NDPS Act काय आहे? आर्यन खानला जामीन मिळणं का कठीण झालंय?

आर्यन खान

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आज ( 27 ऑक्टोबर) आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी झाली. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र देखील तुरुंगातच जाणार आहे.

3 ऑक्टोबरला आर्यन खान आणि इतरांना NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतलं आहे.

आर्यन खानने अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नव्हतं, त्याच्या जवळही काही सापडलं नाही... मग आर्यनला जामीन मिळणं कठीण का गेलं?

इतके दिवस त्याला पहिल्यांदा NCB कोठडीत आणि मग आर्थर रोड जेलमध्ये का रहावं लागलं? ज्या कायद्याखाली त्याच्यावर आरोप लावण्यात आले आहेत तो नेहमीपेक्षा कठोर कायदा आहे का?

1950च्या नंतरचा काळात जगामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार, तस्करी आणि सेवन वाढायला लागलं होतं. भविष्यात संपूर्ण जगातली ही मोठी समस्या असेल असं चित्र होतं.

यातूनच युनायटेड नेशन्सची काही आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन्स झाली. 1961, 1971 आणि 1988 मध्ये झालेल्या या कन्व्हेशन्सद्वारे अंमली पदार्थांची शेती किंवा निर्मिती, वितरण, व्यापार, ती जवळ बाळगणं किंवा अंमली पदार्थांचं सेवनं यासाठीचे कडक निर्णय घेण्यात आले. आणि यातूनच जगभरातल्या बहुतेक देशांमध्ये अंमली पदार्थांविरोधातले कायदे अस्तित्वात आले.

NDPS कायदा काय आहे?

भारतामध्ये सध्या असलेल्या कायद्याचं नाव -THE NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES, ACT, 1985

मराठीमध्ये - गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985

आता हा कायदा इतर कायद्यांपेक्षा वेगळा का आणि कसा हे समजून घेऊया. जामीन मिळण्यासाठी इतर कायद्यांमध्ये तत्त्व आहे - Innocent unless proven guilty

प्रतीकात्मक चित्र

म्हणजे दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्त निरपराध मानली जाते.

पण NDPS कायद्यात अशी तरतूद आहे की जर एखादी व्यक्तीने ड्रग्ज घेतले असतील किंवा बाळगले असतील आणि त्या व्यक्तीच्या सानिध्यात असलेली व्यक्ती देखील निकाल लागेपर्यंत दोषी म्हणूनच पाहिली जाते.

या कायद्याची कलमं लागू झालेल्या व्यक्तीच्या जामिनाच्या शक्यता इथेच कमी होतात.

या कायद्याला काही तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते, इतका कठोर हा कायदा आहे.

याकायद्याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना अॅड. अमित कारखानीस म्हणाले, "ही केस NDPS कायद्याखाली रजिस्टर करण्यात आलेली आहे. इतर कायद्यांपेक्षा हा कायदा वेगळा आहे. हा विशेष कायदा असल्याने यातले जामीन मिळण्याविषयीचे निकष अतिशय कठोर आहेत. नॉर्मली कोणालाही जामीन मिळणं तसं कठीण नसतं. Bail is a matter of right and arrest is an exception असं सुप्रीम कोर्टाने 1970 साली म्हटलं होतं. पण NDPS कायद्याला हे लागू पडत नाही."

NDPS कायद्यातली कलमं काय सांगतात?

एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारचा अंमली पदार्थ म्हणजे गांजा, कोकेन, मारुआना यासारखं काय सापडतं आणि किती प्रमाणात सापडतं यावरून या प्रकाराचं गांभीर्य ठरवलं जातं आणि हे अंमली पदार्थ जवळ बाळगण्यामागे काय उद्दिष्टं असावं हे देखील ठरवलं जातं.

म्हणजे स्वतः घेण्यासाठी की विक्रीसाठी हे यावरून ठरवण्यात येतं. प्रत्येक प्रकारच्या ड्रगसाठी वजनाची मर्यादा वेगवेगळी आहे.

प्रतीकात्मक चित्र

आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत किंवा त्याने सेवन केल्याचंही आढळलं नाही. पण त्याच्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघांनी ड्रग्ज बाळगल्याची, ते घेतल्याची कबुली देऊनही त्यांना जामीन मिळाला. मग असं का? या दोघांवर अंमली पदार्थ सेवन आणि जवळ बाळगण्याचा गुन्हा आहे.

NDPS कायद्यानुसार ड्रग्स विकणं हा गुन्हा ड्रग्सचं सेवन करणं किंवा ते जवळ बाळगणं याच्या तुलनेत गंभीर समजला जातो.

जामीन मिळालेल्या या दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद होता, "आमच्या अशिलांनी सेवन केलं असलं किंवा ड्रग्ज कमी प्रमाणात जवळ बाळगले असले, तरी त्यांचे कोणतेही व्हॉट्सअॅप चॅट सापडले नाहीत. त्यांचा इतर आरोपींशी किंवा तपासाशी काहीही संबंध नाही."

आर्यन खान

फोटो स्रोत, Getty Images

ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे सहानुभूतीने पहावं, तो कोणत्या तरी गोष्टीचा आरोपी आहे, कारवाई ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीवर करण्यात यावी असं या आधीच्या काही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे.

NDPS कायद्यातल्या कलमांखाली आरोप असणाऱ्यांना जामीन मिळण्याबाबतच्या निकषांबद्दल अॅड. अमित कारखानीस सांगतात, "सेक्शन 37च्या म्हणण्यानुसार कोणत्याही कोर्टाचं जामीन देण्याआधी समाधान होणं गरजेचं असतं. जामीन मिळाल्यानंतर आरोपी पुन्हा तो गुन्हा करणार नाही, याबाबत कोर्टाची खात्री व्हावी लागते. दुसऱ्या पक्षाचा युक्तीवाद झाल्याशिवाय जामीन मिळू शकत नाही. दुसरं म्हणजे हे सिद्ध करण्याचं काम आरोपीचं असतं."

आर्यन खानवर कोणती कलमं लावली?

आर्यन खानसह इतर आरोपींवर NDPS कायद्याच्या

  • कलम 8 (सी)
  • कलम 20 बी (खरेदी)
  • कलम 27 (विक्री)
  • कलम 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न)
  • कलम 29 (चिथावणी देणे, कट रचणे)
  • कलम 35 (सदोष मानसिक स्थितीची शक्यता)

अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आता या सगळ्याचा अर्थ काय ? तर तपास अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आर्यनकडे काही सापडलं नसलं, तरी अरबाज मर्चंटकडे ड्रग्स सापडले.

अरबाज आर्यनचा जवळचा मित्र आहे. म्हणजे त्याच्याकडे ड्रग्स आहेत, हे आर्यनला माहिती असणार. मग मुद्दा येतो व्हॉट्सअॅप चॅटचा.

आर्यनच्या फोनमध्ये काही incriminating चॅट्स आढळले असं NCBचं म्हणणं आहे. Incriminating म्हणजे एखाद्या गुन्ह्याशी संबंध असल्याचं दाखवणारे.

आर्यनचा ड्रग्सची विक्री करणाऱ्यांशी, पेडलर्सशी संपर्क होता असं व्हॉट्सअॅप चॅटवरून आढळत असल्याचं NCBचं म्हणणं आहे. NCB चं हे म्हणणं मान्य करत सेशन्श कोर्टाने आर्यन खानचा जामीन नाकारला होता.

व्हॉट्सअॅप चॅट्स हा प्राथमिक पुरावा मानता येणार नाही असं 2018 च्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. पण हे चॅट्स दुय्यम पुरावे - सेकंडरी एव्हिडन्स मानले जाऊ शकतात.

अॅड. अमित कारखानीस म्हणतात, "सुप्रीम कोर्टाने नुकतंच एका जजमेंटमध्ये म्हटलं होतं की व्हॉट्सअॅप हे ग्राह्य धरता येणार नाही. पण व्हॉट्सअॅप कम्युनिकेशसुद्धा ग्राह्य धरलं जाऊ शकतं असं रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये कोर्टाने म्हटलं होतं. यामध्ये मुख्य मुद्दा म्हणजे व्हॉट्सअॅपवर झालेला संवाद किती स्ट्राँग आहे आणि तो किती मोठा पुरावा ठरू शकतो हे तपासायचं काम ट्रायल कोर्टाचं आहे. म्हणजे कोर्टात सुनावणीदरम्यान NCBला सिद्ध करावं लागेल. आता हायकोर्ट वा सुप्रीम कोर्टात त्याचा तपास केला जाणार नाही. म्हणून या प्रकरणात NCB ट्रायल कशी चालवतं आणि केस कशी उभी करतं यावर केसचा निकाल अवलंबून असेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)