुळे चर्चा होऊ शकते."

शिवराज सिंह आणि हेमंत बिस्वा सरमा झाले मजबूत?

दुसऱ्या बाजूला, दोन राज्यं अशीही आहेत, तिथं पक्षाला दिलासादायक निकाल मिळाला.

आसामात भाजपने आपल्या मित्रपक्षांना सोबत घेत पाच जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पक्ष कार्यकर्ते आणि सरकारच्या कामकाजाला या विजयाचं श्रेय दिलं.

मध्य प्रदेशातही भाजपची कामगिरी बरी राहिली.

शिवराज सिंह चौहान

फोटो स्रोत, AFP

विशेष म्हणजे, जोबर मतदारसंघ गेल्या 70 वर्षांत केवळ दुसऱ्यांदा भाजपला हस्तगत करण्यात यश आलं.

निस्तुला सांगतात, "कर्नाटकाच्या विपरीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पक्षाचा जुना चेहरा आहेत. भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत नाराज असल्याचं नेहमीच ऐकण्यात येतं. पण पोटनिवडणुकीच्या निकालानंतर इथं पक्षाचा चेहरा तेच असतील, हे स्पष्ट होतं."

हरयाणाच्या ऐलानाबाद मतदारसंघात अभय चौटाला यांनी विजय मिळवल्यानंतरही भाजपने सुटकेचा निश्वास सोडला.

अभय चौटाला यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात राज्य विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला पण त्यांच्या मताधिक्क्यात पूर्वीच्या तुलनेत घट झाली. त्यामुळे इथं शेतकरी आंदोलन इतका महत्त्वाचा मुद्दा नाही, अशी धारणा पक्षाची झाली आहे.

अभय चौटाला गेल्या वेळी सुमारे 12 हजार मतांनी जिंकले होते. पण यंदा त्यांना फक्त 6 हजार मतांनी विजय मिळवता आला.

काँग्रेससाठी अर्थ काय?

29 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 8 जागांवर विजय प्राप्त झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा द्वेषाविरुद्धचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Reuters

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किडवाई सांगतात, "काँग्रेसच्या विजयाला फार काही विशेष महत्त्व नाही. हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांनी नक्कीच विजय मिळवला. पण पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणूक यांच्यात खूप अंतर असतं. पोटनिवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते. हा विजय गोव्यासारख्या छोट्या राज्यात मिळाला असता तर काँग्रेससाठी ती मोठी गोष्ट असती. किंवा मध्य प्रदेशात चारही ठिकाणी त्यांनी विजय मिळवला असता तर तो मोठा विजय मानला गेला असता.

राजस्थानातील दोन्ही ठिकाणच्या विजयामुळे गहलोत मजबूत दिसतात. पण त्यामध्ये वसुंधरा राजे सिंधिया आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील कुरघोडींचीही एक भूमिका आहे."

"त्याचप्रमाणे बिहारमध्ये काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. लोकशाहीत ते ठीक आहे. पण त्यामुळे राजकीय नुकसानच जास्त झालं आहे. तिथं नितीश कुमार यांच्या विरोधात निकाल गेला तरच खळबळ माजू शकते."

सध्या तरी पोटनिवडणुकांच्या निकालावरून भाजपच्या वाढलेल्या चिंतांनी काँग्रेसला सुखावह वाटत असेल. पण 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत काय घडतं, त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)