पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांची 'औकात' का काढतायेत?

धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणींची एकमेकांवरील टीकाही आता चर्चेचं केंद्र बनलंय.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी बीडमधील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान टीका करताना एकमेकांची 'औकात' काढण्याचा प्रयत्न केला.

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या क्रमांकावरून केलेली टीका, धनंजय मुंडे यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी त्याच आक्रमकतेनं प्रत्युत्तर दिलं.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षाला जवळपास दशकभराचा इतिहास आहे. ते आपण पाहूच, पण तत्पूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर नेमकी काय टीका केली, ते पाहू.

'ताई पहिल्या चारमध्ये मंत्री होत्या, 32 व्या नंबरच्या नाही'

बीडमधील वडवणी इथं सभेत बोलताना भाजपच्या नेत्या आणी माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशन म्हणाल्या, "आष्टीला सभा झाल्या. आणि मला कुणीतरी म्हणलं, निवडून आल्यानंतर 100 कोटी रुपये देणार. अशी पाटोद्यात घोषणा केली. तीच घोषणा शिरूरमध्ये केली, तीच घोषणा आष्टीत केली. केज आणि वडवणीमध्येही तीच केली. किती कोटी झाले. 500 कोटी झाले. 500 कोटी एका झटक्यात द्यायला होते, तर दोन वर्षं काय टाळ पिटत होते का? तेव्हा का नाही दिले?"

पंकजा पुढे म्हणाल्या, "पैसे द्यायची यांची ताकदच नाही. कारण तुमच्या ताईचं जेव्हा मंत्रिपद होतं, ताई पहिल्या चारमध्ये मंत्री होत्या. 32 व्या नंबरच्या मंत्री नव्हत्या."

यावेळी पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "तुम्ही निधीची घोषणा करत असाल, तर ओबीसीच्या आयोगाला निधी द्या. हा प्रचार करताना वेदना होतायत. इतिहासातली काळी निवडणूक आहे. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. एकतरी विधान पालकमंत्र्यांचं आहे का? कुठल्या तोंडानं मतं मागायला आलात?"

'जनतेनं औकात दाखवून दिलीय'

पंकजा मुंडेंच्या या टीकेला महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील केजमध्ये प्रचारादरम्यान उत्तर दिलं.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, FACEBOOK/DHNANJAY MUNDE

धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यावर टीका करायची होती. दहादा तुम्ही केली. तुम्ही माझ्या ताई आहात. दहादा मी तुमच्यावर टीका केली असेल. पण तुम्ही आज माझ्यावर टीका करायच्या ऐवजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागावर टीका केली. त्या म्हणाल्या, औकात आहे का या विभागाची. धनंजय मुंडे आणि सामाजिक विभाग हे 32 नंबरचे खाते."

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, "तुम्ही ज्यावेळी विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये लढवत होतात, त्यावेळी तुम्ही महिला व बालकल्याण मंत्री होतात. त्याचा नंबर मला माहित नाही. ग्रामविकास मंत्री होतात, जलसंधारण मंत्री होतात. महाराष्ट्राच्या नेत्या होतात. पण परळीच्या जनतेनं 32 हजार मतांनी पाडून औकात दाखवून दिलेली आहे. जनतेनं ज्याची-त्याची औकात दाखवून दिलीय."

"पण वाईट एका गोष्टीचं वाटलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही सभा होतेय, बाबासाहेबांनी हयात असताना सामाजिक व न्याय विभाग काढलाय. तुम्हाला या खात्यावर टीका करायची होती, कारण समाजातल्या वंचित जातींचं हे खातं आहे. तुम्ही कुणाचा अपमान केलात, तर सामाजिक विभागाला नाव ठेवून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय," अशी टीकाही धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केली.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, PANKAJA MUNDE/FACEBOOK

तसंच, "जवळजवळ 500 कोटी रुपये आणायची औकात आहे. ताई, नक्की हिशेब देऊ का? या बीड जिल्ह्यात पावसाळ्यात 16 अतिवृष्टी झाल्या. 12 अतिवृष्टी मी स्वत: हिंडलो. या अतिवृष्टीत शेतकरी संकटात होता, ताईसाहेब आपण कुठे होतात?" असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

'पंकजा-धनंजय मुंडेंमधील संघर्षाचा इतिहास'

एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक बनले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती.

गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, DHANANJAY MUNDE/ FACEBOOK

जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.

डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं.

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)