आरोग्य भरती : '31 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी मला 33 हॉल तिकीट आलेत, हा गोंधळ काय आहे?'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
"31 ऑक्टोबरला माझी आरोग्य विभागाची परीक्षा आहे. मी केवळ औरंगाबाद या एका जिल्ह्यासाठी अर्ज भरला होता. परंतु मला 33 प्रवेशपत्र देण्यात आले आहेत. म्हणजेच 34 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे हॉल तिकीट मला आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले आहेत. आता परीक्षा देण्यासाठी मी 34 पैकी कोणत्या केंद्रावर जायचं?" असा प्रश्न परीक्षा देणारे उमेदवार पृथ्वीराज गोरे यांच्यासमोर आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आरोग्य विभागाच्या ग्रुप 'क' ची परीक्षा 24 ऑक्टोबरला पार पडली. ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली, कारण मोठ्या संख्येने उमेदवारांनी तक्रारी केल्या. परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचं चित्र पहायला मिळालं.
आरोग्य विभागाच्या ग्रुप 'ड' ची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आता पुन्हा एकदा संभ्रमावस्था असून या परीक्षेसाठी मिळणाऱ्या प्रवेशपत्रांमध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी उमेदवार करत आहेत.
पृथ्वीराज गोरे यांनी पुढे सांगितलं, "औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागासाठी अर्ज भरल्यानंतर जी रिसिट दिली जाते त्यावर जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने त्याबाबतही माझ्या मनातही संभ्रम आहे."
याशिवाय अनेक उमदेवारांना हॉल तिकीट मिळाल्यानंतर ते ग्राह्य धरू नका असे संदेश मोबाईलवर आल्याचं उमेदवार सांगतात, यामुळेही गोंधळ उडाला आहे.
'तुम्ही जर 25 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रुप डी चे प्रवेशपत्र डाऊनलोड केले असल्यास ते ग्राह्य धरू नका. तुम्हाला लवकरच नवीन प्रवेशपत्र सादर करण्यात येईल.' असा संदेश उमेदवारांना मोबाईलवर प्राप्त झाला आहे.
पुण्यातील सचिन लहाने या उमेदवाराने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "24 ऑक्टोबरच्या परीक्षेत 3 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका त्यांच्याकडे पावणे तीन वाजताच व्हॉट्स अपवर आली." म्हणजेच आरोग्य भरतीची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा त्यांचा दावा आहे.

या भरती प्रक्रियेची प्रतिक्षा उमेदवार अनेक महिन्यांपासून करत होते. तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी असल्याने त्यांच्यासाठी या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पंरतु वारंवार तक्रारी समोर येत असल्याने याला नेमकं जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो.
आरोग्य विभागाकडून घेण्यात येणारी परीक्षा सुरळीतपणे पार का पडत नाही? परीक्षेचं कंत्राट खासगी कंपनीला का देण्यात आलं? 24 ऑक्टोबरची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
नेमकं प्रकरण काय आहे?
आरोग्य विभागाची प्रलंबित भरती परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली. ग्रुप क आणि ड साठी ही परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तास आधी आरोग्य विभागाने ही परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.
राज्यभरातील उमेदवार यामुळे निराश झाले. सरकारी भरती प्रक्रियेला आगोदरच विलंब होत असताना ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने गोंधळ उडाला.

मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते. त्यामुळे आरोग्य विभागावर टीका झाली.
ही परीक्षा पुढे ढकलून 24 ऑक्टोबरला घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. 24 ऑक्टोबरलाही विविध परीक्षा केंद्रांमधून उमेदवारांच्या तक्रारी समोर आल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील निशिगंधा यांनी नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या क्लार्क या पदासाठी अर्ज भरला होता. 24 तारखेला पूर्ण तयारीनिशी त्या परीक्षा केंद्रावर पोहचल्या.
"मला प्रश्नपत्रिका मिळाली आणि मला कळलंच नाही नेमकं काय झालं आहे. कारण 100 पैकी 60 गुणांचे प्रश्न नर्सिंगचे होते. मी क्लार्क या पदासाठी अर्ज भरला होता. त्यामुळे नर्सिंगचे प्रश्न कसे आले हे मला कळत नव्हतं. तसंच माझ्या प्रवेशपत्रावर असलेला कोड नंबर आणि प्रश्नपत्रिकेवर असलेला कोड नंबर हा वेगळा होता. मी तिथे पर्यवेक्षकांनाही कळवलं पण काही फायदा झाला नाही." बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं.
मुंबईतील साकीनाका या परीक्षा केंद्रावर तर प्रश्नपत्रिका एक तास आधाची फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी गेलेले अविनाश बोरांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला तिथे पोहचल्यावर कळलं की अनेक उमेदवारांच्या व्हॉट्स अपवर प्रश्नपत्रिका आली आहे. यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. इतर सर्व उमेदवार संतापले आणि आंदोलन सुरू झालं. प्रश्नपत्रिका फुटल्याने त्याचा विरोध म्हणून आम्ही परीक्षा दिलीच नाही. आता विभागाने आम्हाला गैरहजर राहिल्याचा शेरा दिला आहे."

फोटो स्रोत, facebook
केवळ ही एक दोन उदाहरणं नव्हे तर पुणे, नाशिक, मुंबई अशा परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेत पोहचल्या नाहीत, प्रश्नपत्रिका अपुऱ्या होत्या, अधिकारी वेळेत आले नाहीत अशा तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत.
आता 31 ऑक्टोबरला ग्रुप 'ड' साठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या प्रवेशपत्रांबाबतही उमेदवारांकडून तक्रारी येत असून काही उमेदवार या व्यवस्थेचा निषेध म्हणून परीक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.
एमपीएससी समन्वय समितीचे सदस्य महेश घारबुडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "ही परीक्षा पारदर्शी पद्धतीने होत नाहीय. त्यामुळे अशाप्रकारे स्पर्धा करुन सरकारी नोकरी आम्ही का मिळवावी असा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकतो आहे."
'परीक्षा घेण्यास अकार्यक्षम ठरलेल्या कंपनीला पुन्हा कंत्राट कशासाठी?'
आरोग्य विभागाच्या या भरतीसाठी परीक्षा घेण्याचं कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. या गोंधळानंतर आरोग्य विभागाने आता या कंपनीला नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पण सप्टेंबर महिन्यात ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यानंतर आणि त्यावेळी परीक्षा सुरळीत घेता आली नसल्याने पुन्हा याच खासगी कंपनीला कंत्राट का दिलं? असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
महेश घरबुडे म्हणाले, "खासगी कंपनीची अकार्यक्षमता वारंवार दिसली तरीही आरोग्य विभागाने या कंपनीला परीक्षेचं कंत्राट का दिलं? राज्यातील शेकडो तरुण मुलांचे भवितव्य या परीक्षांवर अवलंबून असतं. तेव्हा सरकार या परीक्षा जबाबदारीने घेईल असं अपेक्षित आहे. पण अशा त्रुटींमुळे उमेदरावांची संधी वाया जाते. हा मुलांसोबत अन्याय आहे."
'या कंपनीशी सरकारचे काय लागेबांधे आहेत, चूक होऊनही परीक्षा घेण्याचे कंत्राट या कंपनीला दिले जाते?' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुण्यात आम आदमी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनेही हा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच पेपर लीक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करणार असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे.
24 ऑक्टोबर रोजी पुण्यातील सचिन लहाने यांनी आरोग्य विभागाची ग्रुप क अंतर्गत नर्सिंगची परीक्षा दिली. त्यांचं परीक्षा केंद्र ठाण्यात होतं. पण त्यांच्याकडे तीन वाजताच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पावणे तीन वाजताच वॉट्सअपवर आली असा दावा त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, "परीक्षेत सतत व्यत्यय आणणाऱ्या खासगी कंपनी आरोग्य विभाग परीक्षेची जबाबदारी का देत आहे, यावरुन संशय निर्माण होतो. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही सरकारी आस्थापना आहे. मग एमपीएससीकडे परीक्षा सोपवण्यात काय अडचण आहे सरकारला? खासगी कंपनीच कशासाठी हवी?"
'सरकारी आस्थापना डावलून खासगी कंपनी कशासाठी?'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ही परीक्षा घ्यावी अशी मागणी काही उमेदवार आणि विद्यार्थी संघटना करत आहेत.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे (MDER) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सरकारी नोकर भरतीच्या परीक्षा घेण्यासाठी अनेक पर्याय असल्याचं सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मी डीएमईआरमध्ये असताना आम्ही सलग 20 वर्ष लाखो विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेत आलो आहोत. पण कधीही खासगी कंपनीला त्यासाठी कंत्राट दिलं नाही. आम्ही खासगी सल्लागार आणि इंजिनिअर नेमले. त्यांची मदत घेतली. परंतु संपूर्ण जबाबादारी कधीही खासगी कंपनीवर टाकली नाही."
या परीक्षा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांना करिअर घडवण्याची संधी देणाऱ्या असतात. त्यामुळे जबाबदारीने याकडे लक्ष द्यावं लागतं असंही ते म्हणाले.
ते पुढे सुचवतात, "एखादी कंपनी कमीत कमी दरात प्रस्ताव देते म्हणून त्यांची निवड न करता त्यांचा अनुभव, कंपनीची प्रतिमा, पारदर्शीपणा आणि कार्यक्षमता हे तपासणं गरजेचं असतं."
"खासगी कंपनीपेक्षा आपल्याकडे अनेक सरकारी आस्थापना आहेत ज्यांना लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), वैद्यकीय शिक्षण संचालनालय (DMER), CET सेल, आरोग्य विद्यापीठ (|MUHS), राज्यातील सर्व विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यलय अशी कार्यक्षम यंत्रणा असताना त्यांना काही आणखी मदत करून परीक्षेची जबाबदारी देता येऊ शकते," असंही ते म्हणाले.
राजेश टोपे काय म्हणाले?
विद्यार्थ्यांना एकाहून अधिक प्रवेशपत्रं मिळाल्याच्या गोंधळावर राजेश टोपे यांच्याशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला.
त्यांनी म्हटलं की, "संबंधित उमेदवाराने सर्व जिल्ह्यासाठी अर्ज केला आणि म्हणून त्याला एवढी प्रवेशपत्र देण्यात आली. यापैकी कुठल्याही परीक्षा केंद्रावर तो परीक्षा देऊ शकतो."
24 ऑक्टोबरला परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात त्यावेळीही स्पष्टीकरण दिलं होतं.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते, "काही ठिकाणी परीक्षा उशीरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाईल. नाशिक, पुणे केंद्रावर प्रश्नपत्रिकांच्या डिजिटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येईल."
24 ऑक्टोबरची परीक्षा पुन्हा होणार का? त्या कंपनीवर कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न याप्रकरणी आजही अनुत्तरित आहेत.
तसंच आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनाही संपर्क साधला. कंपनीला नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिली असून उर्वरित प्रश्नांसाठी आपण नंतर बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यास बातमी अपडेट केली जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








